चैत्र

जी.एं. च्या कथा फार दीर्घ असतात हा त्यांच्यावर नेहमी घेण्यात येणारा आक्षेप आहे. हे बरेचसे खरेही आहे. 'काजळमाया' या त्यांच्या कथासंग्रहातील कथाच बघा. एकेके कथा पंचवीस - तीस पानांची.  पण हे म्हणजे तीन मिनिटांची  (रिमीक्स) तबकडी ऐकणाऱ्याने 'तो तुमचा बडा ख्याल म्हणजे फारच मोठा असतो बुवा' अशी तक्रार करण्यासारखे आहे. पण जी.एं. नी काही अगदी छोट्या,तरीही विलक्षण परिणामकारक कथा लिहील्या आहेत. 'कुसुमगुंजा' हा एक अशा कथांचा संग्रह. जी.एं. च्या बऱ्याच कथा लघुकथेच्या निरगाठ, उकल अशा तंत्राने जाताना दिसतात. आणि काहीकाही कथांच्या शेवटात ते धक्कातंत्राचा इतका प्रभावी वापर करतात की वाचक शेवटच्या वाक्यानंतर हेलपाटत जातो.
'चैत्र' ही मला आवडलेली अशीच एक कथा. कथानायक परत एक छोटासा मुलगा. लहानशा खेड्यात रहाणारे त्याचे कुटुंब. घरी आई आणि बाबा. आर्थिक परिस्थिती बेताचीच. या खेड्यातल्या ज्येष्ठ इनामदारीणबाई त्यांच्या वाड्यावर चैत्राचं हळदीकुंकू ठेवतात. सगळ्या गावातल्या सवाष्णींना आमंत्रण जाते. इनामदार बाईंची नवी सून तिच्या दृष्टीने हलक्यासलक्या या अशा बायकांना बोलवायला नाखूशच असते. हा छोटा मुलगा आणि त्याची आई पन्हं-कोशिंबीर घ्यायला उभे असताना चारचौघात ती सून त्यांना म्हणते "हे काय, मगाशी येऊन गेलात ना तुम्ही? पन्ह्यासाठी किती हावरटपणा करायचा बाई माणसानं?"
या मुलाची आई शांतपणे देवापुढचं हळदीकुंकू उचलते आणि मुलाच्या हाताला धरून घरी येते. ती फारसे बोलत काहीच नाही, पण तिचे मन अगदी विस्कटून गेलेले असते. दुसरे वर्ष येते. आई आपले सगळे दागिने, घरातले किडूकमिडूक काढून बाबांसमोर ठेवते. म्हणते "हे सगळं विकावं लागलं तरी चालेल, पण मला सगळ्या गावाला हळदीकुंकवाला बोलवायचं आहे".  त्याप्रमाणे तसे ती करतेही. इनामदार बाई आणि त्यांची सून दोघीही आलेल्या असतात. इनामदार बाई त्यांचा कापरा हात आईच्या पाठीवर ठेवतात "हे बघ, माझे आता फार दिवस राहिले नाहीत. माझ्यासाठी म्हणून काही काही मनात ठेवू नकोस". आई त्यांना समाधानाने वाकून नमस्कार करते.
त्याही पुढचा चैत्र येतो. इनामदार बाई स्वतः हळदीकुंकवाचं बोलावणं करायला येतात. त्यांची चाहूल लागताच आई न्हाणीघरात आंघोळीला जाते. "नक्की यायचं बरं का..." असं सांगून इनामदार बाई देवासमोर हळदीकुंकू ठेवून निघून जातात.
आई बाहेर येते. "बिचाऱ्या इतक्या प्रेमानं इथपर्यंत आल्या, म्हटलं मुद्दाम कशाला त्यांच्यासमोर यावं?" ती मुलाला जवळ घेऊन म्हणते." आणि आज ना उद्या त्यांना कळणारच.."


आणि मग अर्धवट अजाण, अर्धवट जाणता असा तो मुलगा कावराबावरा होऊन  विचारतो
"म्हणजे गेल्या वर्षी बाबा वारले, हे त्यांना सांगायचं नव्हतं होय?"