अजुन एक कवच...

आज सकाळी नेहमीप्रमाणे ठाण्याला लोकल ट्रेन मध्ये चढलो. सवयीची गर्दी. गाडी सुटायला २-३ मिनटे होती, एवढ्यात जोराचा आवाज झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गोठलेली भिती होती. 'काय झाले' 'काय झाले' घाबरून एकमेकांना विचारत होते. दारात उभे राहिलेले स्टेशनवर उतरले. आवाज दुसरा-तिसरा कसला नसून, एक नंबर फलाटाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका रिक्शाच्या फुटलेल्या टायरचा होता.
परवाच्या स्फोटापासून प्रत्येकजण हादरला आहे. घाबरला आहे. थोडं कुठे खुट्ट झालं तरी बावरून इकडे तिकडे बघतो आहे. गाडीत कोणी मोठी पिशवी घेऊन आले तरी आजूबाजूची माणसं त्याला विचारतात आत काय आहे ते!
स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी गाडीत सर्व सुन्न बसून होते. वर्तमानपत्र वाचत होते, पण कोणी जास्त बोलत नव्हते, नेहमीसारख्या चर्चा झडत नव्हत्या. सगळं शांत होत.
बाहेर सर्व जगात मुंबईच्या सामान्य माणसाच्या शूरपणाचे कौतुक होत आहे, पण सामान्य मुंबईकर सुन्न झाला आहे, घाबरला आहे, अत्यंत असाहाय्य आहे. सकाळी घर सोडल्या नंतर परत घरी येऊ याची त्याला खात्री नाही. दररोज नोकरी वर तर जावं लागणारच आहे, त्याला पर्याय नाही. लोकल ट्रेनशिवाय कामावर जाऊही शकत नाही. ट्रेनचा प्रवास ही त्याची असहायता आहे, शूरता न्हवे.
या असहायतेवर त्याने शूरतेचं नवं कवच घातलं आहे इतकंच!



राहुल