मिशन माउंट फुजी - २

गाडी पार्क केलेल्या जागेपासून पाचव्या टप्प्यापर्यंत एक-दीड किलोमीटर अंतर चालत जायचं होतं. जुलैच्या मध्यावर भर दुपारी रणरणत्या उन्हात चढताना पाचच मिनिटात घामानं सगळे कपडे भिजून गेले. साडेबाराला २००० मी. उंचीवर असलेल्या पाचव्या टप्प्यावर पोचलो. तिथल्या दोन-तीन दुकानांत वरती लागणा-या वस्तू आणि चढताना उपयोगी येतील अशा काठ्या ठेवल्या होत्या. जसजसं वरती चढत जाऊ तसतसं प्रत्येक टप्प्यावर त्या काठीवर त्या त्या टप्प्याचा शिक्का मारून मिळतो. शेवटी माथ्यावर पोचल्यावर शेवटचा शिक्का मारला की परत येऊन पायथ्याशी त्या काठीचा छोटासा तुकडा करून मिळतो. मग ते शिक्के असलेली काठी छोट्याश्या काचेच्या पेटीत बंद करून ‘आम्ही फुजीसान् सर करून आलो’ असं सांगत शोकेसमध्ये ठेवायला आपण मोकळे. पण ती काठी, शिक्के आणि पेटी यांचा एकत्र खर्च पाहता ही सर्व शोकेसची कल्पना आम्हाला तितकीशी आवडली नाही. आणि तसेही सगळे तरुण असल्यामुळे काठीची आवश्यकताही नव्हती. त्यामुळं थोडासा वॉर्मअप करून चढायला सुरुवात केली.

पाचव्या टप्प्यापासून सहाव्या टप्प्यापर्यंतचा रस्ता गर्द झाडीतून जातो. तिथं उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. पण थोड्याच वेळात आभाळ दाटून आलं आणि गर्द झाडीत जिकडं तिकडं धुकं दिसू लागलं. वातावरणात एक सुखद गारवा जाणवू लागला. दररोज सकाळी पळायला जायचा निश्चय करून एकदाच कधीतरी हिवाळ्यातल्या एखाद्या पहाटे उठून धुक्यात फिरायला गेल्यावर जसं वाटतं अगदी तसंच वाटत होतं. पण टोकियोतल्या कॉंक्रिटच्या जंगलात राहायला आल्यापासून पहाटच काय, सकाळदेखील मी कधी पाहिलेली नव्हती. थोड्या वेळानं लक्षात आलं की ते धुकं नसून आपण ढगांमधून चाललो आहोत. ढग खाली उतरून आल्यामुळं वातावरण धूसर बनलं होतं. त्या गर्द झाडीत ढगांमधून जाताना मन आपोआपच ‘नभ उतरू आलं, अंग झिम्माड झालं’ गुणगुणू लागलं. पाचव्या आणि सहाव्या टप्प्यामधलं अंतर सर्वाधिक आहे. पण त्या आल्हाददायक वातावरणातून जाताना ते अंतर केव्हा संपलं कळलंच नाही. संध्याकाळ व्हायच्या आत आम्हाला आठव्या टप्प्यावरच्या लॉजमध्ये पोचायचं असल्यामुळं सहाव्या टप्प्यावर थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चढायला सुरुवात केली. आता जंगल संपून जिकडेतिकडे छोटी झुडुपं आणि गवत दिसत होतं. मघापर्यंत आमच्यामध्ये मिसळून गेलेले ढग खाली राहिले होते. सातवा आणि आठवा टप्पा नजरेच्या टप्प्यात होते आणि त्याही वर ढगांच्या आड लपलेलं शिखर खुणावत होतं. उन-सावलीचा खेळ सुरुच होता पण दुपारच्या उन्हातही उंचीमुळं हवेत गारठा जाणवू लागला होता. आम्ही बॅगेतून जॅकेट काढून अंगावर चढवली. शिंगोसान् आणि तोमितासान् नेहमीप्रमाणं जय्यत तयारीनिशी आले होते. मीदेखील संकेतस्थळांवरुन माहिती वाचून थोड्याफार तयारीनिशी आलो होतो. पण जपानी लोकांच्या अतिसावधगिरी किंवा गरजेपेक्षा जरा जास्तच तयारी करून जाण्याच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळं मीही त्यांनी संकेतस्थळावर सांगितलेल्या सगळ्याच वस्तू बरोबर घेतल्या नव्हत्या. पण अमित आणि त्याच्या बायकोने ‘जो भी होगा देखा जायेगा’ या भारतीय स्थायीस्वभावानुसार काहीच तयारी केलेली दिसत नव्हती. भर उकाड्यात कशाला हवंय जॅकेट किंवा रेनकोट म्हणत त्यांनी दोघात मिळून एकच रेनकोटवजा जॅकेट आणलं होतं. सुदैवानं ‘आशान्’नं दोन जॅकेटस् आणली असल्यामुळं त्यानं स्वतःकडील एक जॅकेट त्यांना दिलं. सातव्या टप्प्यावर पोचल्यावर गार बोच-या वा-यामुळं गारठा आणखीनच जाणवू लागला. गरम कॉफीचा आस्वाद घेत मग सातव्या टप्प्यावर आम्ही थोडी विश्रांती घेतली. वाटेवरच्या लोकांची रांग अखंड पुढं सरकत होती. खाली पाहिल्यावर हिरव्यागार पसरलेल्या शेतांचं दृश्य ढगांमधून सुंदर दिसत होतं. सूर्यास्तापूर्वी आठव्या टप्प्यापर्यंत पोचायचं असल्यामुळं तिथं फार वेळ न थांबता पुढे निघालो. अमितची बरीच दमछाक झाल्यामुळे त्याचा वेग एव्हाना बराच मंदावला होता. त्याला आमच्या वेगानं चढणं फारच कठीण जात होतं. मला आणि शिंगोसानला आठव्या टप्प्यावरुन सूर्यास्ताची छायाचित्रं काढायची असल्यामुळं आम्ही चौघं त्या जोडप्याला जमेल तशा वेगानं यायला सांगून पुढे निघालो.

गवत आणि खुरट्या झुडुपांची जागा आता लाव्हारसापासून बनलेल्या काळ्या रेतीनं घेतली होती. त्यावर चढताना पाय घसरत होते आणि पुरेसा जोर न मिळाल्यामुळे पुढे सरकताना फारच मेहनत घ्यावी लागत होती. ब-याचश्या ठिकाणी दगडांची रचना करून चढण्यासाठी आधार मिळेल अशी वाट तयार केली होती. पण तरीही रेतीमुळं चालण्याचा वेग बराच मंदावला होता. वरती चढू तसा गारठा वाढतच निघाला होता. ढग दाटून आल्यामुळे पावसाची चिन्हं होतीच. त्याच्या जोडीला सोसाट्याचा वारा पुढे सरकू देत नव्हता. पण तशा परिस्थितीतही कठीण चढण असलेल्या त्या वाटेवर पाठीवरचं ओझं पेलत नेटानं चढणा-या जपानी आजी-आजोबांच्या एका समूहाला पाहिलं आणि आमची आम्हालाच लाज वाटू लागली. ते लोक ट्रॅव्हल कंपनीतर्फे आले असावेत. इथं बरेचसे आजी-आजोबा ट्रॅव्हल कंपनीतर्फे अशा सहलीला जातात. जपानी लोक सहलीला निघालेले निघालेलं पाहिलं की मला शाळेची प्रभातफेरी आठवते. त्यांच्यातला एक म्होरक्या हातात कुठलातरी छोटासा झेंडा घेऊन नेहमी पुढे चालत असतो. लहान किंवा मोठा, कोणीही असो, एकदा एक म्होरक्या ठरवला की अगदी वयोवृध्दांपासून छोट्या मुलांपर्यंत सगळे कसे आज्ञाधारक मुलाप्रमाणे शिस्तीने त्याच्या मागून चालत असतात. त्यांना तसं सहलीला निघालेलं पाहण्यात एक वेगळीच मजा असते.

आठव्या टप्प्याजवळ आलो तसा वा-याचा वेग आणखीनच वाढला. वा-यात उभं राहणंही कठीण होत होतं आणि वा-यामुळं उडणा-या धुळीनं पुढची वाट दिसेनाशी होत होती. एव्हाना हलका पाऊस सुरू झाला होता. सूर्यास्ताच्या सुमारास कसंबसं आठव्या टप्प्यावर पोचलो. आम्ही पूर्वेकडून चढत असल्यामुळं सूर्यास्त पाहता येणं शक्य नव्हतं. पण सूर्यास्ताच्या वेळच्या आकाशातल्या विहंगम दृश्याचं आम्हाला छायाचित्र काढायचं होतं. पण ढगांमुळं आणि पावसाळी वातावरणामुळं ते शक्य झालं नाही. मात्र तिथून दिसणारं सूर्यास्तावेळचं दृश्य निव्वळ अप्रतिम होतं. एका बाजूला फुजीसानला वेढलेल्या पाच सरोवरांपैकी सर्वात मोठं यामानाका सरोवर, त्याभोवती विस्तीर्ण पसरलेला हिरवागार प्रदेश, दुस-या बाजूला आणखी एक सरोवर आणि या सर्वांवर पांघरलेली शुभ्र ढगांची क्षितिजापर्यंत पसरलेली चादर. विमानाच्या खिडकीतून अजानक डोकं बाहेर काढून बघावं तसं काहीसं ते दृश्य दिसत होतं.

अंधार पडेपर्यंत तिथं थांबून संध्याकाळचं जेवण करण्यासाठी लॉजमध्ये परतलो. अमित आणि त्याची बायको अजून पोचले नव्हते. पावसाचा आणि वा-याचा जोर वाढत चालला होता. त्यांच्याकडे पुरेसे गरम कपडे नसल्यामुळं त्यांची काळजी वाटत होती. शेवटी साडेसातच्या सुमारास कसेबसे ते पोचले. त्यांची एकंदर अवस्था पाहून ते आणखी वरती चढणार नाहीत याची खात्री होती. अपेक्षेप्रमाणे त्यांनी सकाळपर्यंत तिथेच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. लॉजमध्ये संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पण दुप्पट पैसे मोजूनही तिथल्या जेवणाची quantity पाहिल्यावर ‘एक से मेरा क्या होगा’ असं म्हणायची वेळ आली. सुदैवानं पुरेसं खाण्याचं सामान बरोबर घेतल्याचा उपयोग झाला. रात्री झोपायला जागा मिळाली होती. पण तिथंही जेवणासारखीच परिस्थिती होती. तीन टप्प्यांच्या बेडवर खूप लोकं दाटीवाटीनं झोपली होती. एक माणूस कसाबसा झोपेल एवढीच जागा प्रत्येकाला मिळाली. अगदी कुशीवर वळायचीही सोय नव्हती. तशातच आजूबाजूच्या लोकांच्या तारस्वरामुळं झोप लागण्याची शक्यता पुरती मावळली. सोसाट्याचा वारा आणि कोसळणारा पाऊस यांचा आवाज लॉजच्या छपरावर सतत ऐकू येत होता. तशा पावसात अंधारात वरती चढणं म्हणजे एक दिव्यच होतं. पाच-सहा तासांच्या कालावधीत झोप अशी मिळालीच नाही. रात्री एक वाजता लॉजच्या मॅनेजरनं वरती जाणा-या सगळ्या लोकांना उठवलं. लगबगीनं आवरून सकाळच्या नाश्त्याचं पाकीट घेतलं आणि बाहेर पडलो.

बाहेर येऊन पाहतो तर, अंधारात माथ्यापर्यंत टॉर्चच्या प्रकाशाची भली मोठी रांग दिसत होती. पाऊस कोसळतच होता, पण त्यातही लोकांचा उत्साह आणि निश्चय अजिबात ढळलेला दिसत नव्हता. प्रत्येकाच्या डोक्यावर हेल्मेट, त्यावर बसवलेला टॉर्च, हाइकिंग गियर अशी जपानी लोकांची जय्यत तयारी बघितल्यावर पुन्हा एकदा आपण काहीच तयारी न करता आलोय याची जाणीव झाली. भारतीय आणि चीनी, दोघांच्याही मानसिकतेत फारसा फरक नव्हता. दोघांनीही फारशी तयारी केलेली नव्हती. आमच्या चौघात मिळून दोनच टॉर्च होते. ते ही दोन जपानी मुलांनी आणलेले. त्यामुळं सर्वांनी एकत्र राहायचं ठरवलं. हळूहळू त्या अरुंद वाटेवरून गर्दीतून पुढे सरकू लागलो. शिखरावर पोहोचण्यासाठी अजून दोन तास चढावं लागणार होतं. आजूबाजूच्या लोकांच्या टॉर्चच्या प्रकाशात अंधुकसा रस्ता दिसत होता. त्यामुळं रांगेत उभं न राहता एका कडेनं पुढेपुढे चालत राहावं असं ठरवलं. पण अंधारात किंचित तोल जाऊन पाय घसरला तर काय होईल या भीतीनं तो विचार रद्द केला. रात्रीच्या थंडीत बोचरं वारं आणि चारी दिशांनी झोडपणारा पाऊस चढणं आणखीनंच कठीण बनवत असल्यामुळं रांग फार हळूहळू पुढे सरकत होती. पावसाचा जोर वाढतच चालला होता. चारी दिशांनी झोडपणारा पाऊस हळूहळू जॅकेटमधून आत शिरत चालला होता. पॅंट तर केव्हाच भिजली होती. तशा अवस्थेत रांगेत उभं राहणं शक्य नव्हतं. त्यामुळं अपु-या प्रकाशातही पुढे जायचा निर्णय घेतला. शेजारचे लोक थोड्या थोड्या अंतरावर थांबून चढत होते. आम्ही विश्रांती न घेता पुढे जात राहिलो. पावणेतीनच्या सुमारास दीड तासात शिखराच्या जवळ पोचलो. शिखरावर एका मोठ्या 'तोरीइ'गेटनं(पारंपारिक जपानी शिंतो मंदिरासमोराच्या प्रवेशद्वारावरील कमान) आमचं स्वागत केलं. गेटमधून पुढे गेल्यावर एक छोटंसं शिंतो मंदिर दिसलं आणि आपण शिखरावर पोचलो याची खात्री पटली. मंदिराच्या शेजारी एक-दोन छोटी उपहारगृहं होती पण ती उघडायला अजून अवकाश होता. त्याच्या आडोशाला लोकांनी जागा मिळेल तिथं आसरा घेतला होता. मी आणि आशान् इथपर्यंत येईपर्यंत पूर्ण भिजलो होतो. रेनकोट असून नसल्यातच जमा होता. वा-याचा प्रचंड वेग उभा राहू देत नव्हता. त्यातच बर्फासारखं गारठलेलं पावसाचं पाणी अंग झोडपून काढत होतं. तापमान शून्याच्या खाली पोचलं होतं. बाजूला एक-दोन झोपडीवजा विश्रांतीगृह दिसत होती. पण तीही अजून उघडली नव्हती. तिथं जाऊन कुठं आडोसा मिळतोय का पाहिलं तर तिथंही मिळेल त्या जागी लोकं कुडकुडत बसली होती. आडोसा शोधूनही काही उपयोग नव्हता कारण वारा आणि पाऊस मिळेल चारी दिशांनी झोडपून काढत होते. तिथंच एका दगडी झोपडीच्या बाजूला छोट्याश्या जागेत गर्दी करून बसलो. थंडीनं इतकं गारठून गेलो होतो की कोणाच्याच तोंडातून शब्द फुटत नव्हते. सगळं अंग थरथरत होतं. भिजलेल्या केसांवर बर्फाचे छोटे कण जमा झाले होते. आशानची अवस्था सर्वात बिकट होती कारण त्यानं आपल्याकडचं एक जॅकेट अमितला दिलं होतं. वारा आणि पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्यानं छत्री उघडायचा केविलवाणा प्रयत्न केला पण एका सेकंदातच त्याच्या छत्रीचे सारे जोड हातात देऊन वा-यानं आपला प्रभाव दाखवून दिला. तशा परिस्थितीत पाच मिनीटंदेखील तिथं थांबणं अशक्य होतं. परत खाली उतरून जावं म्हटलं तर अंधारामुळं उतरण्यासाठीही आणखी एक-दीड तास लागणार होता. सूर्योदय व्हायला अजून दीड तास अवकाश होता. भिजलेल्या अवस्थेत गोठवणा-या थंडीत आणि पावसात दीड तास असा काढायचा या विचारानं जिवाचा थरकाप उडाला. पुन्हा एकदा निसर्गासमोर माणूस किती क्षूद्र आहे याचा प्रत्यय आला. एकाच वेळी मला व्हर्टिकल लिमीट चित्रपटात K2 वर अडकलेले गिर्यारोहक आणि टायटॅनिकमधला अटलांटिकच्या गोठवणा-या पाण्यात बुडालेला ‘Jack’ डोळ्यासमोर दिसू लागले. त्या बापड्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी कोणीतरी खालून निघालं होतं आणि ‘Jack’च्या बरोबर त्याची ‘Rose’ तरी होती. आमच्याबरोबर ना ‘Rose’ होती ना कोणी खालून वरती निघणारं होतं. आशान् ला तशा परिस्थितीतही विनोद सुचत होते. “आज तुम्हाला चायनिज् कुंग फू चं सामर्थ्य दाखवूनच देतो. हा मी आता इथे असा बसलो की एक तास इथून हलणारही नाही.” असं म्हणत एका ठिकाणी तो त्याच्या कुंग फू पोझमध्ये ठाण मांडून बसला. ‘जिवंत राहिलास तर हलशील ना.’ शिंगोसान् हळूच त्याला म्हणाला. मला आणि तोमितासानला हसण्याची इच्छा असूनही हसू फुटत नव्हतं. एकेक मिनिट घड्याळाचा काटा पाहत पुढच्या मिनिटाला काहीतरी होईल या आशेवर काढत होतो. पाच, दहा करत पंधरा मिनिटं उलटून गेली. बर्फाचा खडा पाच मिनिटं तळहातावर ठेवल्यावर जी अवस्था होते तीच अवस्था सगळ्या शरीराची झाली होती. एव्हाना शरीरावर संवेदना जाणवणं बंद झालं होतं. शेवटी अर्ध्या तासानं देवानं आमची प्रार्थना ऐकली. दोन उपहारगृहांपैकी एकाचा दरवाजा उघडला आणि आत घुसण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. मी, तोमितासान आणि शिंगोसाननं भराभर बॅगा उचलल्या आणि तिकडे निघालो. आशान् मात्र अजून तसाच कुंग फू पोझमध्ये बसला होता. शिंगोसाननं त्याला हलवून उठवायचा प्रयत्न केला पण गारठून गेल्यामुळे त्याला हलताच येत नव्हतं. कसंबसं त्याला उठवून उपहारगृहात घेऊन गेलो. शेकोटीजवळ बसून गरम गरम कॉफीचा घोट घेतल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला. पंधरा-वीस मिनीटं शेकोटीजवळ बसलो. कॉफी संपल्यामुळं उठून इतर लोकांना बसायला जागा देणं भाग होतं. सूर्योदयाला अजून अर्धा तास अवकाश होता. अर्धा तास आता सहज बाहेर काढता येईल असं म्हणून बाहेर पडलो. बाहेर पडल्याबरोबर पुन्हा तोच सोसाट्याचा वारा आणि पाऊस. एका क्षणात पुन्हा ‘जैसे थे’. आता मात्र गर्दी वाढल्यामुळं उपहारगृहात सहजासहजी प्रवेश मिळणार नव्हता. जरा पुढे चालत जातो तोच पुन्हा एकदा अंगात हुडहुडी भरली. उब मिळावी म्हणून थोडा वेळ सगळ्यांनी उड्या मारून पाहिल्या. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग शेवटी पुन्हा एकदा रांगेत उभं राहून कसंबसं उपहारगृहात पोचलो आणि आत आडोशाला उभं राहिलो. एव्हाना तांबडं फुटायची वेळ झाली होती. बाहेर सूर्योदय पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. उपहारगृहाच्या काचेच्या खिडकीआडून मला थोडंफार आकाश दिसत होतं. पूर्वेच्या आकाशात हळूहळू केशरी छटा दिसू लागल्या होत्या. पण त्या वादळी हवामानात सूर्योदय दिसणं अशक्य होतं. विमानातून येताना मी एक-दोनदा सूर्योदय पाहिला होता. हा सूर्योदयही त्यापेक्षा काही वेगळा नसणार अशी मनाची समजूत काढून मी आणि आशान् तिथं एक जागा मिळवून बसलो. शिंगो-सान आणि तोमितासान बाहेर सूर्योदयाची छायाचित्रं काढता येतात का ते पाहण्यासाठी गेले. जरी सूर्योदय दिसला असता तरी बाहेर जाऊन बॅगेतून कॅमेरा काढून तो स्टॅंडवर लावण्याचा उत्साह माझ्यात नव्हता आणि स्टॅंडशिवाय थरथरत्या हातानं छायाचित्रं काढणं शक्य नव्हतं. त्यामुळं शिखरावर पोचलो हेही काही कमी नाही या समाधानात आम्ही दोघं निमूटपणे शेकोटीजवळ बसून राहिलो. आशानच्या हातावर अर्ध्या तासापूर्वी आलेला काटा अजूनही तसाच होता. तीन-चार तास गारठलेल्या शरीराला पंधरा-वीस मिनीटांची शेकोटीची उब पुरणार नव्हती. तिथून उठायला लागू नये म्हणून एकापाठोपाठ एक काहीतरी मागवत तिथंच बसून राहिलो.

साडेपाचच्या सुमारास शिंगोसान आणि तोमितासान परत आले. पावसाचा जोर आता जरा कमी झाला होता आणि बाहेर चांगलंच उजाडलं होतं. म्हणून मग बाहेर पडून शिखराच्या मध्यभागी असलेल्या क्रेटरभोवती एक चक्कर मारण्यासाठी निघालो. क्रेटरभोवती प्रदक्षिणा घालण्यास जवळजवळ एक तास लागतो. आम्ही होतो तिथून क्रेटरच्या दुस-या बाजूला जपानमधील सर्वात उंचीवर असलेलं पोस्ट ऑफिस आहे. तिथून कोणालाही भेटकार्ड पाठवता येतं. पण बोच-या थंडीत तिथपर्यंत जायची कोणाचीच इच्छा नव्हती. क्रेटरपर्यंत जाऊन तिथं आत डोकावून पाहिलं. आत खूप खोल दरी दिसत होती आणि कडांवर बरंच बर्फ साठलं होतं. हात अजूनही थरथरतच होते त्यामुळे कॅमेरा बाहेर काढून क्रेटरचा फोटो काढणं शक्य झालं नाही. तसाही त्याचा आकार कॅमे-यात मावण्यासारखा नव्हता. थोडं पुढे जाऊन खाली दिसणा-या सुंदर लॅंडस्केपची थोडी छायाचित्रं काढली. पण ढगाळ वातावरणामुळं ती म्हणावी तितकी चांगली आली नाहीत. तशा वातावरणात आणखी फिरण्याचा उत्साह कोणाच्याच अंगात नव्हता. पाच-दहा मिनीटं तिथं थांबून परतीच्या वाटेला लागलो.

उतरायच्या वाटेवर वाळूवरून आपोआपच पुढे सरकत जात असल्यामुळं उतरणं सोपं जात होतं. अर्ध्या तासाच्या आतच आठव्या टप्प्यावर पोचलो. संध्याकाळची हानाबी(आतषबाजी) गाठायची असल्यामुळं अमित आणि त्याच्या बायकोला उठवून लगबगीनं उतरायला लागलो. परतीच्या वाटेत ‘ओनसेन’ला(नैसर्गिक गरम पाण्याचं कुंड) भेट द्यायची असल्यामुळं १० च्या आत पायथ्याशी पोचणं गरजेचं होतं. पण सातव्या टप्प्यापाशी पोचलो तसं पुन्हा मुसळधार जे पावसानं गाठलं ते पायथ्याशी पोचेपर्यंत सोडलंच नाही. पावसातून वाट काढत पाचव्या टप्प्यापर्यंत पोचेपर्यंत अकरा वाजले. वाळू आणि चिखलानं सगळे कपडे माखून गेले होते. ओनसेनला जाण्याची तीव्र इच्छा होत होती पण उशीर झाल्यामुळं ओनसेनचा बेत रद्द करावा लागला. परतीच्या वाटेवर ओनसेनशिवाय घडलेली ही पहिलीच सहल असावी. पण आधी घडलेल्या चित्तथरारक अनुभवांच्या आठवणींमध्ये ओनसेन चुकल्याची हुरहुर केव्हाच नाहीशी झाली होती. त्या रोमांचक आठवणी आणि फुजीसान् ‘सर’ केल्याचा आनंद मनात साठवून परतीच्या वाटेला लागलो.

दरवेळी सहलीत तोमितासान मला काहीतरी जपानी शिकवत असतो पण सहल संपल्यावर मी नेहमी ते विसरतो. यावेळी मात्र त्यानं शिकवलेलं वाक्य विसरता येणं शक्य नव्हतं. ‘जिनसेइवा केइकेन दा’ (Life is an experience).

- विशाल कुलकर्णी

हा लेख आणि छायाचित्रं इथंही पाहता येतील.