हिंदुस्तानी संगीत ३ - पट्टी बदललीः तरंगते स्वराकार

या लेखात गायनाची "पट्टी" म्हणजे काय हे पहायचे आहे.


पट्टी या शब्दाचे या लेखमालेत पूर्वी आलेले अर्थ - विशेषतः कळपट्टी (keyboard), नैसर्गिक पट्टी (natural scale) या संदर्भातले - आता बाजूला ठेवावे व विसरावे लागतील, कारण आपल्या संगीताच्या भाषेत पट्टी या शब्दाला काही विशिष्ट आणि आधीच्यापेक्षा वेगळा अर्थ आहे.
पट्टी या शब्दाचे पूर्वीचे उल्लेख बोर्ड, स्केल यासाठी प्रतिशब्दाच्या स्वरूपात - काहीसे नाइलाजाने योजिलेले - होते, पण आताचा हा शब्द अस्सल मराठी वापरातला असणार आहे. जो थोडासा गोंधळ आपल्या मनात होणार आहे त्याबद्दल क्षमस्व.
पट्टी या शब्दाकडे आता नव्याने पहावे ही विनंती.


खालील तीन ओळीतले नोटेशन (= स्वरलिपी = सरगम) नजरेखालून घाला -
        सा  रे  ग म  प  ध  नी र्सा   (पांढरी १)
        रे     म   नी  र्सा  र्रे  (काळी १)
        रे   ग  प  ध  नी  र्रे   रे  (पांढरी २)
आता या तीन स्वरांच्या ओळी पेटीवर वाजवून पहा. या तिन्हींत काही साम्य वाटते आहे की नाही ?
रसिक वाचकानो, हा या अभ्यासमालेतला तुमच्या दुसऱ्या परीक्षेचा क्षण आहे.
थोडे थांबा व तपासून पहा की या सगळ्या ओळींत तुम्हाला नेहमीचे सारेगमपधनीर्सा (सगळे शुद्ध स्वरांचे सप्तक) च ऐकू येते आहे की नाही.
हे असे कसे झाले?
कोऑर्डिनेट-भूमितीत आपण जसे मूलस्थान (ओरिजिन) बदलतो तसे येथे झालेले आहे.
एखादी भौमितिक आकृती असावी आणि मूलस्थान कितीही बदलले, तिच्या सर्व टोकांच्या कोऑर्डिनेट्स् च्या किमती कशाही बदलल्या तरी तिचा आकार तोच दिसावा तीच गोष्ट येथे होत्ते आहे. या सापेक्षतेचेच हे सांगीतिक रूप आहे.
प्रत्येक ओळीत गृहीत धरलेले मूलस्थान शेवटी कंसात दिलेले आहे याचीही नोंद घ्यावी.
त्या-त्या ठिकाणी गृहीत धरलेल्या मूलस्थानालाच संगीतात पट्टी असे म्हणतात.
आणखी स्पष्ट करायचे तर जेव्हा आपण
         सा  रे  ग म  प  ध  नी र्सा
असे गातो किंवा वाजवतो, तेव्हा आपण खरे तर एकमेकांपासून समान अंतरावर असलेल्या सगळ्या स्वरांमधील क्रमाने
          १ला- ३रा-५वा- ६वा- ८वा-१०वा-१२वा-१३वा
हे स्वर गात/वाजवत असतो.
याची जरा मोजून खात्री करून घ्या.
    सा रे रे ग म ध  नी  नी र्सा
    १  २  ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३
असे अंक देऊन स्वर मोजले तर हे कळू शकते.
आता हे आपण गेल्या लेखातच पाहिलेले आहे की पेटीच्या कळपट्टीवरचे कोणतेही जवळचे स्वर एकमेकांपासून एकाच अंतरावर असतात.
हे एकदा समजून घेतले की आपण पेटीवरील कोणत्याही स्वरावर सुरुवात करून १ला- ३रा-५वा- ६वा- ८वा-१०वा-१२वा-१३वा अशा क्रमाने स्वर वाजवीत गेलो की आपोआप
सा  रे  ग म  प  ध  नी र्सा
याच सांगीतिक आकाराचे-पॅटर्नचे स्वर वाजणार हे आता स्पष्ट व्हावे.
[ही सोय संस्कारित किंवा टेंपर्ड स्केलवाल्या पेटीमुळे झाली आहे हे उघड आहे, नॅचरल स्केल असते तर हे सहजासहजी जमले नसते. टेंपर्ड स्केल सर्वत्र का स्वीकृत केले गेले याचे हे सर्वात पटणारे उत्तर वाटते.] 

गृहपाठ १ - पांढरी एकपासून पांढरी सात पर्यंत अशा बारा स्वरांपैकी प्रत्येक स्वरापासून सुरू करून वरीलप्रमाणे शुद्ध स्वरांचे सप्तक वाजवून पहा. खरे तर याप्रमाणे कुठल्याही स्वरापासून सारेगम वाजवायला जमले तर अतिशय फायदा होऊ शकतो. हे कौशल्य इतके महत्त्वाचे आहे की याचा सराव जितका कराल तितकी तुमची वादनाची विशेषतः कोणत्याही गायकाला साथ करण्याची क्षमता वाढत जाईल.


(जाता-जाताः बहुतेक पेटी वादकाना काळी १, काळी ४ अशा ठराविक पट्ट्यांत साथ करण्याचा चांगला सराव असतो. पण किंचित कच्च्या वादकांना पांढरी ३, पांढरी ५ अशा विचित्र व अप्रचलित पट्ट्यामध्ये वाजवायला सांगितल्यास त्यांची फे-फेही उडू शकते.)


म्हणजे आता आपल्याला हे समजले की कुठलीही पट्टी घेऊन आपण सप्तक वाजवू शकतो, पण याचा फायदा काय?
हे समजून घेण्यासाठी एक करा -पांढरी एकपासून पांढरी सात पर्यंत अशा बारा स्वरांपैकी प्रत्येक स्वरापासून सुरू करून जे सप्तक आपण वाजवून पाहिले ते गाऊनही पहा.
तत्त्वतः ठीक आहे हो ! पण प्रत्यक्ष गायचा प्रयत्न केला की आपल्याला लगेच समजते की आपल्या आवाजाला मर्यादा आहे. एका ठराविक रेंज-आवाक्यामध्ये आपला आवाज चालतो, त्याच्या अलीकडे एक तर घशातून आवाज फुटत/निघत नाही आणि त्याच्या पलीकडे आवाजाला ताण पडतो किंवा आवाज "चिरकतो" किंवा किरटा/खोटा/चोरटा येतो. (* तळटीप पहा)
आणि यात अनैसर्गिक वा चुकीचे काही नाही. अहो, प्रत्येकाच्याच आवाजाला, त्याच्या आवाक्याला मर्यादा असतेच. महान गायकही याला अपवाद नाहीत.
कळीची गोष्ट ही आहे की आपला आवाज नक्की कोणत्या रेंजमध्ये नीट "चालतो", म्हणजे सहज संचार करतो, स्वतःला आणि इतरांना चांगला वाटतो हे आपल्याला जाणून घ्यावे लागते.
आधी आपण पाहिलेले आहे की बहुतेकांचा आवाज १॥ ते २ सप्तकांत चालतो. पण यातही वरखाली होऊ शकते.
२ च सप्तके चालणारा आवाज जरी घेतला तरी त्या आवाक्याची सुरुवात व शेवट वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो. उदा. एखाद्याचा आवाज पेटीच्या मंद्र पांढऱ्या ५ पासून तार पांढऱ्या ५ पर्यंत चालतो. एखादीचा आवाज पेटीच्या मध्य पांढऱ्या १ पासून अतितार पांढऱ्या १ पर्यंत चालेल.
याचाच अर्थ असा झाला की प्रत्येक गायकाला स्वतःच्या आवाजाचा आवाका पाहून कुठल्यातरी एका विशिष्ट सुराला सा मानून गायन करावे लागते. याला त्या गायकाची गाण्याची पट्टी म्हणतात. मग त्याचे संपूर्ण गायन रसिकांनासुद्धा त्या पट्टीच्या सापेक्ष पहावे/ऐकावे लागते. ही सापेक्षता हिंदुस्तानी संगीतात अंतर्भूत आहे.
आणि आपल्या सापेक्षतेच्या धारणेला अनुसरून आपण नाही का कुठल्याही गाण्याची चाल एकदा समजली की ती आपल्याला जमेल त्या पट्टीत म्हणतो व दुसऱ्या कुणी वेगळ्याच पट्टीत ते गाणे म्हटले तरी त्याला आक्षेप न घेता ते बरोबर ओळखतो ?
म्हणजेच स्वराकार एकच असला की तो इकडे-तिकडे कुठेही तरंगला तरी आपल्याला त्याची ओळख पटायची रहात नाही. [** तळटीप पहा]
स्त्रियांचे आवाज सहसा नैसर्गिकपणे पुरुषांच्या एक सप्तक वरचे असतात.
पण त्याची आपल्याला अडचण होत नाही. आपण सर्व, कानावर भारतीय/हिंदुस्तानी संगीताचे संस्कार झालेले लोक, कोणी दोघांनी एकत्र द्वंद्वगीत गायिले तर हा एका सप्तकाचा फरक जणू नाहीच आहे अशा भावनेने ऐकतो व आवडून घेतो.

एवढे ज्ञान प्राप्त झाल्यावर आता भलतीच पंचाईत झाली - पेटीवरील कोणताही स्वर अमुकच आहे असे आता आपण म्हणू शकणार नाही - कारण एकच स्वर एका पट्टीसाठी शुद्ध मध्यम, तर दुसरीसाठी तीव्र मध्यम, तर तिसरीसाठी शुद्ध पंचम होऊ शकतो हे वर पाहिलेच आहे.
आणि आपले रागसंगीत तर पूर्णपणे शुद्ध-कोमल-तीव्र स्वरांवर आधारलेले/बेतलेले आहे. शिवाय आधी म्हटल्याप्रमाणे षड्ज हा गायनाचा मूलाधार आहे, सर्व काही त्याच्यावर अवलंबून. तेव्हा गायक कोणत्या पट्टीत गातो आहे ते श्रोत्यांना माहीत असणे वा समजणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
गवई कोणत्या पट्टीत गातो आहे हे जर समजले नाही तर कुठले स्वर शुद्ध-कोमल-तीव्र आहेत तेही समजणार नाही व मग राग कोणता हेही कळणार नाही. आता सगळेच डळमळीत झाले.
हे मूलस्थान, ही पट्टी, आपल्याला/ऐकणाऱ्याला कशी कळणार कशी ?

दुसरी गोष्ट म्हणजे समजा आपण स्वतःच गाणार आहोत. कसाही, कितीही आवाक्याचा आवाज असला तरी त्याला अनुरूप अशा योग्य पट्टीत गायन केले तर ते अधिक सुमधुर वाटते आणि श्रोत्यांना ते आवडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. मग आपल्या आवाजाला योग्य अशा कोणत्या पट्टीत गावे हे आपण नक्की कसे ठरवायचे? 

या दोन्ही प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात पाहूया.

गृहपाठ २ -
७. पांढरी ४ पट्टी घ्या. म्हणजे तिला सा मानून "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे गाणे आपल्याला वाजवायचे आहे. तुम्हाला सूर कळावे म्हणून मी ही ओळ कशी वाजवायची ते सांगतो -
            परा धीऽऽन   आऽऽहे  जगतीऽ   पुत्र माऽन वाचा
            नीरे गप ग  पप     रेगगऽरे   नीरे गग साऽ सा     
हे वर लिहिलेले स्वर पट्टीसापेक्ष म्हणजे आपल्या संगीताप्रमाणे खरे स्वर आहेत. पेटीवरच्या कळी वेगळ्या वाजवाव्या लागतील. त्या कोणत्या हेच तुम्हाला शोधून काढायचे आहे. पहिले दोन स्वर पां ३, पां ५ आहेत.
(हिंट - बहुतेक स्वर पांढऱ्या कळींवर वाजतील.)
८. (मंद्र) काळी ५ पट्टी घ्या. "मन तरपत हरी दरशनको आज" हे गाणे वाजवायचे आहे. सुरुवात करून देतो -
          मन तरपत   हरी दरशनको   आऽज
         
मम सा नीसा धनीसामम ऽ म
पुन्हा हे वर लिहिलेले स्वर पट्टीसापेक्ष, आपल्या संगीताप्रमाणे खरे स्वर आहेत. पेटीवरच्या कळी वेगळ्या वाजवाव्या लागतील. त्या कोणत्या हे तुम्हाला शोधून काढायचे आहे. पहिला शब्द काळी २ वर वाजेल.
(हिंट - बहुतेक स्वर काळ्या कळींवर वाजतील.)
------------------------------------------------------------
तळटीप १ * - आवाजाच्या नैसर्गिक मर्यादेच्या वरचे स्वर गायचा प्रयत्न केला तर त्याला चोरटा आवाज किंवा फ़ाल्सेटो म्हणतात. तो नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळा वाटतो. किशोरकुमार त्याचे पेटंट यूडलेई-ओडलेई वगैरे करत असे त्याला "योडेलिंग" म्हणतात. ते करण्यासाठी नेहमीच्या आवाजातले स्वर व फ़ाल्सेटो आवाजातले स्वर हे एकामागून एक म्हटले जातात.
अगदी गरज असल्याशिवाय कोणी फ़ाल्सेटोमध्ये गात नाही आणि ते ऐकायला विशेष बरेही वाटत नाही. 
तळटीप २ ** - माझ्या समजुतीप्रमाणे पाश्चात्य शास्त्रीय संगीतात अशी सापेक्षता नाही. त्यांचे संगीत फक्त पॉलिफ़ोनिक (बहुध्वन्यात्म) च नव्हे तर ऍब्सोल्यूटही (पट्टी-निरपेक्ष) असते. ते आधीच केलेल्या संगीतरचनेसाठी अनुरूप असा/असे आवाज शोधतात.
त्यांच्याकडे पुरुष व स्त्रिया यांच्या आवाजांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात येते -
पुरुषः बॅस (किंवा बास), बॅरिटोन, टेनॉर
स्त्रियाः अल्टो, कॉन्ट्रॅल्टो, सोप्रानो
उदा. (माझ्या मते) भीमसेनांचा आवाज बॅसमध्ये तर लताबाईंचा आवाज सोप्रानोमध्ये मोडतो.