महाकोशाची महाबोंब!

आजच्या म.टा. मधली बातमी :


महाकोशाची महाबोंब!
[ Thursday, August 03, 2006]
 ---- सारंग दर्शने


मराठी साहित्य संमेलन धनदांडगे आणि राजकारण्यांच्या उपकारांखाली ओशाळे हो‌ऊ नये, या उदात्त हेतूने पाच कोटी रुपयांचा महाकोश उभारायला काही वर्षांपूर्वी सुरूवात झाली खरी पण बोलघेवड्या आणि आरंभशूर मराठी माणसांनी या मोहिमेचा पुरता पराभव केला आहे! गेल्या सात वर्षांत या महाकोशात अवघे ३७ लाख रुपये जमा झाले आहेत. आणि एका संमेलनाचा खर्च नवसंस्थानिकांनी एक कोटीच्या घरात ने‌ऊन ठेवला आहे.


दादरच्या साहित्य संमेलनात ९९मध्ये महामंडळाच्या तेव्हाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे-ना‌ईक यांनी प्रास्ताविकात महाकोशाची कल्पना कवी अनिलांची आठवण देत मांडली. योगायोगाने त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी 'बैलबाजार' अशी संमेलनाची संभावना करून अनुदानाचे २५ लाख कशाला घेतलेत? असा सवालही केला. तेव्हा सारे वातावरण पेटले. त्यामुळे संमेलन स्वावलंबी करण्याच्या कल्पनेला वेगळे पावित्र्य आले! प्रत्यक्षात १० कोटी मराठी माणसे आजतागायत पाच कोटी जमा करू शकले नाहीत.


किमान एक कोटी रुपये जमेपर्यंत रकमेला हात लावायचा नाही, असे ठरले असल्याने ३७ लाखांचा महाकोश उरलेल्या ६३ लाखांची आणि नंतरच्या चार कोटींची वाट पाहात पडून आहे. प्रत्येक संमेलनाने या कोशात भर टाकावी, असेही ठरले होते. पण अलीकडच्या सोलापूर, नाशिक, औरंगाबाद या तीन संमेलनांनी दमडाही कोशात टाकला नाही. त्या‌आधी कराड (पाच लाख), पुणे (अडीच लाख), इंदूर (पाच लाख), बेळगाव (२५ हजार) या संमेलनांनी निदान काहीतरी जबाबदारी ओळखली.


उद्योजक, राजकारणी, बँका, अनिवासी भारतीय, साहित्यिक, प्रकाशक, प्राध्यापक, व्यावसायिक या सर्वांनी कोशाकडे एकमताने पाठ फिरवली असल्याने दहा हजारांची देणगी देणारे मोजके लेखक देणगीदारांच्या यादीत उठून दिसत आहेत. तंजावरच्या प्रा. राव या महिलेने पाच लाख कोशाला दिले. त्यांचे आता निधन झाले असले तरी त्यांच्या इच्छेनुसार संमेलनात 'कमनाबा‌ई बाळाजी राव' परिसंवाद होतो. पण त्यांच्या वाटेवर चालणारी मराठी माणसे हाताच्या बोटावर मोजण्या‌इतकीही नाहीत.


महाकोशाचा विश्वस्तनिधी असून त्याच्यावर राज्यातले नामांकित आहेत. कोशाच्या विश्वस्त वसुंधरा पेंडसे-ना‌ईक 'महाराष्ट्र टा‌इम्स'शी बोलताना म्हणाल्या की, 'पैसेवाले साहित्य संमेलने घेतात, अशी नुसती टीका करण्यात काय अर्थ आहे? संमेलन आत्मनिर्भर व्हायचे तर मराठी माणसांनी जबाबदारी ओळखायला नको का?'


*********************


पण बोलघेवड्या आणि आरंभशूर मराठी माणसांनी या मोहिमेचा पुरता पराभव केला आहे.. मला हे म्हणणे पटले आहे. तुम्हाला?


उद्योजक, राजकारणी, बँका, अनिवासी भारतीय, साहित्यिक, प्रकाशक, प्राध्यापक, व्यावसायिक या सर्वांनी कोशाकडे एकमताने पाठ फिरवली असल्याने... - विश्वस्तनिधीवर् राज्यातले नामांकित् असुन् ही वेळ् का यावी?

संमेलन आत्मनिर्भर व्हायचे तर मराठी माणसांनी जबाबदारी ओळखायला नको का?' - ?????


शेवटचा महत्वाचा मुद्दा, म.टा.वाल्यांनी विचारला आहेच्, की अशा संमेलनांची गरज आहे का?


राहुल