बुद्धिनिष्ठ व्यक्तिवाद - काळाची गरज

१२ जानेवारी २००५ पासून(चूक भूल द्यावी घ्यावी) "शिवधर्म" या नावाने एक नवीन धर्म उदयाला आल्याचे वाचनांत आले. धर्माच्या नावाखाली होत असलेल्या हितकारक व अहितकारक गोष्टी लक्षांत घेता सध्याच्या युगांत मानवजातीला कुठल्याही प्रचलित वा नव्या धर्माची गरज नसून बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादाची गरज आहे असे वाटते.


बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादांत प्रत्येक मनुष्याने विवेचक बुद्धि व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून त्याचा वापर करणे व त्या आधारावर कुठल्याही परिस्थितींत निवड करण्याचे व निवड बदलण्याचे स्वातंत्र्य घेणे तसेच इतरांचे हे स्वातंत्र्य मान्य करणे या गोष्टी अभिप्रेत आहेत.


कुठलाही मनुष्य जन्मापासून बुद्धिनिष्ठ असणे शक्य नाही. त्याला मार्गदर्शन करून व्यक्तिस्वातंत्र्यासाठी सक्षम बनवावे लागेल. हे काम "सज्ञान" बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादी इतरांप्रति आपले कर्तव्य म्हणून करतील व असे करतांना त्यांचे उद्दिष्ट इतरांना वैचारिक दृष्ट्या स्वतंत्र करणे असेल, आपल्या वर्चस्वाखाली ठेवणे नसेल. अशा प्रशिक्षणांतून तयार झालेला बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादी आपल्या अज्ञानकाळांत आधार देऊन मार्गदर्शन करणाऱ्या व सक्षम बनविणाऱ्या ज्येष्ठ "सज्ञान" व्यक्तींशी, आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी न देता, कृतज्ञ राहील व परतफेड म्हणून इतर "अज्ञान" व्यक्तींना निःस्वार्थीपणे मदत करून सक्षम बनवील.


बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादांत प्रत्येक मनुष्य वैचारिक दृष्ट्या स्वतंत्र असल्याने कोणत्याही प्रकारे ठराविक व्यक्तींचा कायम टिकणारा एकविचारी गट तयार होणार नाही. पण "अज्ञान"कालांत मार्गदर्शन करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व इतरांप्रति असलेली कर्तव्यभावना या गोष्टी सर्वांनाच एकत्र ठेवतील. त्यामुळे समाजहिताची कामे करण्यास त्यांचे त्या त्या कार्यासाठी तात्पुरते गट निर्माण होऊ शकतील. सर्वच बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादी झाले तर शासनाचे कार्यही या पद्धतीने करता येईल.


बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादानुसार या जगांत देव, ईश्वर, परमेश्वर, अशी कुठलीही बाह्य शक्ति अस्तित्वांत नाही पण प्रत्येक मनुष्यात अमर्याद सुप्त सामर्थ्य आहे. प्रयत्नवादाची कास धरून त्याचा अनुभव प्रत्येक मनुष्याला आपल्या आयुष्यांत घेणे शक्य आहे. ज्यांना आजपर्यंत देव, देवदूत किंवा परमेश्वरी अवतार समजले गेले आहे त्या मनुष्यांनी स्वतःच्या सुप्त सामर्थ्याचा इतरांपेक्षा ज्यास्त अनुभव घेतला होता इतकेच.


बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादी मनुष्य शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या ज्यास्तीत ज्यास्त सक्षम होण्याचा प्रयत्न करील व इतरांनाही त्याबाबतींत मदत करील. त्यामुळे तो एकटा असूनही वेळ पडल्यास अस्तित्वांत असलेल्या गटांनाही तोंड देऊ शकेल.


सध्याच्या परिस्थितींत संख्याबळाच्या जोरावरच सत्ता मिळविता येते. त्यामुळे नजीकच्या भविष्यांत बुद्धिनिष्ठ व्यक्तिवाद्यांचे सरकार येणे अशक्य दिसते. पण सत्तेवर कोणीही असले तरी बुद्धिनिष्ठ व्यक्तिवाद्यांना काही फरक पडणार नाही. शिवाय, सत्तेपुढे शहाणपण नाही ही म्हण प्रचलित असली तरी शहाणपणापुढे सत्ता नमल्याची उदाहरणेही इतिहासांत आहेत.


आपणांस ही विचारसरणी कशी वाटते?