हिंदुस्तानी संगीत २ - शुद्ध, कोमल, तीव्र, इत्यादि

   रें  गं     मं  धं  नीं      रे           नी     र्रे  र्ग     र्म  र्ध  र्नी     रे     
सां  रें  गं मं  पं  धं  नीं सा  रे  ग म  प  ध  नी र्सा  र्रे  र्ग र्म  र्प  र्ध  र्नी सा  रे  ग


मध्य सप्तकातील पांढऱ्या पट्ट्या - सारेगमपधनीर्सा - आपण वाजवून व गाऊन पाहिल्या.
आता बरेच प्रश्न उभे राहतात.
या काळ्या पट्ट्या कसल्या? आपण सप्तकात ७ स्वर म्हणतो मग हे १२ स्वर कुठून आले? १२ च स्वर का? ३२ का नाहीत? रेषेवरच्या बिंदूंप्रमाणे अनंत (infinite) का नाहीत? हे स्वर नक्की हेच हे कोणी ठरवले? ते वेगवेगळ्या पेट्यांवर एकच असतात की वेगळे?
हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि या लेखात त्यांचीच उत्तरे जाणून घ्यायची  आहेत.
प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने पाहूया.
या काळ्या पट्ट्या कसल्या? आपण सप्तकात ७ स्वर म्हणतो मग हे १२ स्वर कुठून आले? - आपण वाजवलेल्या सारेगमपधनी या (पांढऱ्या) पट्ट्यांना शुद्ध स्वर म्हणतात. यापैकी सा हे स्वर अचल मानले जातात. बाकीचे स्वर "विकृत" होऊ शकतात (ही मला माहीत असलेली एकमेव विकृती आहे की जी आपल्याला आवडणारी, हवीहवीशी वाटणारी आहे). सा व रे यांमध्ये एक स्वर आहे. हा रे पेक्षा खालचा आहे. याला म्हणतात कोमल रे. हीच गोष्ट रे-ग, प-ध व ध-नी यांमध्ये होते. हे कोमल स्वर मी अधोरेखित करून दाखवले आहेत. ग-म यांमध्ये स्वर नाही, त्यामुळे कोमल म होत नाही, पण त्याऐवजी म-प यांमध्ये एक स्वर आहे, त्याला तीव्र म म्हणतात. हा मी जाड टायपात दाखवला आहे. पूर्ण यादी करायची तर
कोमल रे -> सा-रे यांच्यामध्ये - रे पेक्षा खाली - रे
कोमल ग -> रे-ग यांच्यामध्ये - ग पेक्षा खाली -
तीव्र म -> म-प यांच्यामध्ये - म पेक्षा वर -
कोमल ध -> प-ध यांच्यामध्ये - ध पेक्षा खाली -
कोमल नी -> ध-नी यांच्यामध्ये - नी पेक्षा खाली - नी
(आणि पुन्हा नी-सा यांच्यामध्ये स्वर नाही) हे पाच विकृत स्वर होतात. म्हणून आपल्या तथाकथित सप्तकात असे एकूण १२ स्वर येऊ शकतात.
१२ च स्वर का? ३२ का नाहीत? रेषेवरच्या बिंदूंप्रमाणे अनंत (infinite) का नाहीत? खरे आहे. रेषेच्या दोन टोकांच्या दरम्यान जसे अनंत बिंदू असू शकतात, तसेच सा व र्सा यांच्या दरम्यानसुद्धा अनंत स्वर का असू शकत नाहीत? तत्त्वतः असू शकतात. पण ऐकणारी जी माणसे आहेत त्यांना किती जवळचे दोन स्वर वेगळे ओळखता येतात याचाही विचार करावा लागतो. या बाबतीत आपल्या पूर्वसूरींनी असा निर्णय दिला आहे की आपल्याला सा-र्सा या दरम्यानचे २२ भिन्न स्वर ओळखता येतात. यांना श्रुती म्हणतात. प्रत्यक्ष व्यवहारात अशा बावीस श्रुती जाणणारे लोक फार दुर्मिळ आढळतात. या लेखकालाही हे बारकाईचे श्रुतिज्ञान नाही हे कबूल करावे लागेल. आणि त्यात कमीपणा मानण्याचे कारण नाही, ९०-९५% लोकांची  परिस्थिती/क्षमता हीच असते. (गंमतीत बोलायचे तर कोणी बेसूर गाऊ लागला तर तो श्रुतींमध्ये गातो आहे अशी आम्हा मित्रांत खवचटपणे म्हणण्याची पद्धत आहे.)
हे स्वर नक्की हेच हे कोणी ठरवले? ते वेगवेगळ्या पेट्यांवर एकच असतात की वेगळे? माझ्या मते हा आपल्या संगीतावरील पहिला व सर्वात जुना पाश्चात्य प्रभाव असावा. पेटी किंवा तत्सदृश वाद्ये येण्याआधीची बहुतेक भारतीय वाद्ये  (सारंगी, वीणा, इ.) स्वतः वादकाने स्वर लावण्याची होती असे वाटते. इतर बासरी वगैरे वाद्ये प्रत्येक वाद्यनिर्माता बनवेल तशी बनत असत. त्यात शास्त्रीय पद्धतीचे प्रमाणीकरण नसावे. पण जी कळपट्टीवाली वाद्ये आपल्याकडे युरोपातून आली त्यात स्वर बहुतेक ठराविक नादकाट्यावरून प्रमाणित केलेले असत. सा ची कंपनसंख्या २५६ व र्सा ची ५१२ हा मूळ निकष.  तसेच सां ची कपनसंख्या १२८ व सा ची १०२४ हे ही मग आपोआप ठरते. आता यात बारा स्वर बसवायचे म्हणजे ५१२/२५६ = २ याचे बारावे मूळ (१.०५९४६३) घ्यावे लागते (१.०५९४६३ गुणिले १.०५९४६३ गुणिले १.०५९४६३ असे बारावेळा = २). या युक्तीमुळे प्रत्येक दोन जवळच्या स्वरांतील अंतर एकच राहते. सा पासून रे  व रे पासून रे हे सारख्याच अंतरावर पडतात. ही आपली नेहमीची अंकगणिती श्रेणी नसून घातांक-प्रमाणातली (लॉग-स्केल) आहे याची नोंद घ्यावी.
या पद्धतीने ठरवलेल्या स्वरसप्तकाला संस्कारित पट्टी (tempered scale) म्हणतात. याचे कोणते फायदे आहेत त्याची चर्चा पुढे होईलच.
परंतु आपल्याकडच्या जुन्या विद्वानांच्या मते हे सर्व गणित चुकीचे आहे व अशा रीतीने ठरवलेले स्वर बरोबर किंवा खरे नाहीत. त्यांच्या मते जे खरे स्वर आहेत त्यांची नैसर्गिक पट्टी (natural scale) हीच योग्य पद्धत होय. हे स्वर अर्थात टेंपर्ड स्केलशी न जुळणारे होते.
हा स्वरस्थानांचा वाद फारच मूलभूत स्वरूपाचा असल्याने जुन्या विद्वानांचा गायनाच्या साथीला पेटी वापरण्याला कडक विरोध होता. शिवाय पेटीवर मींड (अखंडित स्वरालाप) काढता येत नाही असाही आक्षेप होता. याचमुळे आकाशवाणीवर कित्येक वर्षे पेटी ऐकू येत नसे. पण व्यवहारात पं. भीमसेन प्रभृति बहुतेक मोठ्या गायकांनीसुद्धा एक सोय म्हणून पेटीचा कधीच स्वीकार केला होता. कालांतराने श्रुतीवादी, नैसर्गिकपट्टी वादी, मींडवादी हे लोक बहुशः अल्पसंख्य होत गेले आणि पेटी आपल्याकडे पूर्ण रुळली (*** टीप पहा). आताच्या काळात "खरे" स्वर कोणते हे जाणणारे किती विद्वान मिळतील हा संशोधनाचा विषय आहे.
सध्याच्या काळात भारतीय व पाश्चात्य संगीतकारांचे बारा स्वर कोणते या बाबतीत एकमत आहे असे दिसते (तज्ज्ञांनी जरूर आणखी माहिती द्यावी.)
एक गोष्ट मात्र मानता येईल की सर्व चांगल्या ट्यूनिंग केलेल्या पेट्यांचे स्वर सारखे असणे अपेक्षित आहे. तसे नसले तर ह्या किंवा त्या पेटीचे स्वर/ट्यूनिंग चुकीचे आहेत असे म्हणावे लागेल व तेवढा उत्साह उरला असल्यास प्रत्यक्ष निर्णय प्रमाणित नादकाट्यांच्या सहाय्याने करावा लागेल.
गायक गातात ते तरी हेच स्वर असतात की वेगळे असतात? वरील सर्व तात्त्विक चर्चेचा डोस जरा जास्तच होऊन आपण थकले व कंटाळले असाल असे मानून या प्रश्नाचे उत्तर पुढच्या एखाद्या लेखात देईन म्हणतो.

आता काही सोप्या प्रात्यक्षिकांकडे वळू.
१. सारेगगगग गगगऽगग रेगम गऽगग रेऽरेरे नींरेसा - हे कोणते गीत आहे ते (उभे राहून) ओळखा पाहू.
२. सासासा सासासा सासासासा रे
   सासासा सासासा सासासासा रे
   धधध प रेरेऽऽऽ
   गगग रेरे सासाऽऽ
(कडवे) र्सार्सार्सा र्सार्सार्सा र्सार्सार्सा र्सार्सा
          र्रेर्रेर्रे र्रेर्रेर्रे र्रेर्रेर्रे र्रेर्रे

         नीनीनी धधप नीनीनी धध
         गगग रेरेसा गगग रेरे
हे कमालीचे एकसुरी पण एके काळचे लोकप्रिय हिंदी चित्रपटगीत कोणते? (हे असले शंकर-जयकिशन यांचे उत्तरकालीन संगीत!)
३. साऽऽरेग सारेसाधं पंधंसारेगप गपगरेसा धं सा
हा संगीत तुकडा कोणत्या हिंदी गाण्यातला आहे (संगीतकार खय्याम)
४. वर दिलेल्या पद्धतीने गाण्याचे स्वर लिहिण्याला सरगम करणे किंवा "नोटेशन" लिहिणे असे म्हणतात. तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या गाण्याचे सरगम करून लिहून पहा/द्या. इतर विद्यार्थी, तात्या किंवा मी यापैकी कोणीतरी तपासून पाहील. प्रत्येकाला डबल काम!


आता पुढच्या लेखात पट्टी बदलून मी तुमच्या आणि आतापर्यंत तुम्ही शिकलेल्या माहितीच्या पायाखालची सतरंजी ओढणार आहे, सावध!
---------------------------------------------------------
तळटीप १ - (***) या वादात मी अवघड जुनी किंवा सोयीस्कर नवी यापैकी कोणतीही बाजू घेऊ शकत/इच्छीत नाही. पेटीचा सार्वत्रिक स्वीकार झाल्यामुळे कदाचित आपण काहीतरी मौल्यवान पारंपरिक ज्ञान गमावूनही बसलो असू. कदाचित असे काही एक सत्य नसून नुसताच वेगवेगळ्या विद्वानांत भिन्न भिन्न स्वर खरे असा मतभेदांचा गदारोळ होता/असेल व त्याची कोठेही शास्त्रशुद्ध नोंद नसेल किंवा एखादवेळ असेलही. सत्य काय हे कसे व कोणी सांगावे? कोणी एखादा ज्ञानीच यावर अधिकारवाणीने आणखी काही सांगू शकेल. (पण तो मी नव्हे)
मीही पेटी किंवा कॅसिओची मागणी करण्यापूर्वी या वादाचा यथाशक्ती विचार केला (अशी मागणी करून मी सर्वांना सांगीतिक उन्मार्गाला तर लावत नाही ना?) व शेवटी महाजनाः येन गताः स पंथः असे म्हणून सोईस्कर मार्ग स्वीकारला.

तळटीप २ - काही तज्ज्ञांनी व वादकांनी बावीस श्रुती वाजवता येतील अशा व सर्वदोषविरहित अशा आपापल्या खास पेट्या बनवल्या/बनवून घेतल्या आहेत (अशा प्रयोगशील व्यक्तींपकी पं. मनोहर चिमोटे यांचे नाव लगेच स्मरते). पण अशी पेटी तोच वादक वाजवू शकेल व ते तंत्र बरेच किचकट असणार यात शंका नाही. अशा प्रकारची पेटी बाजारात उपलब्ध नसावी. तरबेज वादक पेटीवर मींड काढून दाखवू शकतात असेही ऐकले आहे.
असो. सामान्य माणसाला आपली नेहमीची पेटी बरी असे माझे मत.