एक डाव भुताचा - भाग ४

  एक डाव भुताचा- भाग ४


                      नंतरचा दिवस नेहमीप्रमाणे गेला. सहकाऱ्यांबरोबर जेवण झाल्यावर सर्वांचा निरोप घेऊन माधवी आपल्या खोलीत आली.   मध्यरात्र झाली.  माधवी मनातले विचार कागदावर लिहीत जागी होती. तेवढ्यात सॅम आला.
"सॅम सर्व ठीक आहे ना? " मद्याचा वास माधवीच्या नाकात शिरला होता."हो, आमची बेसबॉलची मॅच होती. आम्ही हरलो.  "सॅमने एका दमात कॉफीचा मग रिकामा केला आणि उत्तर दिले. 
" सॅम बेसबॉलची मॅच हरल्याचे एवढे दुःख? "
"ते समजण्यासाठी तुला अमेरिकनच व्हावे लागेल" सॅमचे तिच्याकडे लक्षच नव्हते. 'सुन्या सुन्या मैफिलीत' ही गजल तो मन लावून ऐकत होता. 
"एवढे काय खास आहे बेसबॉलमध्ये ?"माधवीने विचारले.  पण सॅम अजूनही विचारात होता.
"सॅम, तू रोज हीच गजल का ऐकतोस?" माधवीचे प्रश्न सुरू झाले होते. तिची भीड आता चेपली होती.


"खूप प्रश्न विचारतेस. अगदी तिच्यासारखेच." शेवटचे वाक्य सॅमने एवढे हळू म्हटले होते तरी माधवीला ऐकू गेले.
" कोणासारखे प्रश्न विचारते मी?"माधवीच्या या प्रश्नाकडे सॅमने दुर्लक्ष केले होते.
" तुला मॅच हरल्याचे एवढे दुःख का झाले आहे?" माधवीने पुढचा प्रश्न केला.
"माधवी ,इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असे मला खूप वेळा वाटतंय.  पण मी काही करू शकत नाही. कितीदा त्याच्याकडून हार पत्करायची?"
"म्हणजे?" माधवी पुरती गोंधळली होती. 
माधवीला याची काही कल्पना नसणार हे ध्यानात येताच सॅम बोलू लागला ,"लग्नाआधी चार वर्षे मी आणि एलिझाबेथ एकत्र राहतं होतो.  वयाच्या तिसाव्या वर्षी माझे आणि एलिझाबेथचे लग्न झाले.  आम्हाला लिसा नावाची एक मुलगी होती.   लग्नानंतर तीन वर्षांनी मला युद्धाकरता जावे लागले.  ५व्या मेकॅनिकल डिव्हिजन मध्ये मी होतो.  आम्हा चार जणांजवळ असणारा M48A3 रणगाडा त्या युद्धात वापरलेला सर्वात जड तोफांपैकी होता. मी व्हिएटनाममध्ये असताना एलिझाबेथने आमच्या एका मित्राशी , जॉनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
आज फक्त मॅच हरल्याचे दुःख नाही, त्या  टीममध्ये जॉन होता याचे दुःख आहे." सॅमच्या आवाजातली चीड आणि दुःख सहज जाणवत होत.


"म्हणजे जॉन तुझ्यासारखाच? ओह ...मग एलिझाबेथ कुठे आहे?"  माधवीने विचारले.


सॅमने डोळे मिटून घेतले. 


"मला माफ कर सॅम, मी तुला असे प्रश्न विचारायला नको होते."माधवीच्या स्वरातून अपराधीपणा लपत नव्हता.


सॅम कॉफी पीत होता. तो एकटक माधवीकडे पाहतं होता.  विषय बदलायला हवा म्हणून माधवीने आणखी प्रश्न विचारायचे ठरवले.

"इराकचे युद्ध किती काळ सुरू राहील ?तुझे काय मत आहे ह्या युद्धाबद्दल?अमेरिका जे करते आहे ते बरोबर की चूक?"माधवीने न राहवून त्याला विचारले. 


"९/११ नंतर जगातील दहशतवाद मोडून काढण्यासाठी अमेरिकेने योग्यच पावले उचलली आहेत. "क्षणाचाही उशीर न करता सॅमने उत्तर दिले.

"पण इराकमध्ये युद्धासाठी जाऊन आलेले व व्हिएटनाम युद्धातील काही देशभक्त तर ह्या युद्धाच्या विरोधात आहेत? तुझे काय मत आहे? "माधवीने विचारले.


"कित्येक ऑफिसर्स लढाईतून माघार घेत आहेत. त्यांचा पाठिंबा अमेरिकन सैन्याला आहे . पण ज्या देशापासून नजिकच्या भविष्यात अमेरिकेला धोका नाही त्यांच्याशी आता लढाई थांबवावी असे त्यांचे मत आहे. सैन्यात भरती होणाऱ्यांची संख्यासुद्धा रोडावते आहे." माधवीने आपल्याला असलेली माहिती सॅमला दिली.


"खरं आहे ते, अमेरिकन सैन्य वा जगातील कुठलीही निरपराध जनता ह्याचा बळी होऊ नये असे मलाही वाटते. शिवाय जगात कुठेही मोठ्या कालावधीकरता अमेरिकन सैन्याचा पोलीस म्हणून वापर मला आवडणार नाही. पण मी रिपब्लिकन आहे म्हणूनच आता या विषयावर मी फारसे बोलणार नाही. " सॅमने आपली नाराजी लपवण्याचा प्रयत्न केला.


"म्हणजे निरपराध लोक मेले तरी चालेल असेच ना?"  माधवीच्या आवाजात थोडी चीड होती.


"आपल्या जिवलगांपासून दूर ,तळहातावर प्राण घेऊन लढणे एवढे सोपे नसते, तुला वातानुकूलित घरात बसून त्याची कल्पना कशी येणार?"सॅमने उत्तर दिले.    


सॅमचा मूड फारसा ठीक नव्हता . दोघेही शांत होते. बराच वेळ गेला. पहाट झाली होती. नेहमीप्रमाणे सॅमने घड्याळाकडे नजर टाकली
"मी येतो" असे म्हणून तो निघून गेला. तिचे खूप प्रश्न अनुत्तरित होते. म्हणून माधवीला त्याला थांबवावे असे वाटले होते.


                सॅम निघून गेला आणि माधवीच्या मनात विचारचक्र सुरू झाले. सॅमला नक्की काय हव आहे ते तिला समजत नव्हत. त्याच्या विषयी भितीची जागा कुतूहलाने घेतली होती. त्याच्या विषयी सहानुभूती वाटत होती. त्याच्याबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटत होते की ज्याचे कारण ती शब्दात सांगू शकत नव्हती.


क्रमशः