नको आयुष्यभर नात्यांतली घोटीव लाचारी

नको आयुष्यभर नात्यांतली घोटीव लाचारी

नको आयुष्यभर नात्यांतली घोटीव लाचारी
भले जन्मास आलो फक्त मी घेऊन नादारी


कशाला आरश्या राहू तुझा आजन्म आभारी?
तुझी सौंदर्यदृष्टी व्हायची, होणार म्हातारी


जरा खोळंबलो मी उंबऱ्यापाशी तहानेने
पहा ठेचाळला पाऊस येताना तुझ्या दारी!

कुणाचा वेगळा खोपा, कुठे गप्पा खुराड्यांच्या
(कसे हे सभ्य शेजारी, कसे सारे सदाचारी?)


लळा लाऊन गेले चांदणे... गेले? कुठे गेले?
इथे बेजार आकाशात झाला चंद्र आजारी


जरी ओलावलेल्या पापण्यांचेही हसे झाले
कवी मी कोरडा! जाईन शब्दांच्याच आहारी

-नीलहंस