काही अपरिचित म्हणी

      करतेस काय वाती अन(न पायमोडका) ऐकतेस काय माती
     (देवळात पुराण ऐकणाऱ्या बाईला दुसरी म्हणते)
      पुरुषांचे मरण शेतीं, बायकांचे मरण वेतीं (प्रसूतीचेवेळी)
      सुईण आहे तो बाळंत होऊन घ्यावे.
      आधी करी सून सून, मग करी फुणफुण.
      सासू नाही घरी , नणंद जाच करी.
      लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.
      नात्याला नाही पारा,निजायला नाही थारा.
      काका मामांनी  भरला गाव, पाणी प्यायला कोठे जाव?
      सात सुगरणी अन भाजी अळणी.
      जांवई माझा भला आणि लेक बाईलबुद्ध्या झाला.
      बाईलवेडा लेक पिसा, जांवई मिळाला तोही तसा.
      ठिकाण नाही लग्नाला आणि कोण घेते मुलाला.
      रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी---पहातात तो अर्धीच पोळी.
      विहिणीचा पापड वाकडा.
      भुरक्यावाचून जेवण नाही आणि मुरक्यावाचून बाई नाही.
      लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवऱ्या.
      अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
      लेकीची लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.
      असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
      भोळी ग बाई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी.
      अंगावर आल्या गोणी तर बळ धरलं पाहिजे दुणी.
      अकिती आणि सणाची  निचिती.
     (अकिती म्हणजे अक्षयतृतिया आणि निचिती म्हणजे शेवट‌‌.शेतकऱ्यांच्या
      सणांचा शेवट अक्षयतृतियेने होतो कारण नंतर शेतीची कामे सुरु होतात.)
      मिया आणि बिबी, तेगार भिंतीला उभी.
      (आटोपशीर संसाराला उद्देशून ही म्हण वापरतात. घरात नवरा बायको
      दोघंच. मग व्याप तो काय? जेवणखाण झाले की लगेच ताटवाटी घासून
       भिंतीला उभी. तेगार म्हणजे ताट.)
      बाईचा मात्र हट्ट, पुरुषाची मात्र जिद्द.
      अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
      आपलाच बोल, आपलाच ढोल.
      भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते.
      आड जिभेने  खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.
      (गुपचुप खाताना ठसका लागला.)
      एकपुती रडे आणि सातपुतीही रडे.
      माझा ह्यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा होऊचा कसा?
      उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
      जशी देणावळ तशी धुणावळ.


                                              वैशाली सामंत.