हिंदुस्तानी संगीत ६ - राग म्हणजे काय?

या आधीच्या लेखात थाट या कल्पनेची ओळख झाली. आता या लेखात आपण रागांकडे वळूया.


भूमिकाः
या ठिकाणी सर्वात आधी हे स्पष्ट केले पाहिजे की आपण संगीताचा रसास्वाद घेण्याच्या म्हणजे मुख्यतः ऐकण्याच्या भूमिकेतून या विषयाकडे पहात आहोत. हे मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे एखादा राग गाण्यासाठी येथे दिलेली माहिती पुरणे कठीण आहे. जसे, एखादे लिखाण वाचणे व समजणे याला जेवढी बुद्धी लागते किंवा पुरते त्यापेक्षा कितीतरी जास्त अक्कल किंवा प्रतिभा ते लिखाण करण्यासाठी लागत असते, तसेच हे आहे.
तसेही राग या गोष्टीचे (विशेषतः एखाद्या विशिष्ट रागाचे) सगळे पैलू शब्दात व्यक्त करणे अतिशय अवघड आहे असे मला वाटते आणि तसा प्रयत्न मी तरी करू पहाणार नाही. तेवढी कुवत फक्त पं. भातखंड्यांची असली तर असेल!
आणि तात्या नेहमी म्हणतात त्याप्रमाणे या बाबतीत गुरुमुखातून मिळालेल्या विद्येचे स्थान अतुलनीय आहे. संगीतविद्या फक्त गुरुमुखातूनच मिळते किंवा नाही या वादात न शिरता एवढे तरी नक्की म्हणता येईल की अशी विद्या मिळवण्याचा गुरु हा निश्चित सर्वात सोपा व खात्रीचा मार्ग, जणू राजमार्ग, आहे. बाकीचे त्या गुरू-शिष्यांच्या व्यक्तिगत योग्यतेवर अवलंबून.
        गुरु-गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय
        बलिहारी गुरु आपने, जिन गोविंद दियो बताय
(गुरु व परमेश्वर दोघे समोर उभे, कोणाच्या पाया पडावे, अशा परिस्थितीत, गुरुजी, मी आपल्याच पाया पडेन, कारण परमेश्वर साधनेचा-प्राप्तीचा मार्ग आपणच मला दाखविलात) असे कबीराने उगीच नाही म्हटले. 
तेव्हा ज्या गोष्टीला जितकी कमी अक्कल पुरते, तीच गोष्ट तितक्याच बेताने लिहिण्याचा विचार येथे केलेला आहे. राग गाण्यापेक्षा तो ओळखणे सोपे. गाताना घसरून पडण्यासारख्या अगणित निसरड्या जागा असतात, ऐकताना त्यापेक्षा कमी. याहून अधिक ज्ञान हवे असल्यास अन्य मोठमोठे तज्ज्ञ व गुरू (हे विसरून चालायचे नाही आजकाल) उपलब्ध आहेतच.


राग कशाकशाने बनतोः
येथे मी यमन रागाचे उदाहरण घेणार आहे. यमन राग हा आम्हा बहुतेक संगीतप्रेमींना आपल्या स्वतःच्या घरासारखा वाटतो, काहीतरी म्हणा म्हटल्यावर आमच्या डोक्यात प्रथम यमनच स्फुरणार, सुचणार. आपल्या घरात आपण कसेही कुठेही केव्हाही वावरतो खेळतो तसे.
यमन रागालाच काही लोक कल्याण सुद्धा म्हणतात, पण यमनकल्याण म्हणतात तो यमन/कल्याण याहून वेगळा.
१. थाटः
थाटावरून रागाच्या जातीचा थोडाफार अंदाज येतो.
यमन राग कल्याण थाटात मोडतो. 
२. स्वरः
प्रत्येक रागात काही विशिष्ट स्वर असतात. काही राग तर नुसते स्वर पाहूनही ओळखता येण्याची शक्यता असते.
यमनात एक तीव्र सोडल्यास सगळे शुद्ध स्वर आहेत - सा रे ग प ध नी
(यमन रागात विशिष्ट पद्धतीने शुद्ध मध्यम ही लावला की त्याचा यमनकल्याण होतो.)
३. आरोह-अवरोहावरून जाति किंवा जातः
आरोह व अवरोह म्हणजे काय ते नंतर पाहू. या क्षणी आरोहात व अवरोहात किती स्वर असतात त्यावरून केलेले वर्गीकरण विचारात घ्यायचे आहे. याला खालीलप्रमाणे तांत्रिक नावे आहेत -
५ स्वर - औडव किंवा ओडव
६ स्वर - षाडव
७ स्वर - संपूर्ण
(५ स्वरांपेक्षा कमी स्वर आरोह/अवरोहात नसतात अशी मान्यता आहे.)
[जाता-जाताः येथे जातिभेद असला तरी त्यात उच्चनीचतेची भावना नाही. कित्येक वेळा कमी स्वरांचे औडव राग अधिक स्वरांच्या संपूर्ण रागांपेक्षा जास्त भावतात असा माझा अनुभव आहे.]
याप्रमाणे यमन षाडव-संपूर्ण जातीचा आहे, म्हणजे त्याच्या आरोहात ६ व अवरोहात ७ स्वर येतात.
४. आरोह-अवरोहः
सोपे शब्दार्थ घ्यायचे तर
आरोह - वर वर चढत जाणे, उदा. सा रे ग म प ध नी र्सा आणि
अवरोह - खाली खाली उतरत जाणे, उदा. र्सा नी ध प म ग रे सा
पण हे शब्द थोडे आणखी तपशीलवार समजून घ्यायला हवेत.
आपले यमनाचे उदाहरण घेऊन पाहूया
यमनाचा आरोह - नीं रे ग ध नी र्सा         व
यमनाचा अवरोह - र्सा नी ध प ग रे सा
येथे आरोहात सा वर्ज्य असल्यामुळे एक भरीचा नीं घेतला आहे. ही गोष्ट संध्याकाळच्या व रात्रिआरंभाच्या अनेक रागात दिसून येते.
आरोहात सा व प वर्ज्य म्हणजे काय? एक स्वरावली घ्या - "धं नीं सा, नीं रे सा, नीं रे ग रे सा; ग म प रे ग रे सा, नीं ध प ग रे सा"
वरवर पाहता वाटेल की सा व प आरोहात आलेच, पण मग लक्षात येईल की सा किंवा प च्या लगेच पुढचा स्वर त्यांच्या वरचा नसून खालचा आहे. म्हणजेच सा व प यांना आपण अवरोहाचा भाग म्हणून समजले की नियमाचा उलगडा होतो (वर हिरव्या रंगात दाखवलेले स्वर पहा). पण "सा रे ग" "प ध नी सा" हे चालणार नाही. थोडक्यात सांगायचे तर आरोहात सा वर्ज्य म्हणजे सा वरून त्याच्या वरच्या स्वरावर जाण्यास मनाई आहे.
सर्व रागांना आरोह-अवरोह असतात, कारण स्वरावलींमध्ये वर-खाली जावे लागणे स्वाभाविक आहे. आणि त्याचे नियम आपल्याला रागाच्या आरोह-अवरोहावरून समजतात. (या गोष्टीला एक चमत्कारिक अपवाद माझ्या कानी आला आहे, त्यासाठी तळटीप पहा)
५. वादी-संवादीः
गाता गाता गायक मधून मधून एखाद्या स्वरावर क्षणभर थांबतो (यालाच न्यास करणे असेही म्हणतात), किंवा एखाद्या स्वराला महत्त्व देऊन, त्यावर भर देऊन, स्वरावली रचतो. असे लक्षात येते की बहुतेक रागांत असा एखादा स्वर असतो की त्याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. अशा स्वराला त्या रागाचा वादी स्वर म्हणतात. रागाच्या स्वरसप्तकात (सप्तक म्हटले खरे, पण रागाच्या जातीप्रमाणे त्यात ५,६,७ कितीही स्वर असू शकतील) दोन भाग पडतात - पूर्वार्ध (सारेगम) व उतरार्ध (पधनीर्सा). जणू काही एकाचे प्रतिबिंब दुसरे असते. असा विचार केला की असे दिसते की रागात आणखी एक प्रतिबिंबात्मक स्वर असतो की वादीच्या खालोखाल त्याला महत्त्व दिले जाते. याला संवादी स्वर म्हणतात. आणि खरोखर बहुधा तो वादी चे प्रतिबिंबच असतो.
उदा. यमन रागाचा वादी गंधार व संवादी निषाद आहे. पहिला सप्तकपूर्वार्धातला तिसरा स्वर तर दुसरा सप्तकउत्तरार्धातला तिसरा स्वर.
संगीतातल्या स्वरांच्या बाबतीत "षड्जपंचमभाव" असा एक शब्दप्रयोग केला जातो. "प" हा "सा" चा पंचम, तर "र्सा" हा "प" चा मध्यम. समजा दोन स्वर आहेत, त्यातल्या एका स्वराला सा मानले तर दुसरा स्वर त्याचा पंचम होतो. असे असले की त्या दोन स्वरांत षड्जपंचमभाव आहे असे म्हणतात.
वादी व संवादी स्वरांमध्ये बहुधा असा षड्जपंचमभाव असतो.
यमनाच्या बाबतीतही हे दिसून येते कारण "नी" हा "ग" चा पंचम होतो. हे पेटीवर दोन्ही स्वर वाजवले की लगेच कळेल.
वरील वर्णनात आणखी एका शब्दाची भर टाकावी लागेल. काही स्वर त्या रागाला बाधा आणणारे, त्यात नको असणारे असतात. ते स्वर गायले की रागाचा बेरंग होतो. अशा स्वरांना विवादी स्वर असे म्हणतात. काही महान गायक एखादा राग गाताना मधूनच असा एखादा विवादी स्वर मोठ्या कौशल्याने रंगाचा भंग होऊ न देता लावतातही, पण तो अपवाद. आपल्यासारख्या सामान्य रसिकाच्या किंवा गायकाच्या दृष्टीने ते वर्ज्यच मानले पाहिजे.
६. पकडः
बहुतेक कोणत्याही रागात काही विशिष्ट स्वरावली किंवा स्वररचना वारंवार येतात, गातांना घेतल्या जातात. या क्रमाने स्वर आले की एका क्षणात रसिकांना कळते / जाणवते की हा अमुक राग आहे. या स्वरावलींना त्या रागाची "पकड" असे नाव दिले जाते.
यमन रागाला अशी काही वेगळी पकडस्वरूपी स्वरावली नसावी, पण नुसते "नीं रे ग" म्हटले तरी यमन रागाची हवा निर्माण होते असे मला वाटते (तज्ज्ञांनी माहितीत भर टाकावी).
एखाद्या रागात येणाऱ्या ठराविक आलापांची स्वरलिपी पाहून देखील त्याचे चलन कळते.

बहुधा वरील ६ गोष्टी समजल्या की त्या रागाच्या स्वरूपाची कल्पना येते व राग ओळखण्याला मदत होते.


पण राग म्हणजे काय असते?
अनेक रसांनी बनलेल्या मिसळीची चव काय असते हे सांगणे अशक्य असते. कारण चव ही अमूर्त (ऍब्स्ट्रॅक्ट) गोष्ट आहे. त्या चवीचे वर्णन करता येईल पण ते वर्णन म्हणजे काही ती चव होत नाही. त्या चवीमुळे मनात कोणते भाव जागृत होतात तेही सांगता येईल, पण ते प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलू शकेल. आणि त्याचा चवीशी काय संबंध असेही विचारता येईल.
काहीसे असेच रागाविषयीही म्हणता येईल. संगीत ही अमूर्त कलांपैकी प्रधान म्हणावी असे त्याचे स्थान आहे. अडाण्यापासून ज्ञानी माणसापर्यंत संगीत थेट पोचू शकते. त्याला शब्दांची गरज नाही आणि त्याचा अर्थ शोधणे हा व्यर्थ खटाटोप होईल. कोणताही राग हा त्यातले एक भावरूप, एक मूड, एक साकारीकरण, मॅनिफ़ेस्टेशन, इन्स्टंशिएशन आहे. दुसरा शब्द मिळत नाही म्हणून त्याला "भाव" म्हणायचे, पण खरे तर हा शब्द अपुरा आहे.
आपल्या संगीताची थोरवी हीच की त्याने असे वेगवेगळे "भाव" शोधले, ओळखले, आयडेंटिफ़ाय केले, कोडिफ़ाय केले.
(वरील वाक्यातले इंग्रजी शब्द मलाही डाचतात, पण चपखल प्रतिशब्द न सुचल्यामुळे आणि अचूक अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या गरजेमुळे ते तसेच ठेवावे लागले, त्याबद्दल क्षमस्व)
शास्त्रीय संगीताचा ज्यांना परिचय नाही त्यांनी जेवढे म्हणून ऐकता येईल तेवढे ऐकावे आणि मी म्हणतो त्याची प्रचीती घ्यावी.
यापेक्षा अधिक रागाचे जितके वर्णन करावे, केले जाते, त्याला वेगवेगळे भाव चिकटवले जातात, करुण-शृंगार इ. रस सांगितले जातात ते सर्व माझ्या मते अप्रस्तुत, रिडंडंट, एक्स्ट्रानियस आहे.
ऐकून अनुभव/आनंद घ्यावा, भोगावा व गप्प बसावे हे सर्वात योग्य.
यात कोणतीही भर घालायला गेले तर तो प्रयत्न कलेच्या वेगळ्या प्रांतात जाईल. ईश्वराचे किंवा ब्रह्माचे वर्णन करायला जाणाऱ्यांना ज्ञाते "नेति, नेति" (हे नव्हे, हे नव्हे) म्हणतात त्यातलाच हा प्रकार आहे.
ही प्रत्यक्ष कला आहे, हा प्रत्यक्ष अनुभव आहे.
हातवारे करून करून गाणारे किंवा नुसता स्वर लांबवून टाळ्या मिळाल्याशिवाय न थांबणारे भोंदू अनेक भेटतील त्यांना सोडा,
पण प्रामाणिकपणे शोध घेणारे, आपल्याला मिळालेले सांगीतिक सत्य दुसऱ्यांना दाखवणारे निखळ साधकही येथे आहेत त्यांना ऐका.
सगळी बाह्य वस्त्रे उतरवून आपल्यापर्यंत पोचेल ते संगीत व तो राग.
राग हा त्या अनुभवातला बारकावा आहे, असे गायले की असे भावते याची ती जाण आहे. एका प्रकारे रागांची ओळख करून घेणे हे आत्मचिंतन आहे, स्वतःच्या सांगीतिक जाणीवांचा अभ्यास आहे.


रागांमधील गाणी आणि गाण्यांचे रागः
गाणी ही रंजनासाठी रचलेली असतात, अमुक रागाचे दर्शन घडावे म्हणून कोणी चाली लावत नाही. "निरंकुशः खलु कवयः" (प्रतिभावंतांना कुठल्याही नियमांचे बंधन नसते) असे वचन आहे. हीच गोष्ट महान संगीतकारांच्या संगीतरचनांतही दिसते. काही गाण्यांना एखाद्या रागाचा आधार असतो पण त्याचे बंधन पाळले जाईलच असा कोणताही भरवसा देऊ नये. शिवाय गाणे तीन-चार मिनिटांचे असते, रागाची सगळी वैशिष्ट्ये थोडीच त्यात येणार?
म्हणून एखादे गाणे अमुक रागात आहे असे ऐकले / वाचले तरी त्यावर लगेच विश्वास न ठेवणे हेच बरे. त्यातल्या त्यात नाट्यगीते बऱ्यापैकी एखाद्या रागात असतात आणि बरेच वेळा निदान त्याची बंधने पाळतात असे दिसते.
तरीही सामान्य रसिकांचा विचार केला तर वेगवेगळे राग ओळखायला शिकतांना गाण्यांचा उपयोग होतो हे नाकारण्यात अर्थ नाही.
हे यासाठी लिहिले की आपण संगीत व राग समजून घेण्यासाठी गाण्यांच्या मार्गाने जावे पण त्याच्या मर्यादा ध्यानात ठेवून, उद्दिष्ट रागाकडे जाण्याचे आहे याचे भान न विसरता.
यमन राग ओळखण्याचे उदाहरण
यमन रागावर आधारित किंवा संबंधित ही गाणी पहा -
१. नाथ हा माझा मोही खला
२. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
३. कानडावू विठ्ठलू करनाटकू
४. निगाहें मिलाने को जी चाहता है
५. देवाघरचे ज्ञात कुणाला
६. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
७. शंकर महादेवन् च्या ब्रेथलेस गाण्याचा पूर्वार्ध
आता ही गाणी यमनात आहेत किंवा नाहीत हे कसे ओळखायचे किंवा तपासायचे?
उदाहरणादाखल निगाहें .... हे गाणे घेऊ -
निगाहें मिलाने को जी चाहता है
ओळीने प्रश्न विचारत व उत्तरे देत जाऊया.
अ) पट्टी/सा कोणता? है या अक्षरावरचा स्वर
ब) स्वर कोणते आहेत?
निगाहें    मिलाने को जी चाहता है
नींनीं रे   रेग   रे ग  नीं  रेरे  गरेसा
निगाहें    मिलाने को जी चाहता है
सासाग  ग ग  म  नीधप प  गसाग
निगाहें   मिला ऽऽ ने ऽ को जीऽऽ     चाहता है
पपपप    पनीधनी  मधप    नीधनीसा नीधप धप
निगाहें    मिलाने को जी चाहता है
नींनीं रे   रेग   रे ग  नीं  रेरे  गरेसा
म्हणजे आपल्याला एकूण स्वर (तीव्र व इतर शुद्ध) व आरोहातले वर्ज्य स्वर यांचा आता अंदाज आला.
क) रागांच्या आधीच्या जाणकारीमुळे यमनाशी जुळतो आहे याची खूणगाठ पटली.
आणि राग यमन हे ओळखले!
हे चटकन कळण्यासाठी विविध प्रकारचे विविध गायकांनी गायिलेले यमन आपण ऐकलेले असले तर काम सोपे होते हे सांगणे नलगे. अन्यथाही कायम ऐकत राहणे आवश्यक असते म्हणजे नवनवीन पैलूंनी राग दिसत राहतो व आपली त्या रागाची धारणा अधिकाधिक पक्की होते.
संगीतप्रेमींनी आळशीपणे बसून राहिलेले चालत नाही.
कुठेही सूर ऐकू आले की कान टवकारले गेले पाहिजेत, स्वर कोणते आहेत, राग कुठला असावा याचा शोध घेत राहिले पाहिजे.
काम कष्टाचे नाही, आवडीचे होऊन गेले पाहिजे, मग फळे मिळणारच.
(पराधीन.... मध्ये कुठेतरी शुद्ध मध्यम आहे का? कुठे आहे तो? तसे असल्यास कोणता राग होईल?)
--------------------------------------------------------------
तळटीपः "सिंधुभैरवी" नावाचा एका गायकाच्या जीवनावरचा एक तमिळ चित्रपट आहे, संगीतकार इलयराजा यांचे त्याला संगीत आहे. त्यात एका प्रसंगी निवेदक म्हणतो "गाण्यात आरोह-अवरोह दोन्ही असतात, त्याशिवाय कोणी कधी गाणे ऐकलेले नाही. पण यांच्या गाण्यात फक्त चढती कमान, फक्त आरोह आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? ऐका तर असे अद्भुत गाणे ..." आणि काय आश्चर्य - खरेच यापुढे सुरू होणारे "कलै वाणिये" हे गीत तसेच आहे. मी तर तोंडात बोट घालून ऐकत राहिलो. येशुदास यांनी म्हटलेले ते गाणे माझ्या संग्रही आहे व ते ऐकताना अजूनही मी थक्क झाल्याखेरीज रहात नाही.