कधी तुझा देह चंदनाचा, कधी तुझे ओठ केशराचे!



कधी तुझा देह चंदनाचा, कधी तुझे ओठ केशराचे
लुटून जातात संधिकाली कसे कसे रंग अंबराचे?


प्रवाळ प्रत्येक सोसण्याचा जपून मी ठेवला तळाशी

असेच का हे तयार झाले उरातले बेट अत्तराचे?

म्हणून संसार वादळाचा म्हणायला नेटकाच झाला
फिरायचे ना घरासवे त्या मजेत वासेसुद्धा घराचे


निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी कोडगा हवा ना?

विलाप मी ऐकतो स्वतःचे करून काळीज पत्थराचे

मध्ये-मध्ये मोसमीच काही तरंग उठतात  पावसाने
कुपात होतात मंडुकांना कृतार्थ आभास सागराचे


तुझ्यासवे बोलतो जरी मी, तुला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या नास्तिकास आता तुझ्यात अस्तित्व ईश्वराचे


तुझ्या नि माझ्या चुकामुकींचे कशास अक्षांश मोजतो मी?

कधीतरी छेद जायचे का समांतराला समांतराचे?

चित्तरंजन