अध्यात्म आणि अद्भुत अनुभवांचे जग.

नमस्कार,
           गेले काही दिवस मनोगतावर चमत्कार आणि त्या विरोधात आस्तिक, विज्ञाननिष्ठ, विश्लेषक, असे दोन गट वाद-विवाद करीत आहेत.


           स्वतःचे पोट भरणे आणि प्रसिद्धी इत्यादीसाठी काही लोक आणि त्यांची माणसे (लौकिकार्थाने भक्त) चमत्कार वगैरे प्रकार करीत असतात अथवा तसा आभास निर्माण करीत असतात. तसेच थोडी अध्यात्मात प्रगती झालेले पण नंतर मात्र मार्गच्युत झालेले असे लोक चमत्कार करून आपला चरितार्थ चालवू पाहतात.


           असे म्हणता अध्यात्ममार्गामध्ये वाटचाल करताना खरेच काही अद्भुत अनुभव येतात का? तसेच समोरच्याच्या मनातले ओळखणे वगैरे सारख्या शक्ती माणसामध्ये येतात का, हाच एक कुतूहलाचा विषय बनतो. परिणामतः चमत्कार आणि बुवाबाजी सदरात न मोडणारे पण खरोखरंच आजच्या वैज्ञानिक परिभाषेच्या परिघात न येणारे असे अनुभवांचे अद्भुत जग आहे का असा प्रश्न पडतो.


           आज सर्व सुशिक्षित तसेच अभ्यासू आणि विद्वान यांच्यामध्ये आदरणीय, अशा काही लोकोत्तर पुरुषांच्या चरित्रांमध्ये अशा अद्भुत घटनांचे दाखले मिळतात. आता हे दाखले काही त्या लोकांनंतर स्वतःला भक्त म्हणवणाऱ्यांकडून लिहिले गेले नसून या पुरुषांनी स्वतःच भाषणांतून, लेखनातून सांगून ठेवलेले दिसतात. आता योगी अरविंदांचे उदाहरण पाहा. ते म्हणतात की अलिपूरच्या तुरुंगात त्यांना कृष्णाचे हात त्यांच्या भोवती जाणवत. तसेच तेथेच स्वामी विवेकानंदांनी त्यांना अशारिरीवाणीने योगाचे मार्गदर्शन केले. हे त्यांचे म्हणणे सर्वश्रुतच आहे. रामकृष्ण-विवेकानंदांच्या जीवनांतही असे अनेक प्रसंग आहेत. राजयोगावरच्या भाषणांतही असे अनेक उल्लेख येतात.


            तर मला आपल्यासारख्या सूज्ञजनांकडून हे जाणून घ्यायची इच्छा आहे की, वर उल्लेखिलेल्या अद्भुत जगाच्या अस्तित्वाबद्दल आपले मत काय आहे?


            (येथे 'बुवाबाजी आणि चमत्कार' यांचे खंडन-मंडन न होईल तर बरेच.)


-- आपला लिखाळ.