नोस्टाल्जीया

मराठी माणूस फारच नोस्टाल्जीक आहे असा एक साधारण आरोप आहे. 'रम्य भूतकाळ' ही मनोवृत्ती मराठी माणसाची खासियत आहे. आज चाळीशी - पंचेचाळीशीत असलेले लोक अभिषेकी, वसंतराव, कुमार, पु. लं, व.पु., (होय, जी.ए. सुद्धा!), रफी, मुकेश, तलत, साहिर, गुरुदत्त...( यादी बरीच मोठी आणि अपूर्ण, पण आशय ध्यानात यावा) यांच्या आठवणीने ' हाय, वो भी क्या दिन थे! असे म्हणताना दिसतात. त्याआधीची पिढी बघीतली तर ती अशीच कदाचित बालगंधर्व, हिराबाई, राज, दिलीप, देव, सैगल यांच्या आठवणींनी घायाळ होत असेल. 'काय दिवस होते राव!' ही प्रवृत्ती मराठी मनाचा अविभाज्य भाग झालेली दिसते. इराण्याचा चहा, क्वाड्रँग्युलर म्याचेस, नायडूचा सिक्सर, अशोककुमारची सिग्रेट, बिनाकाचे सरताज गीत, नेहरूंचा शब्द.... अशा भूतकाळात वाहून गेलेल्या गोष्टींविषयी मराठी मनात एक सुप्त आकर्षण आहे. यातून कदाचित नवे ते केवळ नवे म्हणून वाईट आणि जुने ते केवळ जुने म्हणून चांगले असा अंधभावही तयार होत असेल. पु. लं. च्या स्मृतीदिनानिमित्ताने अजूनही गहिवरलेले लोक पाहिले की (पु. लं. विषयी आभाळाइतका आदर ठेवूनही ) हा आजच्या कलाकारांवर अन्याय नाही का असे वाटू लागते.असे सगळीकडेच आहे की फक्त मराठी माणसाच्या बाबतीतच? एकूणच वर्तमानात रहायला मराठी माणूस इतका नाराज का आहे?