रायगड - २

त्या बहराची धुंदी अणुरेणूत दरवळत होती. महाडला पोहोचलो तो पर्यंत २ वाजत आले होते. महाडच्या पुढे पुन्हा घाट सुरू झाला. समोरच्या काचेला नाक लावून घाटमाथ्याला पोहोचलो. आता हुश्शऽऽ करत होतो तेवढ्यात रस्त्याच्या कडेला, उजवीकडे बाण दाखविणारा, एक फलक दिसलाः



शिवथर घळ ६ कि.मी.


शिवथर घळ म्हणजे समर्थ रामदासांचा निवास आणि दासबोधाचे जन्मस्थान. रायगडाला येऊन समर्थांच्या निवासस्थानास भेट द्यायची नाही, ह्याहून घोर पातक नाही. जवळ जवळ ५ कि.मी. वळणावळणाच्या अरुंद रस्त्याने खाली उतरत होतो पण 'वाट संपता संपेना'. दर १०० मीटरवर 'पुढे धोक्याचे वळण आहे. वाहने सावकाश हाका' हे वाचत त्या घनघोर, निबिड अरण्यातून मुसळधार पावसाच्या साथीने आम्ही एकटेच मार्ग क्रमीत होतो. Visibility अगदीच १०-१५ फूट होती. डोक्यात विचार आला, समर्थांनी रिक्वेष्ट केली असती तर महाराजांनी त्यांना रायगडावरच, अष्टप्रधानांच्या आळीतच, एक सुंदरसा फ्लॅट नसता का दिला? नक्कीच दिला असता. पण पुलंनी म्हटल्या प्रमाणे समर्थांनी सरकारी अनुदानावर कधीच डोळा ठेवला नाही. शिवाय, महाराजांनीही राजधर्म आणि गुरूप्रेम ह्यात मुद्दाम एका picnicचे अंतर ठेवले असणार. म्हणजे रुसल्या सोयराबाई की चला समर्थांच्या दर्शनाला. गुरूदर्शानापरी गुरूदर्शनही होतं आणि picnicपरी picnicही झाली. अहो, शेवटी तो एक 'जाणता' राजा होता. शिवाय, शिवथर घळ अशी हार्ट ऑफ घनदाट अरण्यात आहे की महाराजांचे शत्रूच काय पण बालपणीच्या जानी दोस्तांनाही कळू नये की राजे आहेत तरी कुठे?  असो.
घाट रस्ता (कसेबसे) उतरून आम्ही सपाटीवरील एका T जंक्षनला आलो. तिथे एका शेतकऱ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले असता लगेच त्याने एक वाट दाखविली. स्थानिक अशिक्षित खेडुतांना ही टूरिस्टांची अडचण एक शब्द न बोलता दैनंदिन अनुभवातून जाणवत होती, समजत होती. ते त्यांच्यापरीने  सोशिकतेने, अगत्याने प्रत्येक टूरिस्टाला मार्गदर्शन करीत होते पण मायबाप सरकारला महाराष्ट्राच्या दैवताच्या ऐतिहासिक वारशांचे जतन करताना साध्या पाट्या लावणेही जीवावर येत होते ह्याचा अनुभव बऱ्याच ठिकाणी आला. 
तिथून किलोमीटरभर अंतरावर शिवथर घळ हे नयनरम्य ठिकाण आहे. जमीनीपासून २ मजले उंचीवर एका मोठ्या धबधब्याच्या बाजूला कातळात, एक निसर्गनिर्मित खोबण आहे. ५-५॥ फूट उंच,२०-२२ फूट रुंद आणि १५ फूट खोल अशी ही जागा अतिशय रम्य आहे.



गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनी चालली बळे,
धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे,
गर्जतो मेघ सिंधू ध्वनीकल्लोळ उठीला,
कड्यासी आदळे धारा, वारा आवर्त जाहला


असे त्या जागेचे वर्णन समर्थांनी करून ठेवले आहे.
इतकं हवेशीर आणि २४ तास पाणी असलेलं हे निवासस्थान आज जरी कितीही रम्य वाटत असलं तरी 'त्या' काळी, आज आपल्या गल्लीत कुत्री-मांजरी फिरतात तसे, वाघ, सिंव्ह, चित्ते इत्यादी अवलियांचा मुक्त वावर हा असणारच. समर्थांना आणि त्यांच्या शिष्यांना हे 'सहजीवन' कसे काय भावले आणि विशेष म्हणजे जमले असेल हे जाणण्यास मी तरी असमर्थ आहे. घळीत समर्थांचा त्यांच्या शिष्याला दासबोधाचे dictation देतानाचा एक देखावा पुतळ्यांच्या रूपात आहे. तो काही मला आवडला नाही. ते दोन्ही पुतळे आणि तेथील इलेक्ट्रिकचे बल्ब त्या शिवकालीन घळीच्या माहात्म्यास उणेपणा आणतात असे मला वाटले.
इथे शिवप्रेमींच्या राहण्या-जेवण्याचीही सोय आहे. उंचावरून अविरत कोसळणारा, जवळजवळ ५ मीटर रूंदीचा खळाळता धबधबा, आजूबाजूचा निःशब्द निसर्ग, समर्थ रामदासांचे मराठ्यांच्या इतिहासातील अढळ पवित्रस्थान ह्या सर्व गोष्टींमुळे 'शिवथर घळ' पाहावीच पाहावी (विशेषतः पावसाळ्यात) असे एक ठिकाण आहे.


'शिवथर घळीतून' रायगडाकडे निघालो तो पर्यंत मला वाटतं २-२॥ वाजून गेले होते. पोटातले कावळे कोकलून कोकलून निपचीत पडले होते. अंगात मावळे संचारले होते. कावळ्यांची काय मात्तबरी? 'चला गडावर' असे म्हणत निघालो. रायगडातील अजून 'रा'ही दिसत नव्हता. तसेही पावसाळी हवामान, डोंगर माथ्यावरून खाली उतरलेले ढग आणि गड कुठल्या दिशेला आहे ह्या बद्दलचे आमचे अज्ञान हे त्यामागील प्रमुख कारण होते. मोठ्या रस्त्यावर उजवीकडे वळल्यावर आणि टर्बोजेटने 'मायलेऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽज इतकं अंतर पार केल्यावर 'रायगड रोप-वे कडे' असा दिशादर्शक, सुखासिन फलक दृष्टीस पडला. 'हरहर महादेऽऽव' अशी आरोळी ठोकून गाडी तिकडे वळवली. माझ्या अंगात मावळा संचारला होता. सौ. मावळी घाबरून माझ्याकडे पाहत होती. प्रत्यक्ष गडावर पोहोचल्यावर काय होईल ह्या माणसाचं अशी तिची नजर होती.
पुन्हा चढण आणि वेडी वाकडी वळणे. पण आता प्रत्यक्ष रायरीचा डोंगर आम्ही चढत होतो. 'पाचाड' गावाला पोहोचलो आणि 'जिजामाता समाधी' असा फलक दृष्टीस पडला. ज्या महाराजांनी महाराष्ट्र घडविला, त्या थोर महापुरुषास घडविणाऱ्या त्यांच्या मातोश्री जिजाबाई ह्यांच्या समाधीस भेट देण्यासाठी गाडी तिथे वळविली. प्रत्यक्ष समाधी ज्या उद्यानात आहे त्या बाहेरचा सरकारी फलक इतका गंजलेला आहे की त्यावर काय लिहिलंय हे वाचताही येत नाही. महाराष्ट्र सरकारची ही अक्षम्य उदासीनता पाहून मन निराश होतं. स्वतःच्या बंगल्या बाहेर सरकारी खर्चात स्वतःच्या नावाचे फलक लावणारे मंत्री, गल्लीतल्या फुटकळ शाखाप्रमुखांच्या वाढदिवसांचे भव्यदिव्य बोर्ड लावणारे त्यांचे स्वार्थी अनुयायी, 'शिवाजी महाराज' ह्या नांवाचे भांडवल करणारे राजकीय पक्ष, ऐतिहासिक कादंबऱ्या लिहून सरकारी मान-मरातब मिळवणारे साहित्यिक, कथाकथनकार, मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष, नाटककार ह्या सर्वांची एका क्षणात मला कीव वाटू लागली. उद्यानातला जिजाबाईंचा पुतळाही अगदीच छोटा आहे.  
रायगड रोप-वे अर्थात रज्जू मार्ग हिरकणी गावात आहे. हिरकणी गाव ते गडावरचा मेणा दरवाजा असा जवळ जवळ १२०० फुटांचा सरळ वर ढगात अदृश्य होणारा हा रोप-वे आहे. रायगडाच्या त्या भव्य दर्शनाने छाती दडपली. गडाच्या अर्ध्या अंतरावर गडद ढग उतरले होते त्यामुळे मेणा दरवाजा दिसतच नव्हता. रोप-वेच्या बळकट तारा ढगांमध्ये अदृश्य झाल्यामुळे त्या अज्ञाताकडे नेणाऱ्या रोप-वेची भीतीच वाटली. रोप-वेच्या स्टेशनवरही प्रवासी असे आम्ही दोघेच होतो. चौकशीअंती कळले की किमान ६ ते ८ प्रवासी असतील तर किंवा वरून कोणी खाली येणार असेल तर वर जायला मिळतं. म्हणजे वाट पाहणे आले. तसा त्या कर्मचाऱ्याने तासाभराचा अंदाज दिला होता परंतु १०-१५ मिनिटांतच वरून कोणी खाली यायला निघाल्यामुळे आमचा नंबर लागला. रोप-वेच्या त्या डब्याला चारही बाजूंनी जाळी आहे. एका डब्यात ४ असे दोन डबे बरोबरच वर जातात. त्या एका डब्यात आम्ही दोघे समोरासमोर बसलो. माझ्या वजन आणि आकारमानाकडे बघून 'साहेब, तुम्ही शेंटरला बसा. साईडला नको.' असा अवमानकारक सुरक्षा सल्ला त्या कर्मचाऱ्याने दिला. महाराजांचा मुघल दरबारात झालेला अवमान स्मरून मी माझ्या रागावर संयम ठेवला. त्याच्या सल्ल्यानुसार मी 'शेंटर'ला बसलो. त्याने दरवाजा बाहेरून बंद केला. गडावरच्या स्टेशनशी त्याचं काहीतरी बिनतारी बोलणं झालं आणि डबा हलला. रोप-वे स्टेशनच्या सुरक्षित शेडमधून बाहेर पडून तो डबा जसजसा वर-वर जाऊ लागला तसतसा बाहेर रिपरिपणाऱ्या पावसालाही जोर चढला. चारही दिशेने मुसळधार पाऊस, घोंगावणारा वारा आणि बर्फासारखी थंडी ह्यांनी आमच्यावर आक्रमणच केलं. आमच्या मागे उंच ढगात गेलेला आणि खोल खाली पसरत गेलेला काळाकभिन्न कातळ होता. दोन्ही पैकी काहीच सुरक्षित वाटत नव्हतं. आमच्या मर्जी विरुद्ध आम्ही वर ओढले जात होतो. बोलती बंद झाली होती. पण तेवढ्यात, आजवरच्या अनेक विमान प्रवासात, विमानाने जमीन सोडल्यावर जो विचार मनात येतो, तोच विचार मनात आला. 'आता आपण काय करू शकतो? काही नाही. जे नशिबात असेल ते होणारच. घाबरायचं नाही enjoy करायचं.' मन जरा स्थिरावलं. पण विमानात बाहेरचा वारा, पाऊस लागत नाही. वाऱ्याचा काळजाचा थरकाप उडविणारा आवाज येत नाही. सुरक्षित वाटतं. इथे आम्ही ढगात शिरलो होतो. बाहेरचे काही दिसत नव्हते, वरची ओढ संपत नव्हती. ढगातून बाहेर पडल्यावर डोक्यावर मेणा-दरवाजा दिसला. डबा किंचित हेलकावत वर पोहोचला आणि जीवात जीव आला. इतका वेळ भितीने गप्प्प्प्प्प्प्प बसलेली माझी पत्नी म्हणाली, 'मजा आली नाही?'
संध्याकाळचे ४ वाजायला आले होते. ५ वाजता रोप-वे बंद होतो.
तिथल्या कर्मचाऱ्याला विचारलं, 'तासाभरात गड पाहून होईल?'
तो म्हणाला,'काय दिसणार आहे साहेब ह्या पावसात?'
तेही खरं होतं. गडावर सर्वत्र ढग उतरले होते. गडद धुकं, १५-२० फूटा पलीकडे काही दिसत नव्हतं. तिथे आम्हाला निलेश नावाचा एक गाईड मुलगा आणि त्याचा कुत्रा भेटले. त्याला विचारलं सगळा गड बघायला किती वेळ लागेल तसं तो म्हणाला, 'नीट बघायचा म्हटलं तर २ दिवस पुरणार नाहीत इतका मोठा आहे गड.' माझ्या हाती फक्त १ तास होता. रोप-वे बंद झाला असता. तशा गडाला पायऱ्या (१४६०) आहेत, आपल्यावर अगदीच हिरकणी सारखी वेळ येणार नाही हे माहीत होतं परंतु ह्या पाऊस पाण्यात आणि वाऱ्यात पायऱ्या उतरणंही अवघड होतं.
निलेश वयाने १७-१८ वर्षाचा होता. कठीण चढणीही लिलया चढत होता. मज पामराची दमछाक होत होती, पण घेतलं महाराजांचं नांव आणि सर केला गड. महाराजांच्या ७-८ राण्यांपैकी २ राण्या खाली पाचाडात सासूबाईंबरोबर राहायच्या. बाकीच्या राण्यांच्या महालांचे अवशेष वर गडावर आहेत. धान्याचे कोठार आहे. महाराजांचे स्नानगृह आहे. (असे गाईड म्हणाला बुवा.) गडावर उत्तम ड्रेनेज व्यवस्था आहे. अष्टप्रधानांचे वाडे, गंगासागर तलाव अंधुक अंधुक पाहता आले. त्या नंतर सदर, नगारखाना, देवडी पाहून बाहेर आल्यावर समोरच महाराजांचा सिंहासनाधिष्ठ पुतळा आहे. महाराजांचे महान कतृत्त्व आणि रायगडाच्या भव्य पार्श्वभूमीवर हा पुतळाही आकाराने लहान वाटला. पण मूर्ती बाकी एकदम रुबाबदार आणि 'छत्रपती', 'महाराज' ह्या बिरुदावलींना शोभेशी आहे. मला नवल वाटतं, महाराजांच्या दसपट ताकदवर आणि सामर्थ्यशाली औरंगजेबाचा पुतळा किंवा तैलचित्र दिल्ली किंवा आग्र्यात पाहावयाला मिळत नाही. ह्याचं कारण काय असेल?
निलेश ७वी पर्यंत शिकलेला आहे. पण मोठमोठ्या इतिहासकारांच्या भेटींमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकलेल्या कथांच्या आधारे मिळवलेली माहिती वापरून गाईडगिरी करीत असतो. त्याला सर्व माहिती मुखोद्गत आहे, कुठेही अडखळत नाही, बोलण्यात आवश्यकती तडफ आहे. मला निलेश आवडला. हिरकणी बुरूज आणि इतर अनेक स्थळे पावसामुळे शक्य नव्हती.
"तुम्ही सप्टेंबरात या, साहेब. इथेच राहा. अख्खा किल्ला दाखवतो.' असं म्हणाला. माझाही तोच विचार आहे.
किल्ला पाहताना निलेशचा कुत्रा सतत आमच्या बरोबर होता. त्याला निलेशच्या किल्ल्यावरच्या रूटची बरोबर माहिती होती. निलेशने एक स्पॉट दाखवला की कुत्रा आमच्या पुढे, पुढच्या स्पॉटकडे जाऊन आमची वाट पाहत थांबायचा. त्याला बोलता येत असतं तर स्वतंत्र गाइड झाला असता.
परतीच्या प्रवासात रोप-वेची तेवढी भीती वाटत नाही. थोडीफार सवय झालेली असते आणि वर येताना कणाकणाने असुरक्षितता वाढत असते पण परतताना कणाकणाने सुरक्षितता वाढत असते. मी विचार करत होतो, हिरकणी कशी उतरली असेल? डोंगरात कडेकपाऱ्यांमध्ये आपल्या बकऱ्यांच्या मागे जाता जाता धनगरांच्याही स्वतःच्या वेगळ्या वाटा बनतात. त्या फार अवघड असतात पण अशक्य नसतात. अशीच एखादी वाट हिरकणीची असावी. हिरकणी गडावर दूध विकायला यायची असा उल्लेख आहे म्हणजे ती ही धनगर समाजातली असावी. अर्थात ती अशाच एखाद्या अशक्य वाटेने (सरावाने) उतरली असावी. दुसऱ्या दिवशी महाराजांना ती घटना कळल्यावर हिरकणीचा गौरव करून त्यांनी धनगर समाजाला मुख्य प्रवाहास जोडले. (राजकारण, you know). आणि नंतर तो कडा तासून घेतला. (गडाची सुरक्षा, पुन्हा जाणता राजा, you see)
हिरकणी गावात देशमुखांची खानावळ आहे. तिथे ५॥ वाजता झणझणीत, तांबडा जाळ, स्वादिष्ट कोंबडी रस्स्सा आणि भाकरीचा आस्वाद घेतला. मन आणि जीभ तृप्त..तृप्त झाली. देशमुखांनाच पुण्याचा जवळचा मार्ग विचारल्यावर त्यांनी एक शॉर्टकट सुचवला,'घाट आहे, पण ४० कि.मी. वाचतील. त्या घाटाने निजामपुरात उतरा तिथे माणगाव-पुणे मार्ग मिळेल त्या मार्गाने जा.' असा त्यांचा सल्ला घेऊन मोठ्या आनंदात आम्ही निघालो तेंव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती, पाऊस पडत होताच.
पुढील प्रवासातील थरारकतेचा आम्हाला अंदाजही नव्हता.


 


क्रमशः