इशारे

पुरेत हे बोलके इशारे नकोच बोलू
उगाच जळतील लोक सारे नकोच बोलू

नजर तुझीही बघेल काही म्हणावयाला
नजरचुकीने नको कुणाला कळावयाला
कितीक निरखून पाहणारे नकोच बोलू
नजरांवरही इथे पहारे नकोच बोलू

अधर विलगता टपोर मोती कलंडताना
तुझे शब्द सूर्य होउनी तेज सांडताना
नभात ढळतील चंद्र तारे नकोच बोलू
चुगलखोर हे छचोर वारे नकोच बोलू

चराचरालासुध्दा नसावा तुझा सुगावा
असा हळूवार देह अलगद मिठीत यावा
' अता तरी बोलशील का रे ?' नकोच बोलू
स्पर्शांमधुनी बोलू सारे नकोच बोलू