एक डाव भुताचा- भाग २

एक डाव भुताचा-भाग २


  टीव्ही कसा सुरू झाला याचा विचार करून तिचे डोके गरगरायला लागले होते.   माधवीने कोक पिण्यास सुरुवात केली.  ती एवढी घाबरली होती की बियर ,व्हिस्की, स्कॉच यातले काहीही तिने आज घशांखाली ओतले असते.  आनंदला टीव्हीबद्दल जे घडले सांगावे किंवा नाही याचा ती विचार करत होती.  पण त्याला उगीच आणखी चिंता नको म्हणून माधवीने त्याचा उच्चारही न करण्याचे ठरवले.   हातातल्या थंड बियरचा आस्वाद घेत सहकारी आपला दिवस कसा गेला त्याबद्दल बोलत होते.  तासाभराने त्यांनी पिझ्झ्याची ऑर्डर दिली आणि तो येईपर्यंत गप्पांना उधाण आले.  एकाच कंपनीत पण वेगळ्या गटांमध्ये काम करत असल्याने काही मंडळी एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होती.   घरी कोण असत, आपले काम आणि छंद याविषयी ते बराच वेळ गप्पा करत होते.  माधवी खरं तर खूप बोलकी होती. पण आज ती  बोलत होती ते फक्त तिची टर्न आल्यावरच!  माधवीने पिझ्झाचा एक स्लाइस कितीतरी वेळ  हातात धरून ठेवला होता.  भूक असूनही ती काही खाऊ शकली नाही.  रात्री दहाच्या आसपास पिझ्झा खाऊन सर्वजण आपल्या खोलीकडे जाण्यास निघाले. 


                माधवी आपल्या खोलीजवळ आली. साशंक मनस्थितीत तिने खोलीचे दार उघडले.  झोपण्याच्या खोलीत न जाता ती पुढच्या खोलीतल्या सोफ्यावरच बसली.  आतल्या खोलीतला टीव्ही व सिगरेटचा वास ती विसरली नव्हती.  अगदी झोप येईपर्यंत काम करायचे असे ठरवून तिने आपला लॅपटॉप सुरू केला.  धडधडत्या अंतःकरणाने ती अधुनमधुन घड्याळाकडे पाहतं होती. एक वाजता आला होता.  अचानक तिच्या नाकाला तोच सिगरेटचा वास आला. 
" तुला काय वाटले, मला बाहेरच्या खोलीत येता येत नाही? " एक धूसर मनुष्याकृती तिच्या समोर येत म्हणाली.


माधवीच्या तोंडून शब्द फुटेना. तिने भ्रमणध्वनी घेण्याचा प्रयत्न केला.


"पोलिसांशी, हॉटेलच्या स्वागतकक्षाशी ,कुणाशीच तुला संपर्क करता येणार नाहीये.  तेंव्हा शांतपणे मी म्हणतो तसेच कर. "
ती आकृती माधवी शेजारी कोचावर विसावली. काही क्षणांनी त्याजागी एक माणूस दिसू लागला.


" तू मला सॅम म्हणू शकतेस. "


"तुझी मुलगी कशी आहे? " त्या माणसाने विचारले.


भितीने माधवीच्या तोंडून शब्द फुटेना.  बराच वेळ उत्तर नाही पाहून आणखी चढ्या आवाजात त्याने पुन्हा प्रश्न केला.


"माझा प्रश्न समजला नाही का? "


"ठ ठीक  आहे.ठीक आहे, मी नाही  म्हणून हट्ट करून वडिलांना त्रास देते आहे." माधवीने मोठ्या कष्टाने उत्तर दिले. 


"तुमच्या सारखे आमचेही 'मूड स्विंग' होतात. मला चीड येईल असे वागू नकोस. एवढे लक्षात ठेव. शिवाय ह्या खोलीत घडणाऱ्या घटनांचा मागमूसही बाहेर कुणाला लागणार नाही याची मी खबरदारी घेतली आहे. सॅमने हातातली सिगरेट संपताच दुसरी शिलगावली.


"ह्या खोलीत धूम्रपानास बंदी आहे" हे वाक्य माधवीने एका आवंढ्याबरोबर गिळले. घाबरली असूनही तिचा चेहरा नापसंती दर्शवत होता.


"मला माहिती आहे" असे म्हणत सॅमने सिगरेटचा धूर आत घेतला.   तिच्या मनातले विचार सॅमने जाणले होते.  दोन झुरक्यानंतर सिगरेट दिसेनाशी झाली.  ह्याला आपल्या मनातले विचार कळतात ह्या  विचाराने माधवी सटपटली होती.

"कोण आहेस तू? कशाकरता इथे आला आहेस?"माधवीने तरीसुद्धा धीर एकवटून पण चाचरत विचारले.


"मी कोण आहे ते ,सांगायला हवे असे वाटत नाही. माझे नाव तर सांगितले आहेच. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर इथेच असतो. हा भाग आमच्या मालकीचा आहे. ही हॉटेलची जागा आम्हाला आवडते. यातले कितीतरी कर्मचारी माझे मित्र आहेत. "


"अरे देवा! म्हणजे इथली माणसे पण खरी माणसे नाहीत" सुरांचेच ओझे होऊन बासरी थरथरावी तसे तिचे हृदय कंप पावत होते. बोटे थंडगार पडली होती व घसा कोरडा!


"तुला सिगरेटचा वास आवडत नाही ना?तू अगदी जशी होती तशीच आहेस." सॅम हळू आवाजात म्हणाला.  तरी माधवीने ते वाक्य ऐकले होते. पण तिला त्या वाक्याचा नीट अर्थबोध झाला नाही.


"तू विमानातून जी थडगी पाहिलीस ना, त्याच्या जवळच आमची वसाहत आहे.  व्हिएटनाम युद्धानंतर आम्ही तिथेच राहतो. 

"सॅम तुला मराठी कसे येते?"माधवीने हळूच विचारले.
"माधवी ,माझ्या मराठी मित्रामुळे मी मराठी शिकलो. मला काही मराठी गाणी सुद्धा आवडतात."


"हे कसे येते? ते कसे येते ?हे कसे शक्य आहे ?असे तर्क करत बसू नकोस. माझे वागणेच कोड्यात टाकणारे आहे." सॅमने हसत उत्तर दिले.


" तसे आम्हाला स्थळकाळाचे , भाषेचे बंधन नाही म्हणा. "बोलता बोलता सॅम खोलीतले सामान न्याहाळत होता.


तेव्हढ्यात "वाचवा "अशा एका स्त्रीच्या किंकाळीने हॉटेलचा परिसर दणाणून उठला.  ते ऐकताच सॅम खदखदा हसू लागला.  ती किंकाळी ऐकून माधवी अधिकच घाबरली.  त्यात सॅमचे हसणे ऐकून ती थरथर कापू लागली.

"घाबरू नकोस, तिला काही होणार नाही.   माझा मित्र डेव्हिड तिची थोडी गंमत करतो आहे. फक्त तो खोलीतून आवाज बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायला विसरला आहे."  काही घडलेच नाही अशा थाटात सॅमने उत्तर दिले.  सॅम माधवीजवळ असणाऱ्या सीडीज पाहतं होता.  सॅमने खणातून सुरेश भटांची एक सीडी घेतली आणि सुरू केली. 

'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे..


"हे गाणे मला खूप आवडते, "सॅमने काहीसे विचारमग्न होत माधवीला सांगितले. ते गाणे ऐकताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावुक छटा दिसत होती.
 
"हा मोबाईल फोन, लॅपटॉप, डिजीटल कॅमेरा, सीडी प्लेअर असे काही नव्हते आमच्यावेळी. तुमची मजा आहे." सॅमने तिच्या सामानाकडे पाहतं म्हटले.

"हो, माझ्या बाबांच्या जमान्यात पण काही नव्हते हे! आता सगळे मिळाले आहे तरी पण माझे बाबा आमच्या वेळी, आमच्या वेळी ,असे लेक्चर देत असतात" माधवीने ओठावर आलेले वाक्य परतवले. सॅम आपल्याला इजा करेल या भितीने माधवी मोकळेपणे बोलू शकत नव्हती.

" 'आमच्या वेळी असे नव्हते 'हे शाश्वत वाक्य आहे लक्षात ठेव.  कोणास ठाऊक तुझी मुलगी मंगळावरही जाईल.  तुझी नात दुसऱ्या आकाशगंगेतल्या पृथ्वीवरून जेव्हा तुला तिची खेळणी दाखवेल.  तेंव्हा तुला तिला 'आमच्या वेळी असे नव्हते' असे सांगशील ना तेंव्हा समजेल मी काय म्हणतो ते." सॅमने जणू तिचे म्हणणे ऐकले आहे अशा थाटात उत्तर दिले.


"तुला माझ्या मनातले कसे काय कळते?"माधवीने धीर करून विचारले.


" बऱ्याच कला नि विद्या आम्हाला अवगत आहेत. पण काही मर्यादाही आहेत.  वेळ येईल तेंव्हा आणखी माहिती देईनच" सॅमने आपले पाय कोचावर ताणून दिले. जणू आपलेच घर आहे अशा थाटात सॅम वागत होता.


"गरम कॉफी आहे का? जेवणानंतर कॉफी घेण्याची मला सवय आहे. "सॅमने कॉफी तयार करणाऱ्या यंत्राकडे(कॉफीमेकरकडे) जात माधवीला प्रश्न विचारला.


गरम वाफाळत्या कॉफीचे घोट घेऊन सॅम अधिकच ताजातवाना दिसू लागला.  त्याने शेजारी पडलेला 'यूएसए टुडे ' उघडला.   इराकच्या युद्धाशी संबंधीत बातम्या त्याने डोळ्याखालून घातल्या.  नंतर त्याने खेळाच्या बातमीपत्रावर एक नजर फिरवली. 


                      डोळ्याच्या कोपऱ्यातून माधवी सॅमचे निरीक्षण करत होती. तिला सॅमची भिती वाटत होती. त्याचबरोबर तो इथे का आला आहे त्याची उत्सुकतादेखील.  पहाट होत आली होती.  सॅमने खिशातून एक चकाकणारा क्वार्टर काढला. तो क्वार्टर पाहताच माधवी चमकली. तसाच क्वार्टर ती खोलीत शिरताना तिच्या पायाजवळ जाजमावर पडला होता.


तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सॅम हसला "माझाच क्वार्टर पडला होता. तू बरोबर ओळखलेस.  "
"माधवीला आज मारू नकोस असे क्वार्टर म्हणाला म्हणून आज जिवंत ठेवलय तुला" सॅमने हसत उत्तर दिले.

" इथे राहावे की जावे?" हातातला क्वार्टर वर उडवत सॅम स्वतःशीच बोलत होता.  खाली पडून फिरत फिरत नाणे थांबले.


सॅमने वाकून जमीनीवरचा क्वार्टर उचलला. त्याकडे निर्देश करत सॅम माधवीकडे पाहून म्हणाला" ह्याचे म्हणणे आहे की माझी जाण्याची वेळ झाली आहे."


"पण  मी उद्या येईन, तुझ्याशी बोलायचे आहे. "त्यानंतर हात हालवतं तो बंद दारातून निघून गेला.  ते पाहून माधवीने आपला घाम पुसला. ऐन थंडीत ती घामाने चिंब भिजली होती.  सॅमच्या मनात आले तर तो आपल्याला मारेल याची तिला शंका नव्हती. विचारात डोळा कधी लागला ते माधवीला समजले नाही.
क्रमशः