एक डाव भुताचा -भाग १

एक डाव भुताचा


                 माधवीला कंपनीच्या कामाकरता नॅशविल टेनेसीला जायचे होते. आपले सामान घेऊन माधवी विमानतळाकडे जायला निघाली. तिने आपला पती आनंद आणि चिमुरडी सायली ह्यांचा निरोप घेतला.   विमानात बसण्याची सूचना झाल्यावर तिने सहकाऱ्यांबरोबर नॅशविल, टेनेसीला जाणाऱ्या विमानात पाऊल ठेवले.   दोन महिन्यापूर्वी त्याच शहरात ती कंपनीच्या कामासाठी गेली होती.   त्यामुळे तिला ऑफिस, राहण्याचे हॉटेल व आजूबाजूची उपाहारगृहे ह्यांची माहिती होती.    माधवीने दोन अवघड प्रोजेक्ट्स यशस्वी केली होती.  त्यानंतर नुकतीच तिला बढती मिळाली होती.  तिच्यासारखी आपल्यालाही बढती मिळावी असे तिची सहकारी ख्रिस्तीनला वाटत होते. एवढेच नाही तर तसे न झाल्याची नाराजी ख्रिस्तीनने वारंवार बोलून दाखवली होती.   कधी कधी माधवीशी  वाद घालण्याकरता दोन तीन कारणे तिने उकरून काढली होती.  ह्या प्रोजेक्टवर ख्रिस्तीन आणि रीटा दोघी तिच्या बरोबर होत्या त्यामुळे माधवी जरा काळजीतच होती.  कोणत्याही वादात न शिरता काम करायचे असा माधवीने मनाशी ठरवले होते.


               कॅप्टनने ' विमान नॅशविलला पंधरा ते वीस मिनिटात उतरेल' अशी घोषणा केली त्याने माधवीची विचारश्रृंखला भंगली.  तिने खिडकीतून बाहेर बघितले तर तिला असंख्य थडगी दिसली.  शेजारी बसलेल्या माणसाने व्हिएटनाम वॉरमधील कित्येक वीरांची कायमची विश्रांतिस्थाने इथे आजूबाजूला होती असे तिला सांगितले. हिवाळ्याचे दिवस होते.  संध्याकाळची वेळ होती.  झाडावर बर्फ विखुरले होते.    सूर्याच्या किरणात बर्फ चमकत होते.  काही पानांवर बर्फ वितळून  पाण्याचे थेंब पडत होते.    प्रत्येक थडग्यावर असलेला क्रॉस आणि काही थडग्यांजवळ असलेली फुले  थंडीत कुडकुडत होती. 


             विमान जमीनीवर उतरले. अंगात कोट आणि कानाला स्कार्फ गुंडाळून माधवी विमानतळावर उतरली.   ख्रिस्तीन व माधवी रेंटल कार शेअर करणार होत्या.  ख्रिस्तीन कारच्या किल्ल्या घेत असताना माधवी आनंदशी बोलत होती.  "हॉटेलवर गेले की पुन्हा फोन करते " असे म्हणून माधवीने आनंदचा निरोप घेतला. त्यावेळी सायलीचा 'वरणभात नकोय, पास्ता हवा आहे ' याचा हट्ट तिच्या कानावर पडला होता.  


            गाडीच्या किल्ल्या मिळाल्या.  माधवीने आपले सामान उचलले आणि ती ख्रिस्तीनबरोबर चालायला लागली .  सिगरेटचे चार झुरके घेऊन ख्रिस्तीनने गाडी सुरू केली. अर्थात ते चार झुरके घेण्याआधी तिने माधवीला परवानगी विचारण्याची औपचारिकता नेहमीप्रमाणे दाखवली होती.  माधवीने गाडीचे दार बंद केले. उन्हाची तिरीप डोळ्यावर येऊ नये म्हणून तिने गॉगल लावला. 
"तू दार दोनदा लावलेस का?" ख्रिस्तीनने विचारले.
"लावले असावे बहुधा !  नीट लागले की नाही ते बघायला" माधवीने उत्तर दिले.
दार लावण्याचा आवाज दोनदा आला होता.  पण माधवीला खात्री होती की तिने दोनदा दार लावले नाही.  


"तू कुठे जेवणार आहेस?"माधवीने विषय बदलला.


"मी काहीतरी घेऊन ते आपल्या खोलीत खाणार आहे"ख्रिस्तीनने उत्तर दिले.  माधवीने  त्याला संमती दिली आणि रात्रीची जेवणाची समस्या सोडवली.


              दोघी हॉटेलात आल्या.  स्वागतकक्षातून माधवीने खोलीच्या किल्ल्या घेतल्या.  तिची खोली चौथ्या मजल्यावर होती. ख्रिस्तीनला "उद्या भेटू " असे सांगून ती  चौथ्या मजल्यावर जाण्याकरता लिफ्टमध्ये शिरली.  लिफ्ट  थांबली अन माधवी बाहेर पडली.  माधवी दार उघडणार  तेवढ्यात खालच्या जाजमावर एक चमकणारे पंचवीस सेंटचे नाणे;क्वार्टर पडला.


' माझ्या खिशात तर सुटे नाहीत, बहुतेक आधीचाच असेल कोणाचा तरी'  अशा विचारात माधवीने दार उघडले आणि ती आत खोलीत गेली.   तिने आनंदला घरी फोन केला तर 'निरोप ठेवा 'असा संदेश आला.  
' दोघे कुठे बरे गेले असतील?'  माधवीने आनंदच्या भ्रमणध्वनीवर (सेलफोनवर) फोन केला. तेंव्हा तिला दोघे बाहेर जेवायला गेले आहेत असे समजले.    'रात्री बोलू' असे सांगून आनंदने फोन ठेवला. 


             माधवीने तिच्या आवडीची बासरीची सीडी लावली. नंतर ती अंघोळीकरता बाथटबात शिरली.  बराच वेळ झाला तरी गरम पाण्यातून तिला बाहेर पडावेसेच वाटत नव्हते.  साबणाच्या फेसाचा रेशमी स्पर्श तिला हवासा वाटत होता.  अखेर कॉफी घेऊ म्हणून ती बाहेर आली.  कॉफीचा सुवास खोलीभर दरवळत होता.  माधवीने कॉफीचा मग हातात घेतला. कॉफीचा एक एक घोट तोंडात घोळवत तिने बॅगेतले कपडे नीट कपाटातल्या खणात ठेवले. 


'घरी असा निवांतपणा क्वचितच मिळतो.कितीतरी दिवसांची अर्धवट राहिलेली मराठी पुस्तके आता पूर्ण करता येतील.' माधवीने मनाशी विचार केला.
मऊ दुलईत शिरून माधवीने पुस्तक वाचण्यास सुरुवात केली.  दीड दोन तासांनी भुकेची जाणीव झाली तेंव्हाचं कुठे माधवी उठली.  बांधून आणलेले जेवण गरम करून ती बाहेरच्या खोलीत आली.  तिने टीव्ही सुरू केला.  रिमोटने एक पासून शेवटपर्यंत सगळी चॅनेल्स पुढे मागे करून पाहिली.  पण काही बदल होत नव्हता. तिला फक्त ज्या चॅनेलवर बेसबॉल होता तीच दिसत होती. माधवी वैतागली.   स्वागतकक्षात फोन करून तिने आपली तक्रार सांगितली.  इतक्यात तिचा भ्रमणध्वनी वाजला.  तिने क्रमांक पाहिला. आनंदचा फोन होता.

"आनंद ,मला ह्या खोलीत अगदी एकटे वाटते आहे, तुझी आठवण येते आहे " माधवीने आनंदला सांगितले.  सायली झोपली होती.  जेवता जेवता माधवीने आनंदशी गप्पा मारल्या.  ह्या खोलीतल्या दूरदर्शनवर फक्त बेसबॉल दिसतो आहे अशी तिने आनंदकडे तक्रार केली. 
" बेसबॉलप्रेमी भूत असेल एखादे खोलीत ! त्यामुळे तुला फक्त बेसबॉलच दिसतो आहे. "आनंद नेहमीसारखा तिला चिडवण्याच्या स्वरात म्हणाला.


 रात्र बरीच झाली होती. "एकटी आहेस, घाबरू नकोस. काळजी घे" आनंदने संभाषण संपवत म्हटले. 


माधवीने फोन ठेवला. ती झोपण्याच्या खोलीत आली.  आत येताच माधवीला सिगरेटचा वास आला. 
'हे कसे काय? ही तर 'धूम्रपान निषिद्ध ' खोली आहे. मघाशी तर वास नव्हता. सिगरेटचा वास कसा आला ते तिला कळेना.' 
'कदाचित शेजारच्या खोलीतला असावा.' माधवीने खिडकीचे काचेचे शटर बंद करत मनाची समजून घातली.  
उद्या हे शटर उघडायचेच नाही हे सुद्धा तिने ठरवून टाकले. घड्याळ घेऊन माधवीने दुसऱ्या दिवशीचा अलार्म लावला.  दुलईत शिरताना 'एकटी आहेस तेंव्हा घाबरू नकोस', हे आनंदचे वाक्य आठवून तिला हसू आले.


         सकाळी सात वाजता स्वागतकक्षात माधवी आली तेंव्हा ख्रिस्तीन व रीटा दोघीजणी लिफ्टमधून बाहेर होत्या.  
'कशी आहेस माधवी? रीटाने   विचारले.
"मी मजेत. रिटा तू केंव्हा आलीस? " माधवीने तिला प्रश्न केला.  
"माझे विमान उशीरा आले.  त्यामुळे काल बराच उशीर झाला होता. मी रात्री जेवलेच नाही, चला चटकन ब्रेकफास्ट करू" रीटाने खुर्ची मागे ओढत उत्तर दिले. 
"मी  काल रात्री झोपू शकले नाही" रीटा माधवीकडे पाहतं म्हणाली.
"का गं? तब्येत ठीक आहे ना?" माधवीने काळजीने विचारले.
"हे काय तुला माहिती नाही? या हॉटेलात भुते आहेत असे म्हणतात. बरीच माणसे आजकाल जादूटोणा कसा करायचा ते शिकतात म्हणे !त्याचा परिणामही असेल.   आधीच इथे भुते आहेत त्यात ख्रिस्तीनसारखी भुतांवर प्रेम करणारी माणसे. " आपली नजर ख्रिस्तीनवर रोखत रीटाने उत्तर दिले.
"मी फक्त मंत्रविद्या शिकते आहे.  तसा फार कमी वेळ मिळतो ऑफिसचे काम सांभाळून" हातातल्या एक पुस्तकाकडे बोट दाखवत ख्रिस्तीनने सांगितले.


"बाप रे, हे काल समजले असते तर मी हॉटेल बदलले असते "माधवी उत्तरली. 
"त्यात काय?  तू हॉटेल अजूनही बदलू शकतेस.  फक्त खोली रिकामी आहे का ते पाहावे लागेल आणि  तू कार शेअर करते आहेस त्यामुळे जवळपासच राहा म्हणजे ख्रिस्तीनची गैरसोय होणार नाही. " रिटा आपल्या ब्रेडला जॅम लावता लावता म्हणाली.
"भितीने तू काल झोपली नाहीस ना? मग तू का राहते आहेस इथे?" माधवीने रीटाला विचारले.
"जवळपासची सर्व हॉटेल्स मी पाहिली आहेत.  या आठवड्यात इथे 'जाझ फेस्टिवल' आहे , त्यामुळे कुठेही रिकामी खोली नाहीये. " रीटाने उत्तर दिले.
'आपण गेल्या वेळी तर इथेच राहिलो होतो. तेंव्हा कुठे काय झाले?' ख्रिस्तीनने माधवीला विचारले.  
खाणे आटोपून त्या गाडीकडे निघाल्या.  
"नेहमीच होते असे नाही. पण कित्येकांना बरेवाईट अनुभव आले आहेत." ख्रिस्तीनने गाडी सुरू करताना सांगितले. 
आपल्याला काही होणार नाही असा मनाला धीर देत माधवीने भुताचा आणि हॉटेल बदलण्याचा विचार मनातून काढून टाकला. 



                    दिवसभर खूप काम होते.   माधवी मनात सिगरेटचा वास आणि बेसबॉलचेच  चॅनेल का लागते याचे कारण शोधायचे प्रयत्न करत होती.  संध्याकाळी साडेसहा वाजता काम आटोपून हॉटेलवर येईपर्यंत सर्वजण चांगलेच दमले होते.  शहराच्या मध्यभागात जाऊन फेरफटका मारण्याचा उत्साह कुणालाच नव्हता.  तो बेत उद्यावर ढकलून तासाभरात माधवीच्या सहकाऱ्यांनी हॉटेलमधील बारमध्ये जमायचे असे ठरले.  
"भेटू नंतर "असे म्हणत माधवी आपल्या खोलीकडे जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरली. 


                  खोलीत आल्यावर माधवीने आनंदला फोन लावला व बोलता बोलता ती  बाहेरच्या खोलीत आली.  आनंदशी व सायलीशी तिने गप्पा मारल्या.  आपली कॉफी संपवली.  दारात पडलेले वर्तमानपत्र चाळले.  माधवी खाली बारमध्ये जाण्याकरता निघाली तेंव्हा झोपण्याच्या खोलीतील टीव्ही सुरू आहे असे तिला वाटले.  बघते तर खरंच टीव्ही, खरंच सुरू होता! आणि तो माधवीने सुरू केला नव्हता एवढे निश्चित! माधवीच्या छातीचे ठोके वाढले होते.  रामनामाचा जप करत माधवीने टीव्ही बंद केला.  टीव्हीचा आवाज अगदी कमी होता. त्यामुळे आपल्याला आधी तो सुरू आहे असे समजले नसावे  अशी तिने स्वतःची समजून घातली.    सगळेजण बारमध्ये भेटणार होते म्हणून माधवी  खोलीतून पटकन खाली आली.   तिला खोलीत एकटे राहण्याची आता खूप भिती वाटत होती.


क्रमशः