पिंजरा


पिंजरयाला काय सांभाळायचे?
पाखराने बंद केले गायचे

आसवांनो स्वाभिमानी व्हा जरा
ना कुठे आमंत्रणाविण जायचे

मान्य कर नाते सुकूनी चालले
मोगरयाला दोष नाही द्यायचे

विलगणे समजूतदारांसारखे?
जाऊ दे ! नाही तुला समजायचे

ठेवुया लक्षात आपण जन्मभर
तू मला अन मी तुला विसरायचे

साद माझी ऐकती सारे तरी
मीच का माझ्या दिशेने यायचे?

एक होते श्वास तेव्हा आपले
दोन म्हणुनी आज ते मोजायचे

एकमेकांशी जमाया लागले
जीवना आता कसे रे व्हायचे?

ऐकतो मृत्यो तुझ्याबद्दल किती
एकदा आहे तुला भेटायचे