आता आमोद सुनासि आले

मराठी नवकथा म्हटले की गंगाधर गाडगीळांचे नाव जरी सर्वप्रथम समोर येत असले, तरी पु. भा. भावे, अरविंद गोखले, सदानंद रेगे, व्यंकटेश माडगूळकर अशा अनेक कथालेखकांची नावेही या संदर्भात वगळून चालणार नाहीत. दि. बा. मोकाशी हेही १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. त्यांच्या बहुतांश कथा जरी काहीशा मध्यमवर्गीय परीघातील अनुभव टिपणार्‍या असल्या तरी काही त्यापलीकडे जाऊन 'कोऽहम्?' या सनातन प्रश्नाचा वेध घेताना दिसतात. 'आता आमोद सुनासि आले' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कथा.


कथेविषयी लिहिण्याआधी थोडेफार शीर्षकाविषयी सांगणे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांची 'आता आमोद सुनासि आले। श्रुतीशी श्रवण निघाले' ही अमृतानुभवातल्या 'ज्ञान-अज्ञान भेद कथन' या प्रकरणातील ही ओवी ज्ञाता आणि ज्ञेय (जाणणारा आणि जे जाणायचे ती गोष्ट) यांच्यातील अद्वैत दर्शविते. आमोद म्हणजे सुगंध, सुनास म्हणजे नाक - हे एक उदाहरण. (श्री. विनायक यांच्या या प्रतिसादातून साभार) या कथेतही वेगवेगळ्या पातळीवर, वेगवेगळ्या गोष्टींतले द्वैत - अद्वैत लेखक दाखवून देतो.


कथेची सुरुवात मोजक्या शब्दांत केलेल्या चित्रदर्शी वर्णनाने होते.


"थडथडा पावसाचे थेंब पडत आहेत नि शिवा नेमाणेची गाय अगदी व्यायला झाली आहे. पावसाचं पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहत आहे नि रामजी लोहाराच्या एकुलत्या एका मुलाला तिनं आपल्या खळबळत्या धारांत वाहून नेलं आहे. हवा ओल्या फडक्यासारखी सर्द झाली आहे नि गण्या शिनारेचा दमा वाढला आहे. निसर्गाच थैमान सुरू झालं की अशाच गोष्टी घडतात? माणसं अशी निपचित का पडतात?


आज सहा दिवस झाले. केंबळं खेडं पावसाचा मारा खात दबकून बसलं होतं. सहा दिवसांत आकाशाचा काळपट रंग बदलला नव्हता. खग्रास ग्रहणासारखी भयाण काळोखी डोंगरापासून पायथ्याच्या खेड्यांपर्यंत पसरली होती. पाण्याचे तांबडे लोंढे खळखळा वाहत होते. पावसाच्या सरी सुरीसारख्या पृथ्वीवरून फिरत होत्या. इंजिनामधून वाफ सुटावी तसा आवाज वातावरण भरून टाकीत होता. घरे ठिबकत होती. माणसं विड्या ओढीत होती नि साखरेचा किंवा गुळाचा, दुधाचा किंवा बिनदुधाचा, मिळेल तो चहा पीत होती. ती आपापसात असं काही बोलत होती की पृथ्वीची ही वास्तू त्यांना कधीच आवडली नव्हती असं वाटावं."


ज्याच्यात आपण स्वतःलाच पहायचो असा तरुण मुलगा मृत्युमुखी पडल्याच्या दुःखाने बधीर झालेला रामजी लोहार. गावाला वेढून टाकणार्‍या आणि तडाखे देणार्‍या पावसासारखेच हे त्याचे दुःख. खेड्यातल्या नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचे वाचन करणार्‍या चार माळकर्‍यांपैकी एक. त्याचे दुःख कसे हलके करावे, हे इतरांना उमगत नाही. त्यांना ते जाणवते, परंतु त्या दुःखाशी ते तादात्म्य पावू शकत नाहीत. अद्वैत साधणे ही तशी अवघडच बाब.


"पण आज रामजीचं दुःख कशानं हलकं होत नव्हतं. जे काही आजपर्यंत लोकांना त्यानं सांगितलं होतं ते फक्त वरवरचं समाधान होतं. जीव नि मृत्यू यांतलं त्यालाही कळलं नव्हतं. नि संतांनाही कळलं नव्हतं. त्यामुळेच आज कधी केलं नव्हतं ते तो करीत होता. परमेश्वराला प्रश्न टाकीत होता. आपली तीस वर्षांची पंढरीची वारी विठ्ठलापुढे त्यानं टाकली. कुठं पुण्य गेलं या वारीचं? प्राक्तनाने मुलगा गेला? कसलं प्राक्तन? म्हातारपणी मी रडावं हे प्राक्तन?


जी भाषा इतरांच्या वेळी समाधान करण्यास त्यानं वापरली होती, त्यातला अर्थ आज सुना झाला होता. विठ्ठलावर तो चिडला नव्हता. तेवढा आवेशही राहिला नव्हता. घड्याळ बंद पडावं आणि मग वेळ खोटी वाटावी तसं त्याला वाटू लागलं होतं. इतकी वर्षे विठ्ठलाच्या भक्तीमुळे आपण जगत आहोत असं त्याला वाटलं होतं. पण मुलगा जाताच मुलासाठी आपण जगत होतो हे त्याच्या एकदम लक्षात आलं. मुलगा होता तोपर्यंत आपला जीव निराळा, आपला जगण्याचा आशय निराळा नि मुलाचा निराळा, असं त्याला वाटलं होतं. पण मुलगा गेला नि स्वतःचं शरीरही त्याला निरर्थक वाटू लागलं. त्याचा देह जणू पिशवी होती. त्यातील पदार्थ सांडताच पिशवीचं काय करायचं?


कुणीही वारकर्‍यानं सांगितलं असतं की रामजीचं दुःख हा अहंकाराचाच एक प्रकार होता. पण बाहेर जसं केंबळं खेडं पावसातून सुटू शकत नव्हतं तसाच रामजीही या अहंकारातून सुटू शकत नव्हता.
....
त्यानं पुन्हा रामजीकडं पाहिलं. त्याच्या मनात आलं - दुःखानं माणूस असा बधिर होतो. रामजी इतक्या जवळचा, पण त्याचं दुःख मला लागत नाही हे आश्चर्य आहे! आपण कळवळलो, पण आतलं सुखी नि निश्चिंत मन हललं नाही. आपलं सगळं ठीक आहे ही भावना नि तिची ऊब कधी तुटली नाही."


अशा अस्वस्थ मनःस्थितीत रामजी आणि इतर तिघे माळकरी नेहमीच्या शिरस्त्यानुसार अमृतानुभवाचे वाचन सुरु करतात. त्या ओळींचा अर्थ, वर्षानुवर्षे पारायण करूनही त्यांना कळत नसतो. विरोधाभास म्हणजे नेमक्या "आता अज्ञानाचेनि मारे। ज्ञान अभेदें वावरे। नीद साधोनी जागरे। नांदिजे जेवी॥" याच ओवीने त्यांच्या पठणाची सुरुवात होते.


याच वेळी शिवा नेमाणेची गाय गर्भारपणात अडलेली असते. शिवा आणि त्याची बायको असहायपणे तिच्या वेदना पाहत असतात. अडलेल्या जनावरांची सुटका करू शकणारा गावातील एकच माणूस म्हणजे रामजी लोहार, जो स्वतःच नियतीने केलेल्या आघाताने कोलमडून गेलेला असतो. चार दिवस खाणे-पिणे, बोलणे-चालणे काहीही न करता सार्‍या संवेदना गोठलेल्या अवस्थेत असतो.


"संतू वाण्यानं सहावी ओळ वाचली होती. तो तिचा अर्थ सांगत असता हे निर्जीव चाललेलं प्रवचन कसं नि कुठं संपवायचं याचा तो विचार करत होता. इतक्यात शिवा नेमाणेच्या बायकोचा रडका, किंकाळा आवाज आला...


"रामजीदा, धाव! माजी गाय अडली रे! धाव रामजीदा!"


रामजीच्या बधिर मनात काहीतरी हलू लागलं. 'धाव...धाव!' ही आरोळी आपण कुठं ऐकली? रामजीला वाटलं, पुराच्या खळबळत्या पाण्यातून - सोसाट्याच्या वार्‍यातून ती आली होती. आपण घरी होतो. नाही - ती हाक आपल्याला ऐकू आलीच नाही. आपण कानशीनं विळे घाशीत होतो. ही आरोळी ती नव्हे. ही नेमाण्याची बायको हाकारते आहे. तिची गाय अडली आहे. तिची गाय अडली आहे की माझा मुलगा ओरडतो आहे! - धाव!"


यापुढचा कथाभाग मुळातूनच वाचला पाहिजे. अद्वैताची अनेक समर्पक उदाहरणे देणारा, मोजक्या शब्दांत सारे चित्र डोळ्यासमोर उभा करणारा आणि त्याचबरोबर जन्म-मृत्युच्या अव्याहत फेर्‍याचे वर्णन करणारा.  ज्ञानेश्वरांची एक तरी ओवी 'अनुभवावी' असे म्हणतात. या अनुभवलेल्या ओवीचेच चित्रण म्हणजे ही कथा आहे, असे मला वाटते.


"आता बाहेरच्या पावसाचा गारवा त्याला भासत नाहीसा झाला होता. त्याचं अंग आतून गरम होऊ लागलं होतं. त्याला कुठलं भान नव्हतं. सगळं जग गायीत, वासरात दिसत होतं. एक जीव इथं अडकला होता. त्याला बाहेरच्या जगात यायचं होतं. बागडायचं होतं आणि त्याला कुणीतरी अडवून ठेवलं होतं.


वासराचं डोकं आत सारून तो ते चिमुकलं शरीर वळवू लागला. आत गेलेली त्याची बोटं जणू अज्ञेयाचा वेध घेत होती. माणसाच्या पलीकडील घटनेचं ज्ञान घेत होती. आणि त्या घटना आपल्याप्रमाणं वळवू पाहत होती. त्याची सगळी शक्ती, कौशल्य, बोटांत येऊन राहिलं होतं. ज्ञानेश्वरांनी म्हटलं असतं, आता बोटं डोळे झाले आहेत, बोटं जिवाशी झगडत आहेत. ढोपरात अर्धवट वाकून, मांड्या भरल्या की कमरेत ओणवं होऊन, कंबर थकली की गुडघ्यावर बसून तो वासराचे पुढचे खूर हाताशी येण्याची वाट पाहत होता.
....
गायीलाही धाप लागली होती. येणाऱ्या नव्या नव्या कळांची ती तयारी करीत होती. तिच्या महाकळा जणू आपल्याच अंग़ात शिरत आहेत, असा रामजी थरथरू लागला. त्याचं सगळं शरीर तल्लख झालं. गायीला त्याने एकदोनदा थोपाटलं. गोंजारलं. हात पाण्यात बुडवले. तेल घेतलं नि पुन्हा वासराचं शरीर वळवू लागला.


आता त्याला चेव आला होता. जणू अज्ञेयाशी तो प्रत्यक्ष झटापट करीत होता. कसला तरी सूड उगवणार होता - काहीतरी सिद्ध करणार होता, गमावलेलं काही मिळवणार होता. गायीच्या पोटातल्या हालचालीशी त्याचं पुरं तादात्म्य झालं होतं. कळा भराभर येऊ लागल्या होत्या. वासरू बाहेर टाकण्यासाठी गाय तडफड करीत होती. तिच्या प्रयत्नांची लकब त्याच्या बोटांतून त्याला कळू लागली होती. नि त्याची बोटं तिला आपोआप साथ देऊ लागली. वासरू फिरत चाललं. डोकं आत गेलंच - आता पोट बोटांना लागलं. ते आणखी फिरलं. नि झटकन त्याचे पुढचे दोन खूर रामजीच्या बोटांना लागले.


तो हळूहळू ओढू लागला. वासरू बाहेर येऊ लागलं. रामजी डोक्यापासून मानेपर्यंत घामानं निथळला. गायीच्या सर्वांगावर घामाचे थेंब दिसू लागले. रामजी धापा टाकू लागला.


आणि एकदम न कळल्यासारखं वासरू त्याचा आवाक्यात पडलं. बाहेर येताच त्या वासराची लगबग सुरू झाली. जगात येण्याची इतकी घाई त्याला दिसली. रामजीनं वरचं आवरण काढताच त्यानं टुणदिशी उडी घेतली. त्याची उडी रामजीनं आईकडे वळवली. गायीची लगबग सुरूच होती. मागचे पाय इकडे तिकडे हलवीत, शेपटी वेळावीत, माना फिरवीत तिची जीभ वासराची वाट पाहत होती. त्या जिभेला वासरू लागताच तिचं चाटणं सुरू झालं.


रामजीनं धोतराचा सोगा सोडून तोंड, मान, हात पुसले नि तो भराभर सूचना देऊ लागला. गायीला खायला काय घालायचं? वार कशी कापायची? वासराला केव्हा पाजायचं? गायीला गरम पाणी पाजायचं नि स्वच्छ कसं ठेवायचं? तिच्या खाण्यात गव्हाचा भुस्सा किंवा सुंठमिरी किती टाकायची?...


बोलता बोलता गव्हाणीवर ठेवलेलं आपलं कुडतं त्यानं अंगात चढवलं. मग पेटी उचलून तो बाहेर पडला.
 
बाहेर पाऊस लागताच त्याला सर्व भान पुन्हा आलं. नि गमावलेल्या पोराची आठवण आली. तो तसाच चालत राहिला. पावलं पुन्हा बधिर होऊ लागली. चेहरा कठोर बनला. संतू वाण्याच्या दुकानासमोर येताच तो तिकडे वळला.


ओसरीवर तिघे माळकरी त्याचीच वाट पाहत बसेल होते. तो येताच ते उठले. जोशी म्हणाला, "पोथी पुरी करू या."


चौघे माळ्यावर गेले नि आपापल्या जाग्यावर बसले. अमृतानुभव पुढे घेऊन संतूनं झटदिशी उघडला नि तो वाचू लागला :


आता आमोद सुनासि आले। श्रुतिशी श्रवण निघाले।
आरसे उठले। लोचनेशी॥
आपलेनी समीरपणे।वेल्हावती विंजणे।
किं माथेंचि चाफेपणें। बहकताती॥


आताही कुणाला त्यातला अर्थ कळला नाही, पण वाचण्याचा सूर नि शब्दांचा नाद यांत चौघेही रंगू लागले. आता त्या सुरांत नि नादात अर्थ प्रतीत होऊ लागला. रामजीचा चेहरा भावनांनी भरू लागला. तिसर्‍या ओवीला सुरुवात झाली न झाली तोच तो रडू लागला. पोथी चालूच होती -


जिव्हा लोधली रसे। कमळ सूर्यपणे विकासे।
चकोरचि जैसे। चंद्रमा झाले॥
फुलेचिं झालीं भ्रमर।तरूणीच झाली नर..."


[संदर्भ - "मराठी कथा : विसावे शतक. संपादक - के. ज. पुरोहित, सुधा जोशी]