भरात आहे..
ज्वानी भरात आहे, मदमस्त रात आहे,
मुखचन्द्र मेनकेचा, माझ्या करात आहे!
जो ना दिसे कधीही, का पूजिता तयाला?
-नारायणास शोधा, नक्की नरात आहे!
ह्या चंद्र-रोहिणीला, भेटावयास आता,
पाण्यातल्या दिव्यांची, आली वरात आहे
मी खोदतो कधीचा, आटून जाय तॄष्णा,
केंव्हा मिळेल पाणी; कुठल्या थरात आहे?
फिरवून बोट माझे, ह्या ब्रेलच्या लिपीवर,
मी शोधितो स्वत:ला, ह्या अक्षरात आहे!
घ्या आज शायरांनो, भरुनी हरेक प्याला
दरिया रितेपणाचा, ह्या अंतरात आहे!
-मानस६