दुभंगलेला वाडा

अद्याप गाठ नाही, विष्णू, तुझ्या शिखेला
अद्याप नंद आहे सत्तेत मातलेला

गर्तेत तक्षशीला मिसळून पार गेली
इतके तरी कुणी का सांगाल शारदेला?

स्वारी करून जावो तैमूर वा सिकंदर
नाठाळ देश माझा कलहात दंगलेला

परजून शस्त्र शत्रू चालून येत असता
उपवास, मौन यांचा जप येथ चाललेला

तलवार म्यान केली दुबळ्या अहिंसकांनी
का क्लैब्यधर्म आम्ही हा अंगिकारलेला

इतिहास वाचण्याची फुरसद इथे कुणाला
सांधायचा कसा हा वाडा दुभंगलेला