पायवाट

चेहरे हे रोजचे अन् रोजचे चाले रहाट
चालवेना यापुढे पण ही अनादी पायवाट


का दिसेना या प्रवासी माणसांची खूण एक
हिंस्त्र सारी श्वापदे अन् भोवताली रान दाट


काल होती बाग येथे, वृक्ष डेरेडार उंच
सापडेना शोधुनी, झाला तियेचा नायनाट


प्रेम होते, मोल होते, भावनांचे जीवनात
बैसतो बाजार तेथे वासनेचा हा विराट


स्पंदने माझ्या मनाची कोंडली वाफेसमान
पापण्यांच्या आड आहे रोखलेला रक्तपाट


जाणिवांच्या निर्झराचा जाहला का क्षीण ओघ
कोषबंद्यांना कसा उमजेल माझा तडफडाट


सांग हा संपेल केव्हा पैलतीराचा प्रवास
रात्र अंधारी सरेना, दूर सोनेरी पहाट


प्राक्तनाचा खेळ चाले, जन्म घेतो मी नवीन
आज सटवाई नव्याने कोर तू माझे ललाट