रात्र झाली गोकुळी

'कारट्या, किती भूक भूक करशील...' घरोघरी ऐकू येणारा संवाद. वाढत्या वयाच्या मुलांची भूक असतेच अशी न संपणारी. पण या लटक्या तक्रारीमागे खरे तर असते कौतुकच. आपल्या मुलांनी भरपूर खावे आणि भरभर मोठे व्हावे अशी सगळ्या आईवडीलांची मनीषा असते. त्यांना तसे करताना बघणे यातून आईवडीलांना खूप खूप समाधान मिळत असते.
पण हे झाले सर्वसामान्य, खाऊनपिऊन सुखी घरातले चित्र. जिथे या भुकेमागे भयाण दारिद्र्याचा काळाकुट्ट भेसूर पडदा असतो तिथे ही नैसर्गिक भूक अगदी भयानक, विदारक रूप धारण करते. शाळकरी वयातला कृष्णा हा असाच वाढत्या वयाचा मुलगा. त्याचे पोरपण अजून संपलेले नाही. दारिद्र्य, गरीबी याची त्याला जाणिवही नाही. भूक लागली की खायला हवे इतक्या निरागस त्याच्या भावना. तो शाळेतून घरी येतो तोच भुकेने कलकलून. त्याचे घर म्हणजे तरी काय,एका बाजूला तट्टे आणि दुसऱ्या बाजूला रॉकेलच्या डब्यांचे गंजलेले पत्रे लावून कसाबसा केलेला आडोसा. त्यातच सतत धूर ओकणारी ओलसर चूल. खोकल्याच्या उबळीने प्राण कंठाशी आलेली त्याची आई, खंगत चाललेली त्याची बहीण दुर्गी, जिच्या दवाखान्यातल्या नोकरीच्या तीस रुपये महिना पगारावर कसाबसा संसार चालतो ती कामाने दमून चिंब झालेली दुसरी बहीण शकी आणि अठराविश्वे दारिद्र्याबरोबर झट्या घेणारा, छातीत डाव्या बाजूला तापलेली सुई खुपसावी तसे होत असताना हेडक्लार्कच्या घरी दोन गाड्या लाकडे माळ्यावर रचून लोळागोळा झालेला त्यांचा बाप दाजी....
कृष्णाला घरी खायला काही नसते. त्याचा चहाही गरम झालेली नसतो.कोमट काळसर गुळाच्या चहाचा कप त्याच्यासमोर आई आदळते. "अगदी दुष्काळात जन्मलंय कारटं.." ती करवादते. "नुसता चहाच प्यायचा? ते कालचे चिरमुरे संपले?" कृष्णा चिडून विचारतो. तेलहळद लावलेले ते मूठभर चिरमुरे कधीच संपलेले असतात. कृष्णा परसात जाऊन उभा रहातो. समोरच्या घरातली मुले पोह्याच्या ताटल्या घेऊन बाहेर आलेली असतात. भूक असह्य होऊन आपल्या घराकडे भीतभीत पहात कृष्णा एकापुढे हात करतो. तो मुलगा आपला रिकामा हात फटदिशी कृष्णाच्या हातावर मारतो....
शेजारच्या वकीलांच्या परसात दोडके, दुधी भोपळे फोफावलेले असतात. ते चोरून भटाच्या भाजीच्या दुकानात विकले की भट दोन आण्याचे बटर, बिस्कीटे देत असतो. या वेळी कृष्णा ते चोरत असताना भोपळ्याचा मांडवच कोसळतो आणि वकीलांचा गडी कृष्णाला बेदम मारतच घरी घेऊन येतो. "मी कशाला घेऊ यांची भाजी?" हुंदके देत कृष्णा खोटे बोलतो...
कृष्णाची आई कण्हत कसाबसा स्वयंपाक करत असते. स्वयंपाक म्हणजे काय..घरात भातापुरते तांदूळही नसतात. दुपारच्याच अपुऱ्या भाकरी, तुरट, बियाळ वांग्याच्या फोडी आणि मूठभर डाळ  घातलेली लालसर बेचव आमटी आणि गाठी झालेल्या एवढ्याशा डांगराच्या पिठात घातलेले थेंबभर काळसर ताक.... हेच त्यांचे जेवण.तेही अपुरे. दुर्गीला अन्नाची वासनाच नसते. तिचा भाकरीचा चूर खाऊनही कृष्णाची भूक तशीच रहाते. वाढत्या वयातील मुलाच्या पोटातील न संपणारी भूक...
सगळेच अंधारात आडवे होतात. कृष्णाला काही झोप येत नाही. अंधारातच तो खुडबुड करू लागतो.चुरमुऱ्याच्या डब्यातले खालचे उरलेले तिखट, आईने ठेवलेले उपासाचे दाणे..त्याला काही काही सापडत नाही. घटघटा पाणी पिऊन तो परत आडवा होतो. शेजारची आचरट  पोरे कृष्णाच्या घराच्या पत्र्यावर दगड फेकण्याचा खेळ सुरु करतात. गल्लीतली कुत्री वचावचा ओरडू लागतात..
"खीर खीर म्हणून बाळाने हट्ट धरला, म्हणून केली कपभर, पण त्याने बोटसुद्धा लावलं नाही. शिवाय ही बटाट्याची भाजीदेखील उरली" शेजारच्या घरातून आवाज येतो "काय करायचं आता?"
"आता असं कर.. सकाळी ते सगळं देऊन टाक शेजारी.."
कृष्णा एकदम खुलतो. 'सकाळी देण्याऐवजी आत्ताच का देत नाहीत? मी स्वतः जाऊन आणतो हवे तर..'पण शेजारचे घर बंद होते..
घरात घुशींची खरखर सुरु होते. आईला बरगड्या बाहेत पडतील की काय अशी खोकल्याची ढास लागते. न संपणारी लांबलचक काळी रात्र सुरु होते..
कशाने तरी कृष्णाची झोप चाळवते. "उजाडलं आई?" तो आशेने विचारतो. अजून रात्रच आहे हे पाहून तो हिरमुसतो आणि काही तरी बडबडत पुन्हा झोपतो..त्याच्या झोपेत येते ती खीर. शेवयांची, केशरी रंगाची, मधून-मधून बेदाणे असलेली चांगली पातेलेभर दाट खीर..


"उजाडलं आई?" हा कृष्णाचा प्रश्न कृष्णाची सारी वेदना व्यक्त करून ह्रदय कापीत जातो. अशी ही ह्रदय पिळवटून काढणारी कृष्णाची आणि त्याच्या गोकुळाची कहाणी. असे कोट्यवधी कृष्णा महान सांस्कृतिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या भारत-भूमध्ये केविलवाणे जीवन निमूटपणे जगत आहेत. स्वातंत्र्य आले, योजना आल्या आणि गेल्या, कार्यक्रम आले, राबताहेत, पण कृष्णा आहे तिथेच आहे. रात्र संपून उजाडण्याची वाट पहात आहे. केशरी रंगाची दाट खीर....


कथेचे नाव 'रात्र झाली गोकुळी' लेखक अर्थातच जी.ए.कुलकर्णी. कथासंग्रह 'पारवा'. वरील शेवटच्या परिच्छेदाचे लेखक धनंजय आचार्य.