सल (भाग-१)

मनोगतावर चाललेल्या प्रेमाच्या आणि लग्नाच्या चर्चा आणि १७६० कविता (मोजणी कमी भरल्यास क्षमस्व!) यावरुन मनात नेहमी घोटाळणारी एक सत्यकथा माझ्या अनुदिनीवरुन उचलून येथे देत आहे. कथेत नाविन्य नाही पण आयुष्यातला एक न विसरता येण्याजोगा अनुभव आहे.


-----


आज कित्येक वर्षांनी मला ती दिसली. सिद्धिविनायकाच्या बस स्टॉपवर आपल्याच विचारांत उभी होती. माझी टॅक्सी भुरकन निघून सुद्धा गेली तिच्या समोरुन, पण तिला पाहिलं आणि कितीतरी आठवणी दाटून आल्या, मनात आणि डोळ्यातही. मागेही एकदा अशीच दिसली होती. त्यामानाने आज बरी वाटली पण तिची कृश मूर्ती, विस्कटलेले केस, अंगावरचे साधे सुधे कपडे पाहून तिच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नसावा असं दिसत होतं. नकळत एक अपराधी भावना मनात येऊन गेली.



तिला मधुमीता म्हणू की माहताब. मला वाटत सुरुवात मधुमीतानेच करावी. मधुमीता दत्त. इंजीनिअरींगच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला भेटली. आमच्या मराठी मुला मुलींचा ग्रुप जमून येत होता, ओळख सुरु होती आणि जवळच एका बाकावर बसून एक उंच, नाजूक, निमगोरी, केसांची घट्ट वेणी घातलेली, शेलाटी मुलगी चेहऱ्यावर स्मितहास्य आणून आमच्याकडे पहात होती. थोडयाच वेळात कोणीतरी तिला आमच्यात बोलावल आणि तिची चौकशी सुरु केली.


"मॉधुमिता दत्त. मी अंधेरीला रहाते."


"बंगाली वाटत? हे बघ, आपल्याला मॉधु बिधु जमणार नाही. आम्ही तुला मीता म्हणू. चालेल?" कोणीतरी सुचवलं आणि ती आमची "मीता" झाली ती कायमचीच.



मीताच्या चेहऱ्यावर नेहमी शांत, विचारी भाव असायचे. तिच बोलणं वागणं सुसंस्कृत होत. कमी बोलण, नीट नेटकं, टापटीप रहाण तिला आवडायच. तिला कधी मोठ मोठयाने बोलताना, खदखदून हसताना पाहिल्याच आठवत नाही. तरीही ती स्मार्ट होती. अभ्यासात, बोलण्यात, वागण्यात तिची सफाई सर्वांनाच आवडून जायची. एक होतं मात्र, ती आमच्यात असूनही आमच्यात नसायची. कॉलेजमधे आम्ही एकत्रच असायचो पण एकदा कॉलेजच्या बाहेर पडलो की मीता कधीच आम्हाला जॉईन व्हायची नाही. ती आमच्यापैकी कोणाच्या कधी घरी आली नाही, सिनेमाला नाही, पिकनीकला नाही. स्वत:च्या घरीही कधी तिने आम्हाला बोलावलं नाही. काही काम असेल तरच ती मला घरी फोन करायची. मीही २-४ वेळाच तिच्या घरी फोन केला होता. तिच्या आईशीही बोलले होते. तिची आई माफक चौकशी करायची. थोडंफार बोलणं व्हायच.


मीता घरात सर्वांत मोठी होती. तिच्यामागे अकरावीत एक भाऊ होता आणि शाळेत जाणारी धाकटी बहिण. मीताचे वडिल बॅंकेत ऑफिसर होते, आई घरातच असायची. अंधेरी पूर्वेला त्यांचं दोन बेडरुमच घर होतं. मीताचे वडिल कडक शिस्तिचे होते. शिकत्या मुलांनी फॅशन, सिनेमा, पिकनिक्समधे वेळ घातला की त्यांच अभ्यासावरचं लक्ष उडतं या मताचे होते. आई मात्र मृदुभाषी होती. मीता सारखीच. बस! या व्यतिरिक्त आम्हाला मीताची फारशी माहिती नव्हती आणि त्याची गरजही नव्हती.


बघता बघता तीन वर्ष निघून गेली. आमच्यात आणि मीता मधे घट्ट नातं तयार झालं होतं पण फक्त कॉलेजमधे. शेवटच्या वर्षाला नुकतीच सुरुवात झाली होती. लेक्चरला मीता माझ्या शेजारी बसली होती. लेक्चर चालू असताना मधेच मी मीताला काहीतरी गुणगुणताना ऐकल. मी तिच्याकडे पाहिल तर ती आपल्याच नादात पेपरवर बंगालीत काहीतरी खरडत होती.



"ए मीता, काय लिहित्येस?" मी तिला उत्सुकतेने विचारलं.


"काही नाही..असचं आपलं काहीतरी," असं म्हणून ती गोडशी हसली.


"ए तू प्रेमा बीमात तर नाही ना पडलीस? बॉयफ्रेंड तर नाहीना गाठलास?" मला तिची फिरकी घ्यायची लहर आली. त्यावरही मीताने मला फक्त एक गोडंस स्मितहास्य फेकलं. मीताला बॉयफ्रेंड असायला माझी काहीच हरकत नव्हती. या वयांत नाही तर मग केव्हा असणार? पण मीताचा बॉयफ्रेंड कोण असेल? बंगाली कि बिन-बंगाली, हॅंडसम, मीता सारखा उंच, देखणा? आणि तो काय करत असेल म्हणजे नोकरी की कोणी बिझनेस मन? अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली.


"ए मीता कॅन्टीन मधे चल ना. सांग ना मला सगळ. कुठे भेटला? काय करतो? कुठे रहातो?" मी प्रश्नांच्या फैरी झाडल्या.


"किती प्रश्न विचारतेस? त्या पेक्षा असं कर तू स्वत:च त्याला भेट. तो आज येणार आहे कॉलेज सुटल्यावर मला घेऊन जायला. तू भेटणार?" मीताने विचारल.


"भेटणार म्हणजे काय? भेटणारच," मी म्हटल आणि मीता गोडशी लाजली.


संध्याकाळी मी आणि मीता कॉलेजच्या गेट जवळ उभे होतो. काळोख व्हायला आला होता. थोडयावेळाने मीता म्हणाली, "तो बघ, येतोय समोरुन, ओळख कोण?"



मी समोरच्या गर्दीतून येणारे चेहरे न्याहाळू लागले. माझ्या कल्पनेतला उंच, देखणा तरुण कुठेच दिसत नव्हता. जो तरुण समोर येऊन उभा राहिला तो मीतापेक्षा अंमळ बुटका होता. त्याचे दात पुढे आलेले होते, नाकावर एक बऱ्यापैकी मस होता. त्याचे कपडे यथातथा होते. शर्ट बाहेर आलेला, ढगळ पॅन्ट, कुठल्याही अंगाने तो मीताच्या बरोबरीचा नव्हता. त्याला पाहून मी आ वासला नाही हेच काय त्यातल्या त्यात बरं म्हणायच.


"मीट रियाझ, रियाझ शेख," हा दुसरा शॉक इतका जबरदस्त होता की मी हाय हॅलो झाल्यावर तिथून काढता पाय घेतला.


घरी परतताना मी विचार केला की दिसण्यावर का जाव? आणि धर्मावरुन तरी चटकन एखाद्या माणसाची परीक्षा का करावी? पण का कुणास ठाऊक अंतर्मनाला एकंदरीत रंग चांगले वाटत नव्हते. मीताच्या घरी हे नक्कीच चालण्यासारख नव्हतं. हा प्रकार काय आहे याचा आपण शहानिशा करायचाच अस ठरवूनच मी त्या दिवशी झोपले.

 

(क्रमशः)