अशीच एक बालकथा...

(अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा, बाटलीतला/ली जिनी वगैरेंच्या धर्तीवरची अशीच एक लहानपणी वाचलेली [आणि आवडलेली] ही एक बालकथा. सहज आठवली, द्यावीशी वाटली, म्हणून चिकटवली - अर्थात [मूळ कथेला धक्का न लावता] शब्दांत किंचित फेरफार करून!)


एकदा एक माणूस असाच रस्त्यातून चाललेला असता त्याला रस्त्याच्या कडेला पडलेली एक बाटली दिसली. सहज कुतूहल म्हणून त्याने ती उचलली आणि घरी घेऊन आला.


घरी येऊन बाटली उघडून बघतो, तो काय! (त्या काळातल्या प्रचलित पद्धतीस अनुसरून) प्रथम बाटलीतून प्रचंड काळाकुट्ट धूर बाहेर आला. धूर ओसरल्यावर त्यापाठोपाठ एक (काहीशी राक्षसासारखी दिसणारी) व्यक्ती बाटलीतून बाहेर आली, आणि त्या माणसाला म्हणाली, "माणसा, या बाटलीतल्या हजार वर्षांच्या कैदेतून आज तू मला मुक्त केले आहेस, तेव्हा तुझे उपकार मी मानावेत तेवढे थोडेच आहेत. तेव्हा आजपासून मी तुझा कायमचा अंकित आहे. तू मला जी काही कामे करायला सांगशील, ती मी करीन. मात्र एक अट आहे. ज्या क्षणी मला द्यायला तुझ्याजवळ काही काम नसेल, त्या क्षणी तुला मी खाऊन टाकीन!"


झाले! आली का पंचाईत? आता याला सारखीसारखी काय बरे कामे द्यायची? तरीही आत्ता लगेच खाऊन टाकायला नको, थोडा वेळ निभावून नेऊ, तोपर्यंत शोधू यातून काहीतरी मार्ग, म्हणून मग त्या माणसाने त्या (राक्षसासारख्या दिसणाऱ्या) व्यक्तीला बाजारात जाऊन भाजीपाला आण, घरात झाडू मार, धुणीभांडी कर, अशी कामे द्यायला सुरुवात केली.


पण अशी कामे तरी देऊनदेऊन किती देणार? शिवाय, प्रत्येक काम पुरे झाले, की हा लगेच "आत्ताच्या आत्ता मला दुसरे काम दे, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुला खाऊन टाकतो!" म्हणून हजर!


शेवटी त्या माणसाने एक युक्ती केली. त्याने त्या (राक्षसासारख्या दिसणाऱ्या) व्यक्तीला बोलावून घेतले, आणि म्हणाला, "आत्ताच्या आत्ता बाजारात जा, आणि एक मोठा बांबू विकत घेऊन ये."


गेला, घेऊन आला! "आत्ताच्या आत्ता मला दुसरे काम दे, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुला खाऊन टाकतो!"


"आता असे कर, समोरच्या अंगणात एक खड्डा खणून त्यात हा बांबू रोवून उभा कर. चांगला उंच उभा राहिला पाहिजे!"


रोवला! "आत्ताच्या आत्ता मला दुसरे काम दे, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुला खाऊन टाकतो!"


"आता नीट ऐक! या बांबूवर तू एकदा खालून वर चढायचे. मग वरून खाली उतरायचे. मग परत खालून वर चढायचे. मग परत वरून खाली उतरायचे. असे सारखे वर चढत, खाली उतरत रहायचे. जोपर्यंत मी तुला दुसरे कोठले काम सांगत नाही, तोपर्यंत हेच तुझे काम!"


तात्पर्य: काय हवे ते काढा!


(तसा गोष्टींची तात्पर्ये काढणे, ती लक्षात ठेवणे वगैरे गोष्टींत मी पहिल्यापासून कच्चाच! त्यामुळे या गोष्टीचे काय तात्पर्य सांगितले होते, आठवत नाही.


तसाही अशा गोष्टींपासून काय वाटेल तो अर्थबोध घेता येत असल्यामुळे, यावर 'तात्पर्य काढा' स्पर्धा ठेवण्यास हरकत नसावी.


[अशी स्पर्धा ठेवल्यास] माझी एंट्री: "रस्त्यातल्या अनोळखी बाटल्यांकडून व्यक्ती घेऊ नये.")