२१ जून आणि वृत्तवाहिनी

आज २१ जून म्हणजे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस. ओघाने दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस. या निमित्ताने इंग्रजीतील शेवटच्या अक्षराचा अमेरिकन उच्चार असणा-या एका हिंदी वृत्तवाहिनीने खास कार्यक्रम ठेवला होता. दरवर्षी घडणा-या  या भौगोलिक घटनेला एवढे महत्व दिल्याबद्दल आधी थोडे कौतुक वाटले पण नंतर भ्रमनिरास झाला. कारण .....


१) आज मोठा दिवस कसा आहे याचे स्पष्टीकरण देणारे कोणतेही ग्राफिक्स / ऍनिमेशन दाखवले गेले नाही. उ. ध्रुव जास्तीत जास्त सूर्याच्या दिशेला असल्याने दिवस मोठा आहे हे सहज दाखवता आले असते. हा काही धरतीका सबसे बडा दिन नाही हे वाहिनीने लक्षात घ्यायला हवे.


२) उज्जैन शहर कर्कवृत्तावर असल्याने आज तिथे सूर्य डोक्यावर आला की थोड्या वेळासाठी सावली गायब होईल याचेच कौतुक. यात काय विशेष आहे? मुंबई १९ अंशावर आहे .१९ अंशावर सूर्य येईल त्या दिवशी मुंबईतही सावली पायाखाली येईलच की. असे २ दिवस विशिष्ट दिवस असतील. (साधारणपणे  ४ जून आणि ८ जुलै. या तारखा अंदाजे काढल्या आहेत. (माझ्या कडील प्रोग्रॅमने २७ जुलै  आणि १५ मे येतात. नंतर अद्ययावत करेन ) थोडक्यात २१ जून ला सावली  पायाखाली येणे वा न दिसणे ही काही एकमेवाद्वितीय घटना नाही.


३) एका ज्योतिषीला  आमंत्रित केले गेले होते. हल्ली कोणतीही खगोलीय घटना असेल तर कुणा ज्योतिषीला बोलावण्याचे फॅड सुरू झाले आहे. लोक त्याला फोन वर जन्मतारीख व जन्मवेळ देऊन प्रश्न विचारत होते आणि हे पंडित ताबडतोब "हे करा नि ते करू नका सांगत होते."


४) सूर्यग्रहणाच्या वेळी सूरज पर पडी चांद की  छाया आणि शुक्र अधिक्रमाणाच्या वेळी सूरज पर पडी शुक्र की छाया असे वारंवार ठोकून देणा-या या वाहिनीचे घोषवाक्य मात्र हकीकत जैसी खबर वैसी असे आहे. आहे ना विनोद?