नेताजींची आठवण

१८ ऑगस्ट. नेताजींचा स्मृतिदिन. आयुष्यभर देशासाठी वणवण करत जगभर भटकलेले नेताजी जपानच्या शरणागतीने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने एका नव्या आशेच्या किरणाच्या दिशेने झेपावले. मात्र ती काळाची झेप ठरली. तैपेई च्या विमानतळावरून उड्डाण करताच काही क्षणात ते बॉम्बर कोसळले व त्या विमानाच्या बरोबर भारतीय स्वातंत्र्याचा शिल्पकारही काळाच्या दाढेत गेला.


अनेक समित्या नेमल्या गेल्या, अनेक सिद्धांत मांडले गेले,अनेक प्रवाद पसरले पण अखेरपर्यंत नेताजींचे गूढ तसेच राहिले. नेताजी गेले यावर विश्वास बसत नाही तसाच ते असतील यावरही बसत नाही. तो सच्चा देशभक्त आपला स्वतंत्र झालेला देश डोळे भरून पाहायला नक्कीच प्रकट झाला असता.


आतापर्यंत सहा वेळा सिंगापूरला जायचा योग आला, प्रत्येक वेळी एका अनिवार ओढीने मी पडांगवर गेलो. जिथे नेताजींनी सिंगापूरला पहिली सलामी घेतली, जिथे आझाद हिंद सेनेने नेताजींच्या आधिपत्याखाली पहिले संचलन केले तो टाउन हॉल व ते पडांग डोळे भरून पाहतो. मग तिथल्या हिरवळीवरील कैलासाच्या झाडामागे असलेल्या आझाद हिंद सेनेच्या स्मारकाला अभिवादन करतो. त्या जागेवर जाताच आजूबाजूच्या उंच इमारतींऐवजी टाउन हॉलच्या दगडी चौथऱ्यावर उभारलेल्या व्यासपीठावर उभे असलेले व मानवंदना स्वीकारणारे नेताजी असल्याचा भास होतो. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या ऐवजी संचलन करणाऱ्या आझाद हिंद सेनेचे शिपाई दिसू लागतात. मग नाइलाजाने तिथून मी परत फिरतो.


मागे एकदा सहकुटुंब गेलो असता स्थलदर्शन सफरीच्या संचालकाने त्या जागेवर येताच त्याची तबकडी लावली. अमुक इमारत ती तमुक बँकेची, ती पलीकडे उंच गोलाकार इमारत दिसते ती हॉटेल स्टॅम्फर्ड ची जी जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच हॉटेल इमारत आहे वगरे वगरे. अचानक त्याच्या लक्षात आले की मी त्याच्या बरोबर न जाता उलटीकडे जातो आहे. त्याने मला हटकले. मी सांगितले की तुझ्या इमारतींमध्ये मला तीळमात्र रस नाही, मला ज्याची ओढ आहे ते पाहायला मी जात आहे. तो वैतागला. म्हणाला काय दाखवायचे ते आम्हाला शिकविलेले आहे आणि आम्ही ते सर्व दाखवतोच. आता मीही पेटलो. म्हणालो, अस्स? चल दाखव आमच्या आझाद हिंदचे स्मारक. तो काहीशा तुच्छतेने म्हणाला 'ओ, ते आय एन ए मेमोरिअल! ते तर अगदी बारकेसे आहे आणि काही खास नाही' हे ऐकून मी सणकलो. माझ्या दृष्टीने ते सर्वात प्रेक्षणीय स्थळ होते. आझाद हिंदचे स्मारक कितीही लहान असू दे, मला तेच पाहायचे आहे आणि मी तेच पाहणार. तुला व इतरांना स्वारस्य नसेल तर तुम्ही तुमच्या कार्यक्रमानुसार जा, आम्ही आमचे येऊ. एका  वयस्कर पण उत्साही गोऱ्या जोडप्याने त्याला सांगितले की जर या गृहस्थाच्या देशाचे काही स्मारक असेल तर ते त्याला बघू दिले पाहिजे. एव्हाना आमच्याच हॉटेल वर उतरलेला सरदार व त्याची पत्नी जे आमच्याच सफरीत होते ते आले व काय झाले ते विचारू लागले. बहुधा आतापर्यंत आय एन ए असा उल्लेख होत असल्याने त्याच्या लक्षात आले नव्हते. मात्र आझाद हिंद सेना म्हणताच तो उत्साहाने पुढे सरसावला. त्याचे आजोबा आझाद हिंद सेनेतून लढलेले होते! मग आमच्या संचालक महाशयांनी नमते घेतले. मी सर्वांचे आभार मानले व उपस्थितांना नेताजींविषयी चार शब्द सांगायची संधी साधली.


आज नेताजींच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली!