संधी - भाग ३

प्राचार्यांनी जो गोषवारा सांगीतला तो खडपेंनी शांतपणे समजाऊन घेतला. डॉ. स्वामीनाथन कडुन आलेले पत्र ही वाचले, प्रश्नावली नजरे खालुन घातली.


"सर , हे काम मी करतो , आपण काळजी करु नका" - खडपे हसतमुखाने , आश्वासक शब्दात म्हणाले.


"धन्यवाद खडपे, मला तुमच्या बद्द्ल खात्री होतीच, काम सुरु करा, काही मदत लागल्यास अवश्य सांगा" - प्राचार्य.


मुळात खडपेंना हे काम म्हणजे काही ब्याद, लचांड, ओझे असे वाटलेच नाही. नाही तरी रोज महाविद्यालय सुटल्या वर शेता कडे एक चक्कर असते , त्या वेळी चार -आठ जणांची भेट होत असतेच , तेव्हाच हे चार प्रश्न विचारुन टाकु, काम होऊन जाईल, त्यात काय.


प्रश्नावलीतली चुक सिजीकें प्रमाणेच खडप्यांच्याही लक्षात आली होती, पण खडपेंची कामाची पध्द्त सकारात्मक होती. खडपेंनी मुळ प्रश्नावलीच्या जोडीला संशोधनाच्या विषयाला सुसंगत अशी स्वतः ची एक पुरवणी प्रश्नावली तयार केली.  महाविद्यालयाच्या टंकलेखका कडुन त्याच्या सुबक प्रतीं तयार केल्या , ह्या कामीं प्राचार्यांची मदत घेतली.


आठ-पंधरा दिवसांत खडपेंच्या मुलाखतीं पुर्ण झाल्या.  डॉ. स्वामीनाथन ना ५० मुलाखतीं अपेक्षित होत्या , खडपेंनी त्यापेक्षा जास्तच मुलाखतीं घेतल्या.


डॉ. स्वामीनाथन कडुन आलेल्या तक्तयात माहीती भरुन झाली, चौकटीं भरुन झाल्या. सुचवलेल्या मुद्द्यांनुसार अहवाल ही तयार झाला.


पण खडपें नी त्याही पलिकडे जाऊन  आपला स्वतःचे असे एक टिपण त्या अहवालाला जोडले.


अहवाल विद्यापीठा कडे रवाना झाला, नंतर सारे काही सामसुम. खडपेंचे पैसे यायला काही  महिने लागले अर्थात खडपेंना त्याचे काही वाटले नाही, विद्यापीठातल्या एका संशोधन प्रकल्पास आपला थोडा का होईना हातभार लागला ह्याचे त्यांना समाधान होतो. सिजीकेंना मात्र खडपेंना चिमटें घ्यायला  हा विषय काही दिवस पुरला.


एके दिवशी अचानक विद्यापीठातुन डॉ. स्वामीनाथन नी खडपेंना बोलवुन घेतले , अर्थातच खडपेंनी मागे केलेल्या कामा संदर्भातच हे बोलावणे होते.


डॉ. स्वामीनाथन नी असेच पाहणी अहवाल विद्यापीठाच्या कक्षेतल्या सुमारे २५ महाविद्यालयां कडुन मागवले होते, त्यापैकी निम्म्याहुन कमी महाविद्यालयांनी ते पाठवायची तसदी घेतली होती. आणि जे काही  अहवाल आले होते ते , अर्धवट, चुकां-खाडाखोडींनी भरलेले होते. काहींनी तर प्रत्यक्ष मुलाखतीं न घेताच 'घाऊक' पद्धतीने माहीती भरली होती.


ह्या सर्वात फक्त खडपेंचा अहवाल ऊठुन दिसत होता. खडपेंनी सांगीतल्या पेक्षा जास्त काम तर केले होतेच शिवाय ते कमालीचे सुबक, निटनेटके,  आखीव रेखीव असे होते. पण ह्या सर्वां वर कडी म्हणजे खडपेंनी  जोडलेली पुरवणी प्रश्नावली व  स्वतःचे असे टिपण.


असे नेमुन दिलेले काम वेळेत आणि मन लावुन काम करणारी माणसें आपल्या समाजात ईतकी दुर्मीळ आहेत की असे एखादे 'खडपे' आपोआपाच लक्ष वेधुन घेतात , नजरेत भरतात, ईथेही असेच झाले , डॉ. स्वामीनाथन ना खडपेंचे काम बेहद पसंत पडले होते. त्यांनी खडपेंना त्या संशोधन प्रकल्पासाठी आणखी मद्त मागीतली.  खडपेंची ना नव्हतीच.


आता खडपेंच्या विद्यापीठाच्या चकरां सुरू झाल्या.  सिजीके हे सारे बघत होते , त्यांची प्रतिक्रिया अर्थातच नेहमीचीच..


"हा , खडप्या बघा , एक अहवाल काय पाठवला  त्याचे किती म्हणुन भांडवल करतोय ते! आता हा त्या विद्यापीठात जाऊन काय दिवे पाजळणार? संशोधनात मदत करणार म्हणे . अहो मदत कसली , हा तिथे जातोय ते फक्त लाळ घोटायला, मस्का मारायला. अरे ह्यांना कोणी तरी सांगा रे संशोधन कशाशी खातात ते.  अशी डझनावारी संशोधने करु शकतो मी , ते सुद्धा एकट्याने , एकहाती , पण छे ..मला संधीच मिळत नाही , कुठल्या कुठे पोचलो असतो एव्हाना  "


 


(पुढील भागात वाचा..)