रायगड - १

'बाबा, माझे काही मित्र उद्या पिकनिकला जाणार आहेत. मी जाऊ?'
माझ्याकडून विरोध होणार नाही ह्याची १०० टक्के खात्री असली की माझा मुलगा माझी परवानगी विचारतो. मलाही खूप बरं वाटतं. परवानगी नाकारायची नाही हे तर ठरलेलंच असतं पण उगीचच....
मी पेपरातून डोके वर न काढता विचारतो,'कुठे उनाडक्या करायला जाणार आहात?' अशा वातावरण निर्मितीत एक मस्तपैकी 'बापपणा' येतो.
'अं....भीमाशंकरला.' चिरंजीव. सुप्रीम कोर्टाची, 'खालच्या' कोर्टाच्या निकालाकडे (जळजळीत) नजर असतेच.
'हं... कोण कोण जातंय?' मी पेपरातून मान किंचित वर करून पुन्हा पेपरात लक्ष घालतो. मला अभिनयाची जाण आहे हे सत्य पुन्हा एकदा स्वतःलाच पटवून देतो.
'आश्विन आहे, वरूण आहे, सिद्धार्थ आहे' माझा मुलगा ऍप्रूव्ह्ड मित्रांची एक यादी साळसूदपणे पुढे करतो.
'हं.. ठीक आहे.' सुप्रीम कोर्टाची नजर निवळते.
'किती वाजेपर्यंत येणार परत?'
'संध्याकाळी ६ पर्यंत.'
बाइक सांभाळून चालवा. शर्यती लावू नका. घरी पोहोचायला २ तास उशीर झालातरी चालेल, पण सुखरूप परत या.' इत्यादी, 'न पाळण्याच्या', सूचना मी देतो. परीक्षेचा पेपर हाती पडल्यावर आधी ऑप्शनला टाकायच्या प्रश्नांची यादी मनात तयार करावी तसे भाव चिरंजीवांच्या चेहऱ्यावर स्पष्ट वाचता येत होते. तरी पण 'हो.... हो' अशी अगदी गरीब चेहऱ्याने त्याने ग्वाही दिली. त्याच्या खोलीत जाता-जाता त्याने हातची मूठ गच्च वळवून 'य्येस्स्स्स्स्स्स' केलेले माझ्या दूरच्या +२.७५ नंबराने मला स्वच्छ दाखवून दिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता मुलगा भीमाशंकरसाठी घराबाहेर पडल्यावर मीही तस्सेच 'य्येस्स्स्स्स्स्स' केले आणि सौ. ला म्हणालो,
'अग ए...'
'पुन्हा पुन्हा चहा मिळणार नाही, माझी पुजा होऊ दे आधी.' ही स्वयंपाकघरातून.
'अरे! चहा कोण मागतोय?'
'मग काय आहे?' ही. पदराला हात पुसंत.
'चल आपणही जाऊ कुठेतरी पिकनिकला.
'पिकनिक ला?' सौने असे आश्चर्याने विचारले की जसे आम्ही ह्या पूर्वी कधी पिकनिकला गेलोच नाही.
'का? नाही जायचंय का?'
'नाही तसं नाही, पण कुठे जाणार?' मनातून आनंदाच्या कितीही उकळ्या फुटत असल्या तरी सौ. चेहऱ्यावरचा आय ऍम नॉट इंटरेस्टेड हा भाव बदलत नाही.
'हे बघ, तासाभरात बाहेर पडू, लाँग ड्राइव्हला जाऊ, बाहेरच जेवू, आणि येऊ परऽऽत.' मी हुकमी एक्काच बाहेर काढतो. स्वयंपाकाला सुट्टी मिळणार असेल तर, ३-४ तासांची एखाद्या कळकट रेशनिंग ऑफिसची सफरही हिला रोमँटिक वाटेल, हे आता अनुभवातून मला ठाऊक होतं.
'अहो हो... पण कुठे जायचं?' हे बाकी उगीचच.
'रायगडला जाऊ.'
'चालेल.' सौ. उल्हासित.
एकतर स्वयंपाकाला सुट्टी आणि जायचं तेही माहेरच्या 'कोंकणांत', .......नवऱ्याचे, पूर्वीचे १०० अपराध माऽऽऽफ. काय असतं...देशावरच्या माणसाला त्याच्या फक्त गावाचा किंवा फार फार तर तालुक्याचा अभिमान असतो. पण कोंकणांतल्या माणसाला मुंबैपासून थेट गोव्या पर्यंतच्या अख्ख्या कोंकणाचा अभिमान असतो. कोंकणांतल्या, आयुष्यात कधीही न पाहिलेल्या गावा बद्दलही, फक्त 'ते गाव कोंकणांत आहे' ह्या एका निकषावर उर प्रेमाने भरून येतो. अन्य प्रसंगी तयारीला कमीतकमी २ तास लागले असते तिथे 'कोंकणांत जायचे' म्हटल्यावर अगदी अर्ध्या तासात तयारी करून ही म्हणाली,'चला.'
सकाळी ८॥ वाजता घर सोडलं. रायगडला जायचा राजमार्ग सोडून, महाराष्ट्राच्या शासकीय नकाशातून पुणे-वारजा-खडकवासला-वेल्हे-रायगड असा मार्ग मी शोधून काढला. पावसाळ्याचे दिवस. पुण्यापासूनच तुरळक-तुरळक पावसाला सुरुवात झाली होती. आजूबाजूला पाहत, रिक्षावाले, स्कूटरवाले, सायकलवाले ह्यांना 'आयुष्यात' पुढे जायची संधी देत देत आम्ही खडकवासल्याला जाऊन पोहोचलो. बरोबर स्वतःचा नकाशा (आणि तो वाचायला भिंग) असूनही कोणालातरी विचारावे ह्या विचाराने नाक्यावर थांबलो. एका सभ्य दिसणाऱ्या सायकलस्वारास वेल्ह्याचा रस्ता विचारला. आमचे निष्पाप चेहरे पाहून त्याने विचारलं,
'तुम्हाला नक्की कुठे जायचंय?'
'रायगडला' असं मी म्हटल्यावर, 'रायगऽऽऽड' असं त्याने इतक्या जोरात विचारलं की, दोन 'मूर्ख शहरी' चुकीच्या वाटेवर आले आहेत, ह्याचं 'ज्ञान' नाक्यावरच्या चांभारापासून ते चहाच्या टपरीवर १ चहा आणि १ विडी तिघांत पिणाऱ्यापर्यंत सर्वांना झालं. मूर्ख माणूस जवळून कसा दिसतो हे पाहायला २-३ रिकामटेकडे गाडी भोवती जमा झाले.
'साहेब, चुकलात तुम्ही. वेल्ह्यातून रायगडला रस्ता जात नाही. परत मागे जा. कात्रजहून जा.' असा मौलिक सल्ला त्याने दिला.
'तरी मला वाटलंच, आपण रस्ता चुकलोय म्हणून. सीमा पुण्याहून कोंकणांत जाते तो रस्ता वेगळाच आहे.' नवरा चुकला ह्या सारखा परमानंद नाही. त्यामुळे तो सायकलवाला आणि इतर (एव्हाना जमलेल्या) ७-८ अपरिचित खेडुतांसमोर सौ. ने संधी साधली. माझ्या जवळ असणाऱ्या शासकीय नकाशावर माझा नितांत विश्वास होता. नकाशात वेल्ह्याहून रायगडला रस्ता असल्याचे मी सांगताच तो सायकलस्वार म्हणाला,
'अहो... मी गेली ११ वर्ष वेल्ह्यात शाळामास्तर आहे. मला माहिती आहे की वेल्ह्यातून रस्ता नाहीए.'
'ठीक आहे. तुम्ही वेल्ह्याचा रस्ता सांगा. पुढचं मी तिथे पोहोचल्यावर ठरवीन.' मी 'उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही, काय वसा असेल तो सांगा' ह्या चालीवर त्यांना विनंती केली.
'असं करा... ह्या रस्त्याने जा. पुढे पाबे घाट लागेल. पण हा घाट जगातला सर्वात डेंजरस घाट आहे. सांभाळून जा.'
त्यांना 'धन्यवाद' देऊन आम्ही पुढे निघालो.
'अहो नको. तो म्हणतोय 'जगातला सर्वात डेंजरस घाट आहे', तर कशाला उगीच रिस्क घ्यायची?' सौ. लटलटत म्हणाली.
'अगं, पुण्यातली माणसं जेंव्हा 'जगाचा' हवाला देतात तेंव्हा त्याचा संबंध त्या तालुक्यापुरता मर्यादित असतो. घाबरू नकोस.'
'हो... तुम्हाला सर्व माहिती. बाकीचे सर्व मूर्ख. .....आणि तसंही माझं मेलीचं कधी ऐकलंय म्हणा तुम्ही?'
ह्या अत्यंत ज्वालाग्राही 'डायलॉग' वर मी गप्प बसलो. परिस्थिती आटोक्यात असली तरी वातावरणात तणाव होता.
रस्त्याने जाताना काही तुरळक माणसं लिफ्ट मागत होती. पण मी त्यांना टाळत आलो होतो. परंतु आता गाडीत तिसऱ्या माणसाची गरज निर्माण झाली होती. एका म्हातारीने हात दाखवताच मी हिला विचारलं, 'द्यायची का लिफ्ट?' मला माहीत होतं, एका गरीब म्हातारीला लिफ्ट देणं हिला नक्कीच आवडेल. एक म्हणजे गरीबाला मदत केल्याचे समाधान आणि बाई असली तरी...... 'म्हातारी'.... म्हणजे मला अगदीच 'मातेसमान'. त्यामुळे आम्ही त्या गरीब म्हातारीला गाडीत घेतलं. आजीबाईंचा स्वभाव बराच बोलका (की बडबडा?) होता.
'अयाऽऽऽग! रामा - रामा' करत म्हातारी बसली. 'देव तुमचं भलं करील.' वगैरे आशीर्वाद तिने दिला. गाडीतलं वातावरण निवळलं. त्या वाटेवर सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा दोनच एस टी बसेस धावत होत्या. त्यामुळे एस टी चुकल्यावर १२-१५ कि.मी. घाट चढून जायला लागायचं. आजीबाईंनी माहिती पुरवली. आजूबाजूला सागाचं जंगल, तुरळक भातशेती दिसत होती. खांद्यावर बोजे घेऊन चालत जाणारी माणसेही बरीच दिसत होती.
'आता तरी टायम बरा हाये. पूर्वीच्या काळी एस टी पण नव्हती आणि रस्ताही कच्चा व्हता. निस्ते दगड-धोंडे. गावात गीरण नव्हती. २०-२० किलु दाणं डोक्यावरून दळायला न्यायला लागायचं. आता बरं हाए, तसा काई तरास न्हाई.' आजी बाईची टकळी चालू होती. त्यांच्या गावात त्यांना सोडल्यावर त्यांनी तोंडभरून आशीर्वाद दिला. नशीब 'अष्टपुत्रा....' वगैरे नाही म्हणाल्या. नाही हो... भीती वाटते ह्या म्हाताऱ्यांची. तोंडात दात नसले तरी 'बत्तीशी' खरी ठरते.
पाबे घाट माझ्या अपेक्षेप्रमाणे सामान्यच होता. एका बाजूस खोल दरी आणि अरुंद वाट ह्याहून वेगळं त्या घाटात काही नव्हतं. आता पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. त्यामुळे गाडीच्या वेगावर आपोआप बंधन आले होते. आमच्या पुढे एक गाडी जात होती. त्यात ४-५ मध्यमवयीन पुरुष प्रवासी होते. ती गाडीही हळूहळू जात होती. आम्हाला ही तशी काही घाई नव्हती, शिवाय बरी सोबत आहे म्हणून आम्ही त्यांना ओव्हरटेक न करता सावकाश त्यांच्या मागे मागे घाट चढत राहिलो. मध्येच एकदम वेग वाढवून ती गाडी दिसेनाशी झाली. मला कळेना, काय झालं एकदम? म्हटलं जाई ना का! आपल्याला काय घाई आहे? काही अंतर गेल्यावर, 'ती' गाडी रस्त्याच्या बाजूला उभी दिसली. आतील प्रवासी 'शंका निरसनार्थ' एका रांगेत उभे होते. अच्छा! ही त्यांची अडचण होती तर. त्यांची इच्छा होती आम्ही ओव्हरटेक करून पुढे जावं. पण आम्ही, सोबत आहे म्हणून, त्यांच्या मागे मागे जात राहिलो. असो.
घाट संपल्यावर एक गाव लागला. एका टी जंक्षनला आम्ही थांबलो. कोणाला तरी मार्ग एकदा विचारावा असा विचार करीत होतो एवढ्यात 'ती' मघाचीच गाडी तिथे पोहोचली. त्यांनाच विनंती करून थांबविले आणि वेल्ह्याचा आणि रायगडचा रस्ता विचारला. त्यावर त्यांनीही वेल्ह्यातून रायगडला रस्ता जात नाही असे ठासून सांगितले. त्यांनी विरुद्ध दिशेची वाट दाखवली.
'ह्या रस्त्याने भोरला जा आणि तिथून महाडला जा. तिथून रायगडचा रस्ता विचारा' असा सल्ला दिला.
आता नाईलाज होता. हा रस्ता बराच लांबचा होता. त्या रस्त्याने आम्ही नॅशनल हाय वे क्र. ४ वर आलो. अर्थात पुणे - सातारा महामार्ग. एका टपरीवर चहा-बिस्किटांचा नाश्ता केला. आता पाऊस अगदी जोरजोरात कोसळत होता. अर्थात, टपरीवरच्या वाफाळत्या चहाची लज्जत लुटण्यासाठी तो पाऊस म्हणजे एक वरदानच होते. पुणे-सातारा महामार्गावरच पुढे 'भोर फाटा' लागला. भोरहून पुढे भोर-आपटी-महाड असा रस्ता आहे. धुवांधार पाऊस उभा-आडवा झोडपत होता. रायगड सहल बहरत होती. त्या बहराची धुंदी अणुरेणूत दरवळत होती. महाडला पोहोचलो तो पर्यंत २ वाजत आले होते. महाडच्या पुढे पुन्हा घाट सुरू झाला. समोरच्या काचेला नाक लावून घाटमाथ्याला पोहोचलो. आता हुश्शऽऽ करत होतो तेवढ्यात रस्त्याच्या कडेला, उजवीकडे बाण दाखविणारा, एक फलक दिसलाः



शिवथर घळ ६ कि.मी.




क्रमशः