दोन संन्यासी (झेन कथा)

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट.


दोन संन्यासी मित्र तीर्थाटन करीत फिरत असतात. दोघे अगदी विरागी आणि निर्मोही असतात.


पावसाळ्याचे दिवस असतात. ते एका गावाहून दुसऱ्या गावी जात असतात. मध्ये एक ओढा लागतो. त्याचे पाणी फारच वाढलेले असते. तेथेच त्यांना, ओढा ओलांडण्याच्या विवंचनेत बसलेली, एक युवती दिसते. ती या दोन तरुण संन्याशांच्या जवळ येते आणि ओढ्या पलीकडे तिला नेऊन सोडण्याची विनंती करते. त्यावर एक संन्याशी तिला म्हणतो," आम्ही ब्रह्मचारी आहोत. आम्ही स्त्रीस स्पर्श कसे बरे करणार." पण दुसरा संन्यासी मात्र तिला आश्वासन देतो आणि पाणी थोडे ओसरू लागताच तिला खांद्यावर बसवून पलीकडे सोडतो. ती त्याचे अनेक आभार मानते आणि निघून जाते.

या दोघांचा प्रवास सुरू होतो आणि सायंकाळी ते पुढच्या गावात पोहोचतात. धर्मशाळेत पोहोचल्यावर थोड्याच वेळात दोघे पथाऱ्या पसरून गप्पा मारत पडतात. थोड्यावेळाने पहिला संन्यासी म्हणतो," मित्रा! आज तुझे ब्रह्मचर्य मोडले."  दुसरा आश्चर्याने विचारतो, "ते कसे?" त्यावर पाहिला म्हणतो की तू त्या तरुणीला आज खांद्यावर बसवून नेलेस म्हणून. त्यावर दुसरा संन्यासी हसून म्हणतो," अरे! ओढा ओलांडताच ती माझ्या खांद्यावरून उतरली. पण इतका वेळ झाला तरी ती तुझ्या खांद्यावरून उतरलेली दिसत नाहीये !'

(ओशोंच्या पुस्तकात वाचलेली झेन कथा.)
--लिखाळ.