(सन्जोप राव साहेबांनी न पाहिलेले)मनोगती संमेलन-एक कल्पनाविलास-२

सर्व नियम सन्जोप रावसाहेबांच्या संमेलनासारखेच (तंतोतंत!)


-----------------------------------------------------------------


(तितक्यात "हटो हटो हटो" असा आवाज़ मागच्या बाज़ूने ऐकू आला.)


मंडळींनी आवाज़ाच्या रोखाने पाहिले असता भाज्या, फळे, मसाल्याच्या सामानाची पोती, स्वयंपाकाची घमेलीवज़ा आणि काही त्याहूनही मोठी भांडी आणि असंख्य ताटं-वाट्या-पळ्या-चमचे घेऊन अनेकज़ण लगबगीने आत आले. मागोमाग माधव कुळकर्णी, ज़ावडेकर बंधू आपापल्या परिवारांसह. त्यात हरवलेले छाया राज़े, वेदश्री, जयन्ता५२ आणि फिनिक्स यांना मंडळींनी प्रयत्नपूर्वक हुडकून काढले. आपले नाव सार्थ करत फ़िनिक्स त्या रामरगाड्यातून(ही) व्यासपीठाकडे झेपावला. पण अज़ूनही कोणताच कार्यक्रम चालू झाला नसल्याचे पाहून ओशाळून खाली बसला. माधव कुळकर्णी वगळता सगळे स्थानापन्न झाले. माधवने त्या वरातीतल्या एका दाक्षिणात्य वाटणाऱ्या माणसाशी बोलणे संपवत आणले. त्याचे हातवारे पाहून मंडळींनी अनेक तर्कवितर्क करायला सुरुवात केली; पण माधवही ज़ागेवर येऊन बसल्यावर सगळ्याचा खुलासा झाला.


"अहो जेवण!! ती सोय करण्याचे अंगावर घ्यायला कोणी तयारच नाही! भुकेल्या पोटी कोण ऐकणार तुमच्या गझला नि कविता नि परिसंवाद नि बाकीचे सगळे?!" --- माधव तक्रारीच्या सुरात.


"माधवशेठ, हे बाकी झकास केलेस हो. कोणीतरी जेवणाकडे पहायलाच हवे" --- विसोबांसाठी सगळेच शेठ!


"म्हणजे माधव जेवणाकडे पाहतच राहणार आणि हे आडवा हात मारून घेणार!" यावर अर्ध्या मंडळींनी टग्याकडे आणि अर्ध्यांनी आगाऊकडे पाहिले. तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे प्रश्नार्थक नज़रेने बघून तमाम संमेलनाची दिशाभूल करण्याच्या बेतात असल्याचे आढळले.


"मग ठरल्याप्रमाणे पुरणपोळी ना? पक्वान्नांच्या निवडणुकांत तीच जिंकली होती" --- विसोबांनी मूळ विषयावर यायचा प्रयत्न केला.


"नशीब पुरणपोळी म्हणाले. मला वाटले आताही मिसळच आहे जेवायला" --- (एक अज्ञात आवाज़)


"अरे मिसळ बरी म्हण. मला वाटले तात्या आता साधनाला आणून बसवणार मांद्याळी साफ़ करायला. हीहीहीहीही" --- चित्त. यावर सभागृहात ज़ोरदार हशा उसळला.


जिवलग मित्राच्या या अनपेक्षित वाराने विसोबा गांगरला. अर्थात संमेलन हलकेफुलके व्हावे या उदात्त सद्भावनेतून विसोबा अरे ला कारे करायचा नाही, असा चित्तचाही समज़ होता. पण साधनाच्या उल्लेखामुळे विसोबा ज़रा दुखावला गेला होता.


"चित्त्या, गझल नि कवितांच्या बाबतीत बकतोस ते आम्ही ऐकून घेतो. पण साधना आणि मांद्याळीला मध्ये आणायचे काम नाही"--- विसोबा.


"अरे बकतोस काय रे आं बकतोस काय? तुझी कवितेची समज़ काय आहे अख्खे मनोगत ज़ाणते" --- चित्त वरचेवर चिडणाऱ्यातला नाही.


"कोकणातल्या फ़ुरशाला डिवचणे बरे नव्हे चित्तोबा"


"अरे तू कोकणातले फ़ुरसे तर मी वऱ्हाडी ठेचा!"


"वऱ्हाडी ठेचा की कऱ्हाडी ठेचा?" --- एका अज्ञात आवाज़ाने पुन्हा ज़ातीयवाद उफ़ाळून आणायचा प्रयत्न केला. तो शिवश्री असावा या अंदाज़ाने सगळे त्याला शोधू लागले. पण आपली डाळ इकडे शिज़त नाही, हे पाहून आणि सात्त्विक ब्राह्मणी जेवण पाहून तो कधीच सटकला होता.


"निदान आज़च्या दिवशी तरी हे असले प्रकार येथे नकोत. प्रामाणिक मत आहे. राग नसावा" --- जयन्ता५२


"सहमत" --- भोमेकाका


जयन्ता५२च्या वडीलकीला मान देऊन चित्त आणि तात्या नरमले आणि स्थानापन्न झाले.


मनोगतींमधील भाऊबंदकीचे तसे कोणालाच नाविन्य नाही. किमान संमेलनाच्या माध्यमातून तरी सगळे एकत्र यावेत या हेतूने वेदश्रीने काही सांघिक खेळ खेळायची कल्पना सुचवली. त्यावर संमेलनाचे एकमत झाले. तीन पायांच्या शर्यतीत माधव कुळकर्णी-चित्त, साती-नरेन्द्र गोळे, वरुण-चक्रपाणि, एकनाथ फडके-विनायक अशा ज़ोड्या पाहून राधिकेला ज़णू तिच्या स्वप्नातले मनोगतच प्रत्यक्षात आल्याचा भास झाला. शर्यतीतल्या ज़ोड्या पाहता श्रावणी-मृदुला, अदिती-राधिका, शशांक-नंदन या ज़ोड्यांमध्येच पहिल्या तीन नंबराची बक्षिसे संपून ज़ाणार असा एक सर्वसाधारण अंदाज़ वर्तवला गेला.


"हा सगळा तू माझी पाठ खाज़व मी तुझी खाज़वतो यातला प्रकार आहे, हे मी आधीच सांगितले होते" --- सन्जोप राव. अज़ूनपर्यंत त्याच्या पायाला पाय लावून पळायला कोणी तयार झाले नव्हते, हे यावरून सगळ्यांना समज़ले. पण वेदश्रीचा आपल्या सद्भावनेवर अढळ विश्वास आणि नितांत श्रद्धा. "ए सन्जूमामा, आपण एकत्र पळूया", असे म्हणून तिने पाय बांधायला सुरुवातच केली. पण  मुळात ही कल्पनाच बालिश असल्याचे सन्जोपचे ठाम मत असल्याने तिचा बेत सिद्धीस गेला नाही. शेवटी ज्यांना कोणी ज़ोडीदार मिळालेला नाही, अशांनी पार्टी लंग़डी खेळावी, यावर उरलेल्या मनोगतींचे एकमत झाले. लंगडीवरून सर्वांना मीरा फ़ाटकांच्या 'एक पाय नाचीव रे' या लेखाची आठवण झाली आणि मीराताईंची अनुपस्थिती प्रकर्षाने ज़ाणवली. अनुपस्थित सदस्यांमध्ये मीराताईबरोबरच सोनाली, आशाताई कऱ्हाडे, भाष, प्रवासी यांसारखे अनुभवी आणि ज्येष्ठ मनोगती, भास्कर केन्डे, यादगार, कविवर्य अगस्ती यांसारखी मनोगतापासून दूर गेलेली प्रतिभावंत मंडळी या सगळ्यांची आठवण झाली आणि 'ते मनोगती कुठे गेले!' अशी हळहळ अदितीने व्यक्त केली.


ज्यांना अज़ून ज़ोडीदार सापडलेला नाही, अशा सदस्यांमध्ये सन्जोप राव, अनु, प्रसाद शिरगावकर, प्रभाकर पेठकर, विसोबा यांसारखी बडीबडी मंडळी असल्याने लंगडीपेक्षा गाण्याच्या भेंड्या बऱ्या असे सगळ्यांचेच मत पडले. विनायक आधीच एकनाथ फ़डक्यांबरोबर बांधला गेलाय, हे पाहून हिरमुसलेली रोहिणीसुद्धा भेंड्यांचा विषय निघाल्यावर खुलली. गाण्याचा विषय निघाल्यावर विसोबांच्यातला गायक ज़ागा झाला. मग बसंतचं लग्न, अण्णा, बाबुजी यांवरून ज्या गप्पा चालू झाल्या त्या 'ध्यानस्थ लंगोटबंद'वर येऊन पोचल्या. भान्डारकरांनी लगबगीने शब्द टिपून घेतला. पण तो कोशात असावा की कोशाबाहेर, यावर त्यांचे नि राधिकेचे परस्परांच्या बाज़ूने मत पडल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला.


 खेळून झाल्यावर सगळ्यांचीच दमछाक होणार, तेव्हा सहभोजन उरकून घ्यावे आणि जेवताजेवताच पुढील कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करून त्याप्रमाणे संमेलन पुढे ज़ावे, असे एक मत पुढे आले, आणि त्यानुसार, खेळून झाल्यानंतर, मंडळी जेवणाच्या टेबलांकडे वळली.


(अपूर्ण)


-----------------------------------------------------------------


सर्व नियम सन्जोप रावसाहेबांच्या संमेलनासारखेच (तंतोतंत!)


-----------------------------------------------------------------


मोठ्या सुटीमुळे आखलेल्या सहलीच्या कार्यक्रमामुळे यापुढील भाग (शेवटचा!) प्रसिद्ध करण्यास साधारण आठवडाभराचा कालावधी लागेलसा अंदाज़ आहे. लवकरात लवकर तुम्हां सगळ्यांची  चालू ज़ाचातून/त्रासातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करेनच; पण वेळ लागल्यास उदार अंतःकरणाने माफ़ करावे, ही नम्र विनंती.


-----------------------------------------------------------------