हिंदुस्तानी संगीत ४ - पण पट्टी कोणतीः पांढरी २ की काळी ४?

आपल्या आवाजाला योग्य अशा कोणत्या पट्टीत गावे हे आपण नक्की कसे ठरवायचे?
गायक कोणत्या पट्टीत गातो आहे ते मूलस्थान, ती पट्टी, आपल्याला / ऐकणाऱ्याला कशी कळणार कशी ?
याआधीच्या लेखात वरील दोन प्रश्न उपस्थित केले होते, त्यांची उत्तरे या लेखात पाहू.

आपली पट्टी ठरवणे
यासाठी तशी पेटी अत्यावश्यक आहे असे नाही, पण असल्यास आधाराला हाताशी घेऊया.
मध्य सप्तकातली पां १ कळ दाबून तो स्वर स्वतःच्या आवाजात (आऽऽऽऽ असा) लावा. सहज लागेल. मग मंद्र सप्तकातली पां ७ कळ दाबून तो स्वर लावा. असे मागे मागे जात सर्वात खालचा कोणता स्वर आवाजाला त्रास न होता किंवा आरामात लागतो तो शोधून काढा. या स्वराला आपल्याला मंद्र पंचम करायचे आहे.
(उदाहरणादाखल, समजा मंद्र काळी ४)
आता या स्वराला सा मानून सा-रे-ग-म हे स्वर म्हणा व कुठे येऊन पोचलात तो स्वर पकडा (ओळीने पेटीच्या कळी मोजल्या तर हा ६वा स्वर येतो, म्हणजे मंद्र काळी ४ पासून सुरुवात केली की आपण मध्य काळी १ ला आलो).
ही तुमची प्रायोगिक पट्टी (म्हणजे येथे काळी १). हिला आता मूळ सा म्हणूया.
आता ही कितपत जमते हे पहाण्यासाठी स्वर वर-वर न्या - सारेगमपधनीर्सा. आणखी वर चला - र्सा-र्रे-र्ग, इथपर्यंत त्रास न होता आवाज जातोय का?
हा स्वर (तार सप्तकातला गंधार) नीट, स्वच्छपणे म्हणता येत असल्यास हीच तुमची पट्टी असे समजता येईल. अर्थात तुमच्या आवाजाचा आवाका एवढा असेल असे येथे गृहीत धरलेले आहे. आवाजाला थोडा ताण देऊन यापेक्षा एक स्वर खाली किंवा वर बहुधा म्हणता येतोच. 
अशा पद्धतीने ठरवलेली पट्टी बहुतेक प्रकारच्या गायनाला चालते, कारण गायनाचा बराच मोठा भाग मध्य सप्तकात असतो. आता एखाद्या गाण्यात मंद्र पंचमाच्या खालचे किंवा तार गंधाराच्या वरचे स्वर असू शकतात. असे गाणे म्हणण्यासाठी तात्पुरती पट्टी वर-खाली करून बघावे. शंभरात एखादे गाणे आपल्या आवाजाच्या आवाक्यापेक्षा जास्त लांबचे स्वर मागणारे असते (उदा. मंद्र ग किंवा तार ध) ते गाणे आपल्याला म्हणता येणार नाही असे समजावे. चुकीच्या स्वरात किंवा पट्ट्या बदलून गाण्यापेक्षा हा समजूतदारपणा बरा.
काही वेळा एखादे उडते गीत गाण्यासाठी वरीलप्रमाणे ठरवलेल्या पट्टीच्या मध्यमाला सा समजून गायिले तर अधिक प्रभावी होऊ शकते. याला मध्यमात गाणे असे म्हणतात. अशा गीताचा स्वरआवाका बहुधा एका सप्तकापुरताच असतो, त्यामुळे अडचण येत नाही.


गायनाची पट्टी ओळखणे
शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असेल तर हे काम सोपे होते. गायकाच्या साथीला तंबोरा/तंबोरे असतात. तंबोऱ्याचा एकत्रित स्वरपरिणाम म्हणजेच गायनाचा षड्ज किंवा पट्टी असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तंबोरे गवयाच्या पट्टीत लावले जातात / लावायचे असतात.
तंबोरा किंवा तानपुरा
गायकाच्या मागे एक किंवा दोन साथीदार/शिष्य बसलेले असतात. त्यांच्या प्रत्येकाच्या हातात तंबोरा (एक सतारसदृश वाद्य) असतो. एक मोठा भोपळा व त्याला एक लांब पण भोपळ्यासारखाच पोकळ असलेला दांडा याने हे वाद्य बनते. यावर फक्त ठराविक स्वरांचे झंकारण करता येते, पेटीप्रमाणे गायक गाईल ते ते स्वर वाजवून साथ करता येत नाही. (** अधिक माहितीसाठी टीप पहा)
आपण हे वारंवार म्हणत आलो आहोत की षड्ज हा गायनाचा मूलाधार आहे. याच गोष्टीचे हे प्रत्यक्ष आणि वास्तवातले रूप आहे. खरेच तंबोऱ्याचा सतत गुंजणारा स्वर हाच गायनाचा कायमचा आधार व संदर्भ असतो. प्रत्येक क्षणी ह्या षड्जाची जाणीव, त्याचे भान ठेवून गायक गात असतो आणि त्याने हे क्षणमात्रही विसरू नये म्हणूनच तंबोरा झंकारत असतो. खरा श्रद्धावान भक्त ज्याप्रमाणे निरंतर परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव मनात बाळगून जगत असतो, अगदी तसेच हे आहे. तंबोरा हा गायकाला त्या ईश्वरासमान आहे. तंबोऱ्याला तानपुरा असेही म्हणतात, त्यामागे अशी भावना असते की गवयाच्या तानेत जी काही अपूर्णता असते तिला तो पूर्णत्व देतो.
तंबोऱ्याला चार (किंवा अधिक) तारा असल्या तरी त्यांचा एकत्रित परिणाम षड्ज स्पष्टपणे दाखवण्यात होतो. 
एकूण परिणामी तंबोऱ्याचा षड्ज आपल्या कानावर प्रभावीपणे उमटत राहतो व पट्टी कोणती हे वेगळे सांगावे लागत नाही.
पण तंबोऱ्याशिवाय?
तशी एखादे गाणे ऐकतानाही पट्टी समजू शकते. मात्र ती कशी हे समजावून सांगणे फार म्हणजे फाऽऽरच कठीण आहे. पाण्यात पडल्यावर पोहता कसे येते हे कसे समजावाल, तितके हे अवघड आहे. पण सवयीने, सरावाने साध्य होणारी ही गोष्ट आहे.
मूलाधार असलेल्या या षड्जाचे सूचन गाण्यात अनेक प्रकारे होत असते.  गाण्याची चाल विविध स्वरांतून फिरली तरी ती वेळोवेळी सा वर येऊन थांबतेच, कारण षड्ज हे हक्काचे विश्रांतिस्थान आहे. त्यानंतरचे महत्त्वाचे विश्रांतिस्थान म्हणजे पंचम, व कधीकधी शुद्ध मध्यम.
षड्ज व पंचम या स्वरांत बऱ्यापैकी अंतर असल्यामुळे दोन्हीतील फरक बहुधा कळतो.
गाण्याचे ध्रुवपद (याला तोंड किंवा मुखडा किंवा अस्ताई असेही म्हणतात) व कडवे (याला अंतरा असेही म्हणतात. हल्ली तर हिंदी सिनेसंगीताच्या प्रभावामुळे सगळ्याच कडव्यांना १ ला अंतरा, २ रा अंतरा, इ. म्हणण्याची प्रथा पडत चालली आहे) असे गाण्याचे दोन भाग धरूया. ध्रुवपदात बहुधा सा कळतो, पण तो तेवढा स्पष्ट न झाल्यास कडव्यात तार षड्जावर जाऊन टेकण्याची नेहमीची पद्धत आहे.
काही प्रतिभाशाली संगीतकार स्वभावतःच अशा रीतीने चाल बांधतात की जीत सहजपणे षड्ज दिसून येत नाही. मारव्यासारखा एखादा राग असतो, त्यात इतर रागांइतके षड्जाचे अस्तित्व जाणवत नाही. पण अशी उदाहरणे दुर्मिळ.

षड्ज कसा जाणवतो हे उदाहरणांनीच कळेल असे मला वाटते. यासाठी मी खाली एक मराठी/हिंदी गाण्यांची यादी देत आहे. त्यात षड्ज कुठला हे अक्षर ठळक करून व पंचम अक्षर तिरकस करून दाखवला आहे. ही गाणी ऐकून/म्हणून पहा आणि षड्ज कळतोय की नाही ते तपासा!

१. सुज कसा मन चोरी, अग हा चोरी दुकुलनंद
२. नाथ हा माझा मोही खला, शिशुपाला वैरी झाला, वीर रुक्मी शिशुस आणिला
३. मम आत्मा गमला हा
४. कोण तुम सां ज गुरुराया, कैवारी सदया
५. मम सुखाची ठेव देवा
६. स्वकु तारक सुता सुवरा, वरुनि वाढवी वंश वनिता
७. घेई छंरंद, प्रिय हा मिलिं (जितेंद्र)
८. मुरलिधर श्याम (प्रसाद सावकार) चे कडवे - तूच स्वरेश्वर, तू लयभास्कर
९. मन तरप हरि दरशन को आज ... तुमरे द्वार का मैं हूं जोगी 
१०. सांवरे, सांवरे, .. दूंगी, दूंगी गारी हट जावो रे, सांवरे 
११. जाने कहांये वो दिन, ... तेरे कदम जहां पडे, सजदे ...
१२. कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना

वरील उदाहरणांवरून थोडेफार ध्यानात येईल असे वाटते. उत्तरोत्तर ऐकून ऐकून हे आपल्याला नीट कळू लागेल असा मला विश्वास आहे.
हिला तुमची प्राथमिक स्वरज्ञानाची शेवटची परीक्षा म्हणायला हरकत नाही.

गृहपाठ
खालील गाण्यांतील षड्ज-पंचम अक्षरे ठळक-तिरकस करून दाखवा. 
१३. जिया ले गयो रे मोरा सावरिया
१४. इस मोऽऽड से जाते हैं, कुछ .... तेज़ कदम राहें
१५. आज कुणितरी यावे, ओळखिचे व्हावे ... विचारल्याविण ... कुठे तेहि ना ठावे
१६. दैवजात दुःखे भरता ... पुत्र मानवाचा
१७. तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा
१८. हम बेख़ुदी में तुम को पुकारे चले गये
१९. मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
२०. जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
२१. (शुक्रतारा मंद वारा मधील) आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा
२२. मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा, घर पान्यावरी बंदराला करतो येजा .... आयबापाची लाराची लेक मी लारी
  
या लेखाबरोबर आपण संगीताच्या प्राथमिक माहितीचा पायाभूत टप्पा गाठलेला आहे. काय काय शिकलो आपण आतापर्यंत?
सप्तके व स्वरांची नावे
शुद्ध-कोमल-तीव्र स्वर
पट्टीसापेक्ष स्वररचना
पट्टीची निवड व ओळख
एवढे भांडवल पुढील ज्ञान ग्रहण करण्यास व जाणकारांना प्रश्न विचारण्यास पुरेसे आहे असे मला वाटते. थाट, राग , इ. ची माहिती घेण्याची पात्रता आता आपल्याला आली आहे असे मी समजतो.
---------------------------------------------------------
टीपः तंबोऱ्याविषयी आणखी थोडे
बहुतेक तंबोऱ्यांत चार तारा असतात. पहिली तार मंद्र पंचम किंवा मंद्र निषाद किंवा कधी मंद्र मध्यम यापैकी जो स्वर त्या रागाला अनुकूल असेल त्या स्वरात लावलेली असते. पुढच्या दोन तारा मध्य षड्जात लावतात व शेवटची खर्जाची तार (ही इतर साध्या तारांपेक्षा वेगळी, पितळेच्या रंगाची दिसते) मंद्र षड्जात लावायची असते. जुन्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे पुरुषांनी वीरासनात बसून तंबोरा वाजवायचा असतो, स्त्रियांच्या बाबतीत असा काही नियम ऐकिवात नाही. तंबोरा उभा धरून, बोटे तारांना समांतर ठेवून, उजव्या हाताच्या मधल्या बोटाने पहिली व उरलेल्या तारा तर्जनीने छेडतात.  या छेडण्याला पं सासासा किंवा पंसासासाऽ अशी काहीशी लय असते.
तंबोऱ्याच्या झंकारात सा सोडल्यास आणखी काय काय अद्भुत ऐकू येते याचे वर्णन करणे माझ्यासाठी अशक्यप्राय आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर त्यामध्ये अगणित हार्मोनिक्स ऐकू येत असतात. अनेक वेगवेगळे स्वर मी स्वतः त्यात ऐकलेले आहेत. पण न सांगता पुढे गेले तर अक्षम्य गुन्हा होईल अशी एक गोष्ट म्हणजे खर्जाची तार छेडल्यावर मंद्र षड्जाच्या मागून स्पष्ट ऐकू येणारा गंधार. हे सर्व का व कसे ऐकू येते हे शास्त्रज्ञांनी सांगावे.
तंबोरा हा खरे तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण ते माझे काम नाही, असा लेख तात्यांसारख्या त्याच्या स्वरात मुरलेल्या लोणच्याने लिहिला पाहिजे, नव्हे त्यांना याद्वारे मी तसा प्रेमळ आग्रह करत आहे.