पावसाची नक्षत्रे आणि वाहन

पावसाची नक्षत्रे आणि वाहन


दिनदर्शिकेवर जून ते ऑक्टोबर महिने पाहिल्यास काही तारखांना सूर्याचा नक्षत्र प्रवेश आणि त्याच्या वाहनाचे नाव लिहिलेले आढळते. उदा. ८ जून २००६ ला सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश - वाहन कोल्हा असे वाचायला मिळेल. पावसाची सहसा ९ नक्षत्रे मानली जातात. त्यावरूनच २७-९=० ही कूटप्रश्नाची कथा प्रसिद्ध आहे. पण दिनदर्शिकेत मृग ते स्वाती अशी एकूण ११ नक्षत्रे दिली जातात. मान्सूनपूर्व पावसाचे रोहिणी हे देखील नक्षत्र धरले जाते. सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गात वर्षातील ठराविक दिवशी एक एक करीत २७ नक्षत्रे (आणि अर्थात १२ राशी) सूर्यापलिकडील आकाशात जात राहतात. हाच सूर्याचा नक्षत्र प्रवेश.
वाहन काढण्याची पद्धत: सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्रनक्षत्रापर्यंत नक्षत्रसंख्या मोजावी आणि येणाऱ्या संख्येस ९ ने भागावे. जी बाकी उरेल त्यानुसार प्रत्येक अंकास एक एक प्राणी वाहन म्हणून दिला आहे.
_______________________________________________________ 
बाकी            वाहन            बाकी        वाहन
_______________________________________________________
०                हत्ती               ५          मोर
१                घोडा              ६          उंदीर 
२                कोल्हा            ७          म्हैस
३                बेडुक             ८          गाढव
४                मेंढा
_______________________________________________________


 यातील हत्ती, बेडुक आणि म्हैस या वाहनांना भरपूर पाऊस तर उंदीर, गाढव,मेंढा  यांना कमी पाऊस अपेक्षित असतो तर मोर, कोल्हा आणि घोडा आल्यास  मध्यम पाऊस पडेल असे मानले जाते. योगायोग म्हणजे मागील २६ जुलैला बेडुक हे वाहन होते. तर नुकत्याच ३१ मेला रोहिणी नक्षत्रात पडलेल्या मुसळधार पावसाच्या वेळचे  वाहन काढले असता ते खूप पावसाचे भाकित करणारे म्हैस येते (२५ मे) . सध्या कोल्हा हे कमी पावसाचे  वाहन सुरू आहे आणि पाऊस नेमका गायब झाला आहे. आगामी आर्द्रा नक्षत्राला उंदीर हे वाहन आहे.  
   २१ व्या शतकात हवामान खात्याकडे अत्याधुनिक यंत्रणा, प्रत्यक्ष ढगांचे छायाचित्र देणारे  उपग्रह उपलब्ध असताना अशा पारंपारिक पद्धतीवर किती विश्वास ठेवायचा हा  प्रश्न निर्माण होऊ शकतो.पण हवामान खात्याचे अनुमान पाहता दिसून येते की ते विशिष्ट घटकांवर अवलंबून असते  ज्याच्या आधारे हवामानखाते किती टक्के पाऊस पडेल याचा अंदाज फक्त त्या वर्षापुरता जाहीर करते. तसेच पावसाळा सुरू झाल्यावर येणारे अनुमान हे पुढील काही दिवसांसाठीच असते. पण या वाहन पद्धतीत पुढील अनेक वर्षांचे अनुमान करता येऊ शकते. या पद्धतीची फलज्योतिषाशी गल्लत न करता स्वतंत्रपणे अभ्यास का केला जाऊ नये? नक्षत्रांशी संबंधित वाहनांवरून गेल्या काही  वर्षांच्या पावसाच्या नोंदी तपासून का बघू नयेत? तसेच आगामी दिवसातील वाहनांनुसार पाऊस पडतो का हे ही दिसेलच. ही पद्धत फक्त महाराष्ट्र वा भारतालाच लागू होते की संपूर्ण जगाला लागू पडते यावर संशोधन का होऊ नये?
या संदर्भात अधिक माहिती असल्यास मनोगतवर द्यावी ही विनंती.    


-मंदार