रायगड - ३ (शेवट)

देशमुखांनाच पुण्याचा जवळचा मार्ग विचारल्यावर त्यांनी एक शॉर्टकट सुचवला,'घाट आहे, पण ४० कि.मी. वाचतील. त्या घाटाने निजामपुरात उतरा तिथे माणगाव-पुणे मार्ग मिळेल त्या मार्गाने जा.' असा त्यांचा सल्ला घेऊन मोठ्या आनंदात आम्ही निघालो तेंव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती, पाऊस पडत होताच.
पुढील प्रवासातील थरारकतेचा आम्हाला अंदाजही नव्हता.


रायगड - निजामपुर मार्गावरच्या रस्त्यावर राहून राहून मला एक-दोन गोष्टींची रुखरुख वाटत होती. गडावर दादोजी कोंडदेवांचा पुतळा, काही स्मृतिचिन्ह का नाही? दादोजींना कुठे महत्त्व दिल्याचे जाणवत नाही. त्याच बरोबर संभाजी महाराजांच्या मातुःश्रीचे, सईबाईंचे, अस्तित्वही पुतळ्याच्या अथवा काही स्मृतिचिन्हाच्या स्वरूपात पाहावयास मिळत नाही. की ते अन्य कुठल्या गडावर आहे? जसे की राजगड? कल्पना नाही. त्याच प्रमाणे रायगडच्या पायथ्याशी एवढ्या जवळ 'निजामपुर' ही वस्ती कशी? निजामपुर स्वराज्यात नव्हते का? कोण जाणे.
घाटाला सुरुवात होत होती. ते ठिकाण मूळ वस्तीपासून ५ कि.मी. अंतरावर होते. रस्त्यावर चिटपाखरू नाही. एक गाडी घाटात वरून खाली येत होती. दोन गाड्यांना वाट नसल्यामुळे मी अलीकडेच थांबलो. तिथे दोन गाड्या एकमेकांना जेमतेम क्रॉस करू शकत होत्या. त्या गाडीत ३ बलदंड धटिंगण बसले होते. ते तिघेही सावकाऽऽश आम्हा दोघांना न्याहाळत गेले. कातरवेळ, निर्मनुष्य घाटातला भयाण शुकशुकाट, पाऊस आणि घनदाट जंगल. माझं मन थरथरलं. त्यांच्या मनात दुर्विचार आला तर? काय करू शकत होतो मी? कोण आहे इथे साहाय्याला? पुढे जावं की नाही? अंधार तर वाढत जाणार... मी घाबरलो. अर्थात, सौ. ला तसे जाणवू दिले नाही. गप्पा मारत त्या अरुंद रस्त्यावर, रिअर व्ह्यू मिररवर लक्ष ठेवत मी गाडी दामटली. जरा जोरातच पळवत होतो. पण त्याच बरोबर भितीपोटी काही चूक होऊन अपघात होणेही परवडणारे नव्हते. गाडीचे सर्व दरवाजे आतून लॉक केले होते. बाजूची दरी खोल-खोल जात होती. अंधार आणि पावसाने visibility पुन्हा फार कमी होती. पण रिअर व्ह्यू मिररवरून माझी नजर हटत नव्हती. जवळ जवळ अर्धा तास मी 'खंडेराव खोपड्या'सारखा पळत होतो. मनाने दहशतच खाल्ली होती. अर्ध्या तासाच्या पळापळीनंतरही, 'त्या' गाडीचे अस्तित्व दूरदूरही मागे कुठे जाणवेना, तेंव्हा जीव भांड्यात पडला. पुढच्या प्रवासापासून गाडीत एखादे हत्यार असावे, असा विचार मनात आला. कदाचित ती माणसं चांगली असतील. 'कुठे ह्या भयाण रात्री हे दोघे निघालेत' असे काळजीचे भावही त्यांच्या नजरेत असतील. त्यांची नजर वाचण्यात माझीच कदाचित चूक झाली असेल, असा विचार मनात आला. आता पावसाचा जोर भलताच वाढला होता. वायपरची ताकदही कमी पडत होती. आभाळच फाटलं होतं. गाडीचा वेग १०-१५ कि.मी. इतका कमी झाला होता. चढ संपून गाडी उताराला लागली. वाट इतकी अरुंद होती की आजूबाजूचं जंगल आपल्याला स्पर्श करायला अंगावरच येत आहे असा भयकारी भास होत होता. वळणांवळणांनी भोवळ येते. वेग अजून कमी होतो. रस्त्यात एखादं वाघरू दिसलं तऽऽऽर!
दूरवर निजामपुराचे दिवे दिसू लागले. जीवात जीव आला. निजामपुरात थांबलो नाही. रस्ता अनोळखी, रात्र पडायला सुरुवात झाली होती. घरी मुलगा एकटा असला तरी तशी भिती नव्हती. पण मोबाईलला रेंज मिळत नव्हती. तो काळजी करीत राहील. हा विचार मनात येत होता. माणगाव-पुणे रस्ता बऱ्यापैकी मोठा होता. तुरळक गाड्या ये-जा करीत होत्या. पण रस्त्याला जाग होती. सुरक्षित वाटत होतं. एक भयाण स्वप्न संपल्याची भावना मनांत निर्माण झाली. पण हा आनंद अर्थात फार काळ टिकला नाही. पुढे ताम्हाणीचा घाट लागला. बऱ्यापैकी मोठा घाट आहे. पावसाने तर उच्छाद मांडला होता. समोरची काच फोडून धबाधबा पाऊस आंत येतो की काय असं वाटायला लागलं. घाट वर-वर चढत होता. रस्त्यात आडवे येणारे ढग दृष्टिहीन बनवीत होते. भरीसभर रात्रीचा
अंधारही उतरला होता ढगांच्या साथीला. रस्त्यावरची वाहतूक आता तुरळक झाली होती. क्वचित एखादी गाडी पास व्हायची. वेग १०-१५ कि.मी. च्या आसपासच होता. मध्ये - मध्ये ढग विरून जायचे. रस्त्यातील खड्डे, कडेच्या पाट्या दिसायच्या. हुरूप यायचा. पण तेवढ्यात पावसाला सुरुवात व्हायची. मध्ये मुळशी तलावाची पाटी पाहिली. डाव्या बाजूला तर दरी होती. पुन्हा पावसाने जोर धरला. पुन्हा धुकं, ढग आडवे आले. रस्ता ८-१० फुटांपर्यंत दिसत होता. पाहता-पाहता धुकं एकदम दाट झालं. माझ्या बाजूचा रस्ता फक्त ३ फुटांपर्यंतच दिसत होता. विरुद्ध बाजूला गाडीचं बॉनेटही अख्खे दिसत नव्हते. आता गाडी चाचपडत सरपटत होती. जरा थांबत, जरा सरकत. दरीची विरुद्ध बाजू पकडून मी सरपटत होतो. जावं की थांबावं? थांबायचं म्हणजे संकटांना आमंत्रण. जंगली आणि मानवी श्वापदांची भीती. थांबलं तरी किती वेळ थांबणार? सकाळची उन्ह पडेपर्यंत धुकं विरणार नाही. हळू-हळू सरकत राहिलो. असं जवळ जवळ ५ कि.मी. गेलो असेन. visibility किंचित वाढली. छातीत कोंडलेला श्वास मोकळा झाला. २० फुटांपर्यंत रस्ता दोन्ही बाजूंनी अंधुक दिसू लागला. पण घाट असल्याने धोक्याची वळणे संपली नव्हती. माझ्या डोक्यात विचार आला, काही कारणाने गाडी बंद पडली तर? पण नशिबाने तसा दुर्धर प्रसंग ओढवला नाही.
दुसरा, फार पूर्वी अनुभवलेला, एक प्रसंग सारखा डोळ्यासमोर तरळत होता. त्याही अपेक्षेत माझं रस्त्यावर लक्ष होतं. १९८० साली मी आणि माझा एक मित्र त्याच्या स्कूटरवरून नाशिकहून मुंबईला येत होतो. नाशकात कामामुळे उशीर झाल्यामुळे उशीराच निघालो होतो. रात्री १॥ - २ वाजता कसाऱ्याच्या घाटात होतो. नाशिक पासून गप्पा मारून मारून कंटाळलो होतो. त्यामुळे चुपचाप चाललो होतो. त्या स्कूटरचा दिवा तो काय. जेमतेम रस्ता दिसत होता. त्यामुळे डोळे फाडफाडून रस्त्याकडे बघत चाललो होतो. मागे-पुढे जाणारी-येणारी एकही गाडी नव्हती. आणि........ स्कूटरच्या त्या अंधुक प्रकाशात, रस्त्याच्या उजवीकडून-डावीकडे एक २ वर्षाचे मूल मी धावत जाताना पाहिले. मी ते पाहिलं पण काही बोललो नाही. मित्रही काही बोलला नाही. मला वाटलं मलाच काहीतरी भास झाला असेल. एखादा कुत्रा, कोल्हा असेल. एवढ्या रात्री, आजूबाजूला कोणी दिसत नसताना, २ वर्षाचं मुल येणार कुठून? पुढे गेल्यावर, घाट संपल्यावर रस्त्याच्या कडेला एक धाबा लागला. तिथे आम्ही चहा प्यायला थांबलो. मित्राने चहा पीता पीता हळूच मला विचारलं,
'तू पाहिलंस?'
मी चकीत झालो. म्हणालो,
'हो पाहिलं. पण तू काय पाहिलंस?' तो म्हणाला,
'तू काय पाहिलंस सांग.' मी अडून बसलो.
'नाही. आधी तू सांग.'
तो म्हणाला,' मी एक लहान मूल धावत जाताना पाहिलं.'
'Oh! My God.... मीही मूल धावत जाताना पाहिलं.'
भास म्हणावा तर दोघांनाही एकच भास कसा होईल? भूत-खेतांवर माझा विश्वास नाही, अजूनही नाही. पण मग ते काय होतं? ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही माझ्या जवळ नाही. रायगडहून परतीच्या प्रवासात हा प्रसंग मला सतत आठवत राहिला पण हिला मुद्दाम बोललो नाही. नाहीतर तिने तिथेच भोकाड पसरले असते.
मुळशी तलाव मागे पडल्यावर हळू-हळू धुके विरळ होत गेले. पाऊस कोसळत होता पण रस्ता दिसत होता. एखादे गाव आले की रस्त्यावर दिवे असायचे. त्या आणि गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात रस्त्यावर असंख्य खेकडे आणि बेडूक दिसायचे. काही जिवंत, काही आधीच्या गाडी खाली मेलेले. जिवंत खेकडे बेडूक गाडीखाली सापडत होते. वाईट वाटत होतं पण इलाज नव्हता. काही काही खेकडे-बेडूक इतका वेळ रस्त्याच्या बाजूला असायचे आणि गाडी दिसली की तुरुतुरु धावत आणि टणाटण उड्या मारत, आत्महत्या करायला, समोर यायचे.
पौड ही अक्षरं एका मैलाच्या दगडावर दिसली आणि आपल्या जगात आपण सुखरुप परत आल्याची भावना मनात निर्माण झाली. मुलं-मुली 'वयात' येतात तसा, मोबाईल 'रेंज' मध्ये आला. लगेच जिजाबाईंचे आणि शिवाजी महाराजांचे बोलणे झाले. जिजाबाईंचा जीव शांत झाला. घरी पोहोचेपर्यंत ९॥ झाले. माझ्या घरापासून १३५ कि.मी. असणारा रायगड २५० कि.मी. चा वळसा घेऊन मी पाहून आलो होतो. लांबच्या रस्त्यामुळे आणि पावसामुळे जाताना ७ तास लागले तर येताना ३॥ तास लागले. थंडीत किंवा उन्हाळ्यात हेच अंतर पावणे दोन -दोन तासाचे होईल.


पण.....पण....खूप ... खूप ...खूप मजा आली.


 


समाप्त.