भेटणे प्रेयसीला - विविध वृत्तांत!

अक्षरगणवृत्तांचा विचार करताना एक गमतीशीर गोष्ट लक्षात आली. मला वाटते, कवीच्या भावनेच्या तीव्रतेतून वृतांची उत्क्रांती होत गेली असावी!  ओळीची लांबी कौशल्याने वाढवत शालिनी पासून सुरवात करून स्रग्धरेपर्यंत जाता येते. हेच पाहा ना, प्रेयसीला भेटणे शक्य होत नाही हे कसे वाढत्या ओळीतून सांगता येते.


"भेटणे प्रेयसीला" ही सात अक्षरे (गुरु, लघु, गुरु, गुरु, लघु, गुरु, गुरु) ह्याच क्रमाने शालिनी, मालिनी, मंदाक्रांता, स्रग्धरा ह्या वृत्तांच्या अंती येतात.


शालिनीपासून सुरुवात करू.


आता नाही, भेटणे प्रेयसीला
(शालिनी - म, त, त, ग, ग).


येथे यतीमुळे 'आता नाही' आणि 'भेटणे प्रेयसीला' असे दोन तुकडे पडतात. ह्यातल्या पहिल्या तुकड्याच्या ऐवजी 'क्षणभरिहि नसे ते' असा तुकडा लिहिला तर शालिनीची मालिनी होते!


क्षणभरिहि नसे ते, भेटणे प्रेयसीला
(मालिनी - न, न, म, य, य)


शालिनीतला 'आता नाही' आणि मालिनीतला 'क्षणभरिहि नसे ते' ह्यातला फक्त 'क्षणभरिहि ते' एव्ह्ढा भाग असे दोन्ही यती वापरले तर ह्या शालिनी-मालिनी मिश्रणातून मंदाक्रांता होते!


आता नाही, क्षणभरिहि ते, भेटणे प्रेयसीला
(मंदाक्रांता - म, भ, न, त, त, ग, ग)


हेच वाढवून सांगायचे असेल तर ह्यातल्या पहिल्या यतीत 'कधीही' हे मिसळले, आणि दुसरा यती एका लघ्वक्षराने लांबवला (म्हणजे तो मालिनीच्या पहिल्या यतीसारखा बराचसा होतो!), तर मंदाक्रांतेची स्रग्धरा होते! (खरे म्हणजे पहिल्या म (आता ना) आणि भ (ही क्षण) गणांच्या मधोमध 'ही कधी' ही अक्षरे घुसवली आहेत, असेही दिसेल.) म्हणजे मंदाक्रांतेच्या सुरवातीने सुरुवात, मालिनीच्या सुरुवातीने मध्य आणि शालिनीच्या, मालिनीच्या किंवा मंदाक्रांतेच्या शेवटाने शेवट अशी स्रग्धरा होते!


आता नाही कधीही, क्षणभरिहि असे, भेटणे प्रेयसीला
(स्रग्धरा - म, र, भ, न, य, य, य)


इथे एक प्रश्न माझ्या मनात आला वरच्या स्रग्धरेतला दुसरा यती काढून टाकला तर त्याचेही एखादे वृत्त होत असणार!


आता नाही कधीही, भेटणे प्रेयसीला
(वृत्त=? म, र, त, त, ग)


मनाशी म्हणून पाहा, आणि असे काही वृत्त आधीच आहे का ते मला सांगा!


रेडिओची एरियल ओढत ओढत जश्या एकातून एक कांड्या बाहेर येत येत एरियलची लांबी वाढत जाते त्याप्रमाणे शालिनीपासून सुरुवात करून स्रग्धरेपर्यंत पोहोचलो. ह्याचप्रमाणे इंद्रवज्रा किंवा भुजंगप्रयात पासून सुरुवात करून किंचित बदल करत, शब्द वाढवीत सुमंदारमालेपर्यंत जाता येते, अर्थात ते मला तुलनेने अधिक सोपे वाटते. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.


पाहिजे तर तुम्हीही प्रयत्न करून पाहा.