हास्यरंगी रंगले

(आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी च्या एका वेगळ्या पैलूचा मनोगतीना परिचय करून देण्याचा प्रयत्न!)
       मी ज्ञानेश्वरी वाचली आहे,वाचत आहे,कारण तेवढेच मी करू शकतो,ती समजली आहे म्हणण्याचा आगाऊपणा मी करणार नाही.पण रामदासानी `टवाळा आवडे विनोद`!' असे म्हटले आहे आणि मी त्या (पक्षी टवाळ)सदरात मोडत असल्याने मला ज्ञानेश्वरीतला हा पैलू मात्र कळला आणि रामदासानी नव्हे तर आतापर्यंतच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकानीही ती फारच गंभीरपणाने वाचली असावी असे वाटले कारण बऱ्याच ठिकाणी मार्मिक टीका करताना ज्ञानेश्वरानी केलेले विनोदी भाष्य वाचून त्यांचा मिस्किलपणा जाणवल्यावाचून रहात नाही.
        ज्ञानेश्वरीच्या सुरवातीसच आपली भूमिका विशद करतानाच एक चौकार ज्ञानदेवानी मारला आहे.ते म्हणतात,
      या गीतार्थाची थोरी।स्वये शंभू विवरी।जेथ भवानी प्रश्नु करी।चमत्कारोनी ॥१.७०॥तेथ हरु म्हणे नेणिजे।देवी जैसे गा स्वरुप तुझे।तैसे नित्यनूतन देखिजे।गीतातत्त्व॥१.७१॥
      म्हणजे या गीतार्थाची महती येवढी की प्रत्यक्ष शंकर त्यावर विचार करीत स्तब्ध बसल्यावर पार्वती मातेला काही राहवले नाही.बायकाना स्वतःला गप्प बसवत नाहीच पण नवराही गप्प बसलेला बघवत नाही.म्हणून त्यानी विचारलेच "अहो,येवढा कसला (कदाचित कोणच्या अप्सरेचा असेही)विचार चाललाय?"यावर शंभूमहादेव भोळे सांब म्हटले तरी महामिस्किल त्यामुळे
सरळ उत्तर न देता म्हणतात,"देवी तुझ्या स्वरूपाचा(आणि स्वभावाचाही)जसा थांग लागत नाही तसच या गीतातत्त्वाच आहे .त्यातून(तुझ्या बोलण्याप्रमाणे)दररोज नवीन नवीन अर्थ निघत असतात."
       दुसऱ्या अध्यायात अर्जुनाचा शोक पाहून श्रीकृष्णास हा क्षत्रिय असून असा का बरळू लागलाय असे जे आश्चर्य वाटते ते व्यक्त करतानाही ज्ञानदेवानी श्रीकृष्णाच्या संवादाला विनोदाची फोडणी दिली आहे.
मग आपुलां चित्ती म्हणे।येथ काय आदरिले येणे।अर्जुन सर्वथा काही नेणे।काय कीजे॥२.८४॥
श्रीकृष्ण मनात म्हणतात,याने येथे काय चालवले आहे,आता याला जरा खडसावलेच पाहिजे म्हणून ते पुढे म्हणतात,
तू जाणता तरी म्हणविशी।परि नेणिवेते न संडसी।आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसल॥२.९२॥
आपले न ऐकणाऱ्या मुलास बापाने 'येवढा घोडा झालास तरी अजून काही अक्कल आली नाही आणि सांगायला गेले तर वर आपणच वर तोंड करून बोलतोय अगदी असेच हे शब्द.आणि पुढे पहा,
"तू आपणपे नेणसी।परि या कौरवाते शोचू पाहसी।हा विस्मय बहु आम्हासी।पुढतपुढती॥२.९४॥ तरी सांग पा अर्जुना।तुजपासूनि स्थिती या त्रिभुवना।हे अनादि विश्वरचना।लटके कायी॥२.९५॥हो का सांप्रत ऐसे जाहले।जे हे जन्ममृत्यु तुवा सृजिले।आणि नाशु पावे नाशिले।तुझेनि कायी॥२.९७॥परी मूर्खपणे नेणसी।ना चिंतावे ते चिंतसी।आणि तूचि नीती सांगसी।आम्हाप्रती ॥२.१०१॥
एकाद्या लहान मुलाला कान पकडून सांगावे तसे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,"अरे शहाण्या,धड स्वतःला ओळखत नाहीस आणि निघालाय कौरवांच्या मरण्याचा शोक करायला.जरा  गावठी भाषेत सांगायचे म्हणजे अरे स्वतःचे *** धुता येत नाही आणि निघालाय उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला.मला हे सांग बाळा,जगाची जी काय बरी वाईट स्थिती आहे ती तुझ्यामुळे असे वाटतेय का तुला?मग ही रचना अनादि वगैरे आहे म्हणतात ते सगले खोटेच म्हणायचे‌.अवध्या जगात जे काय जन्ममृत्यु होत आहेत ते तूच घडवून आणतो आहेस असे तुला वाटतेय का?मूर्खपणा सोडत नाही नको तो विचार करतो आणि वर नीतीच्या गप्पाआम्हालाच झोडतो."
       तिसऱ्या अध्यायाच्या सुरवातीला मात्र पारडे पलटते आणि अर्जुनच कृष्णाची चांगली खरडपट्टी काढतो,तो भागही वाचून हसू आल्यावाचून रहावत नाही,अर्जुन म्हणतो,
तेथ कर्म आणि कर्ता।उरेचिना पाहता।ऐसे मत तुझे अनंता।निश्चित तरी॥३.२॥तरी माते केवी हरी।म्हणसी पार्था संग्रामु करी।इये लाजसीना महाचोरी।कर्मी सुता॥३.३॥हां गा कर्म तूचि अशेष।निराकरसी निःशेष।तरी मजकरवी हे हिंसक का करविसी तू॥३.४॥
अशाप्रकारे गुरूची विद्या गुरूवरच उलटवून अर्जुन म्हणतो,"एकदा कर्ता कर्म असे काही नाही असे म्हणून कर्मसंन्यासाचा उपदेश मला करतोस आणि पुन्हा लढायला कसा सांगतोस "असे म्हणून अर्जुनाने त्याची चक्क लाज काढली आहे आणि असा उलटसुलट उपदेश करून माझा बुद्धिभ्रम करत आहेस असे त्याला बजावत म्हणतो,
देवा तुवाचि ऐसे बोलावे।तरी आम्ही नेणती काय करावे।आता संपले म्हण पा आघवे।विवेकाचे॥३.६॥हां गा उपदेशु जरी ऐसा।तरी अपभ्रंशु तो कैसा।आता पुरता आम्हा घिंवसा।आत्मबोधाचा॥३.७॥वैद्य पथ्य करुनि जावे।मग जरी आणचि विष सुये।तरी रोगीया कैसेनि जिये।सांग मज॥३.८॥जैसे आंधळे सुइजे आव्हांटा।का माजवण दिले मर्कटा।तैसा उपदेशु हा गोमटा।वोढवला आम्हा॥३.९॥मी आधीचि काही नेणे।वरी कवळलो मोहे येणे।कृष्णा विवेकु या कारणे।पुसला तुज॥३.१०॥आम्ही तनुमनुजीवे।तुझिया बोला वोटंगावे।आणि तुवाचि ऐसे करावे।तरी सरले म्हणे॥३.१२॥आता ऐसियावरी बोधिसी।तरी निके आम्हा करिसी।एथ ज्ञानाची आस कायसी।अर्जुन म्हणे॥३.१३॥तरी जाणिवेचे कीर सरले।परि आणिक एक ऐसे झाले।जी थिते डहुळले।मानस माझे॥३.१४॥
पुढे आणखी देवाला तो बजावतो "देवा तूच असे केलेस तर मग संपलेच म्हणायचे.आम्हाला काही कळत नाही म्हणून तुला विचारायला गेले तर तू उपदेश असा चक्करछाप करत आहेस की माझे मन जे थोडेफार ताळ्यावर होते तेही पार गडबडून गेलेय.देवा तूच जर असा बोलू लागलास तर आम्ही अडाण्यानी काय करावे?अरे यालाच जर उपदेश म्हणायचे तर बुद्धिभ्रंश कशाला म्हणायचे?अरे वैद्याने पथ्यपाणी  सांगून औषध म्हणून जर विष दिले तर काय होणार?आंधळ्याला मुद्दाम आडवाटेला नेऊन सोडावे किंवा माकडाला भांग पाजावी तसाच तुझा हा उपदेश दिसतो. असाच उपदेश करणार असशील तर आमचे कल्याणच झाले म्हणायचे. "
     सहाव्या अध्यायाच्या सुरवातीस ही त्यांच्या विनोदाचा पुन्हा प्रत्यय येतो.त्यात संजय आणि धृतराष्ट्र यांचा संवाद आहे,
कैसी देवाची थोरी नेणिजे।जैसा तान्हेलिया तोय सेविजे।की तेचि चवी करुनि पाहिजे।तंव अमृत आहे॥६.३॥ तैसा आम्हातुम्हा जाहले।जे आडमुठी तत्त्व पाहिले।तंव धृतराष्ट्र म्हणितले।हे न पुसों तूते।६.४॥तया संजया येणे बोले।ऱायाचे हृदय जोचवले। जे अवसरी आहे घेतले।कुमारांचिया॥६.५॥हे जाणोनि मनी हासला।म्हणे म्हातारा मोहे नाशिला।एऱ्हवी बोलू तरी भला। अनसरिये॥६.६॥परि ते तैसे कैसेनि होईल।जात्यंधा कैसे पाहेल।तेवीचि येरु रुसे येईल।म्हणोनि बिहे॥६.७॥
   मागील अध्यायात कृष्णानी सांगितलेले तत्त्वज्ञान ऐकून झालेला आनंद संजय तिसऱ्या ओवीत प्रकट करतो.आता ते तत्त्वज्ञान धृतराष्ट्रानेही ऐकलेले असते त्यामुळे त्यालाही बरे वाटायला हरकत नव्हती पण त्याला संजयाकडून आपल्या पोरानी कुरुक्षेत्रावर काय दिवे लावले हे जाणण्याचीच काय ती उत्सुकता होती त्यामुळे तो म्हणतो," अरे शहाण्या हे तुला कोणी विचारलेय?"यावर संजय हे ऐकून मनात हसला आणि आपल्याशीच म्हणाला"हा म्हातारा पुत्रप्रेमाने अगदीच कामातून गेला.येवढे चांगले तत्त्वज्ञानही याला गोड लागत नाही "गाढवाला गुळाची काय चव असेच त्याला म्हणायचे आहे पण त्या म्हाताऱ्याला राग येईल म्हणून हे उघडपणे म्हणायला तो घाबरला.धृतराष्ट्राची अशीच चंपी पुन्हा एकदा नवव्या अध्यायात केली आहे.त्यात संजय म्हणतो,
अहो ऐकिजत असे की अवधारा।तंव इया बोला निवांत म्हातारा।जैसा भैसा नुठी का पुरां।तैसा उगाचि असे॥९.५२२॥तेथ संजये माथा तुकिला।अहा अमृताचा पाऊस वर्षला।की हा एथ असतुचि गेला।सेजिया गावा॥९.५२३॥तऱ्ही दातारु हा आमुचा।म्हणून हे बोलता मैळेल वाचा।काय झाले ययाचा।स्वभावोचि ऐसा॥९.५२४॥
संजय थट्टेने म्हणतो,"अहो येवढे चांगले तत्त्वज्ञान ऐका म्हटले तरी हा म्हातारा अगदी पाण्यात बसलेल्या रेड्यासारखा सुस्त बसलाय,येवढा अमृताचा वर्षाव झाला पण हा जणु त्या गावचाच नाही असे दाखवतोय,पण काही झाले तरी तो आमचा मालक आहे तेव्हा गप्प रहाण्यातच शहाणपण आहे.पण याचा स्वभावच असा त्याला काय करावे?
      अठराव्या अध्यायात पुन्हा धृतराष्ट्राच्या बालिश बुद्धीचे दर्शन विनोदी भाषेत घडवले आहे. संजयाच्या तत्त्वज्ञान कौतुकाला कंटाळून तो त्याला म्हणतो,
तेथ कोणी येकी अवसरी।होआवी ते करुनि दुरी।रावो म्हणे संजया परी।कैशी तुझी गा॥१८.१६२३॥तेणे तूंते येथे व्यासे।बैसविले कासया उद्देशे।अप्रसंगामाजी ऐसे।बोलसी काई॥१६२४॥जो जेथीचे गौरव नेणे।तयासि ते भिंगुळवाणे।म्हणोनि अप्रसंगु तेणे।म्हणावा की तो॥१६२६॥
"अरे बाबा व्यासानी तुला येथे बसवलेय कोणत्या उद्देशाने?(धृतराष्ट्राच्या मते युद्धाचा वृत्तांत सांगण्यासाठी)आणि तू मात्र उगीचच नको त्या गोष्टी(म्ह.तत्त्वज्ञान) सांगून मला वैताग आणतो आहेस."यावर संजय म्हणतो,"या गोष्टीची याला चव नसल्यामुळे याला हा वैतागच वाटणार"
    पुढे मात्र धृतराष्ट्र मोठ्या आशेने या युद्धात जय कोणाचा होणार याविषयी संजयाचे स्पष्ट मत विचारतो.आणि पुन्हा त्याच्याकडून काय उत्तर अपेक्षित आहे हेही एकाद्या बालका(किंवा हुकुमशहा) सारखे सांगून टाकतो."अरे संजया नाहीतरी दुर्योधन महाप्रतापी आहेच,शिवाय दुसऱ्या बाजूपेक्षा(पांडवांचा सरळ उल्लेखही टाळतो)दीडपट सैन्य त्याच्याकडे आहे तर मग त्यालाच विजय मिळायला नको का?" यावर संजय काय उत्तर देणार?पण तोही काही कच्च्या गुरूचा चेला नाही‌. सरळसरळ उत्तर न देता ज्या बाजूला योगेश्वर कृष्ण आणि धनंजय पार्थ आहे त्या बाजूलाच विजय मिळणार हे सांगून आपण सच्चा पत्रकार आहे हे दाखवून देतो.
म्हणे सांगे प्रस्तुत।उदयलेसे जे उत्कळित।ते कोणासि बारे जैत।देईल शेखी॥१८.१६२७॥एऱ्हवी विशेषे बहुतेक।अमुचे ऐसे मानसिक।जे दुर्योधनाचे अधिक।प्रताप सदा॥१६२८॥आणि येराचेनि पाडे।दळही याचे देव्हडे ।म्हणोनि जैत फुडे।आणील ना ते॥१८२९॥आम्हा तंव गमे ऐसे।मा तुझे जोतीष कैसे।ते नेणो संजया ऐसे।तैसे सांग पा॥१६३०॥
यावरील संजयाचे उत्तर
यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनंजयः।तत्र श्रीविजयोर्भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम
तर प्रसिद्धच आहे,त्यावर बरेच भाष्य करून ज्ञानदेवानी संजयाच्या तोंडी घातले आहे,
म्हणोनि जेथ श्रीश्रीमंतु।जेथ तो पांडूचा सुतु।तेथ विजय समस्तु।अभुदयो तेथ॥१६५५॥