डोंबिवलीतील 'दधीची देहदान मंडळा'चे एक कार्यकर्ते श्री. बा. वा. भागवत यांचे आमच्या घरी नेहमी येणे - जाणे आहे. त्यांच्याकडून 'देहदान' विषयक एक माहिती पुस्तिका मिळाली. ती वाचेपर्यंत या विषयात आपण सुशिक्षित म्हणवणारे सुध्दा किती अनभिज्ञ असतो हे जाणवले. मला मिळालेल्या माहितीचा लाभ सर्वांना मिळावा या हेतूने ती पुस्तिका मी स्कान करून इथे(http://www.goowy.com/filepx0jgl914b-f_17826671-3904-rar-Dehdaan.html) अपलोड केली आहे. इच्छुकांनी ती अवश्य वाचावी.
त्या पुस्तिकेतील माहितीचा सारांश मी इथे देत आहे. या व्यतिरीक्त अधिक माहिती कोणाकडेही उपलब्ध असल्यास इथे मांडावी अथवा मला majhiduniya@gmail.com वर कळवावी. ती माहिती सुध्दा यात समाविष्ट केली जाईल.
काही सत्य....
१) एखाद्या व्यक्तिने मरणोत्तर देहदान केल्यास, त्याच्या मॄत शरीराचा उपयोग वैद्यकीय विद्यार्थांना शिक्षणासाठी होतो.
२) बेवारस मॄतदेह पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत सडू लागतात. त्यांच्यावर कोणतीही प्रक्रिया नंतर करता येत नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थांना अभ्यासासाठी निरूपयोगी ठरतात.
३) मॄत्युपश्चात नेत्रदान, त्वचादान आणि देहदान करता येते.
४) नेत्रदान मॄत्युनंतर २ तासांच्या आत आणि देहदान ६ - ७ तासांच्या आत करावे लागते.
५) मॄत्युनंतर मॄताच्या देहावर वारसाचा अधिकार असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तिने देहदानचा फॉर्म भरुन सुध्दा जर आयत्या वेळी वारसाने नेत्रदान अथवा देहदानाला नकार दिल्यास कयद्याने तो गुन्हा होत नाही.
६) त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तिने देहदानाचा फॉर्म भरलेला नसेल पण वारसाची जर इच्छा असेल तर मॄताचे नेत्रदान / देहदान होऊ शकते. (अर्थात वारसाला त्याकरता ऑफेडेव्हिट मात्र करावे लागते. मधल्या वेळात देह खराब होऊ नये म्हणून पैसे भरून शवागारात ठेवण्याची यातायात करावी लागते, त्यापेक्षा स्वतःहून फॉर्म भरलेला केव्हाही चांगला.)
७) ब-याच आजारी स्थितीतला किंव्हा संसर्गजन्य रोग झालेला देह स्विकारला जात नाही. उदा. काविळ, एड्स, कॉलरा, गँगरीन वगैरे.
८) मृतदेह हा वारसानेच नेऊन द्यावा लागतो. त्याकरता येणारा शववाहिनीचा / रूग्णवाहिनीचा खर्च वारसाला स्वतःलाच करावा लागतो.
९) नगरपालिकेकडून मॄत्युचा दाखला हवा असल्यास सरकार मान्य वैद्यकीय महाविद्यालयालाच देह द्यावा.
१०) एरवीही हिंदू धर्माप्रमाणे अस्थिंचे विसर्जन केले जाते. अस्थिंवर कोणतेही धार्मिक विधी, दिवसवार अवलंबून नसतात. ते सगळे विधी अश्म्यावर केले जातात. पुर्वीच्या काळी सुध्दा मॄताचा देह न मिळाल्यास समिधा किंव्हा पीठ ह्यांचा देह करून त्यावर अग्निसंस्कार करून "अश्मा' काढत आणि सर्व धार्मिक विधी त्यावर करत.
११) पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे सुध्दा देहदानाला मान्यता दिलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्यातर्फे दहाव्यापासून ते तेराव्यापर्यंतचे वेगवेगळे विधी न करता ११ व्या दिवसापासून सोयीच्या दिवशी एक ते दिड तासाचा एकोदिष्ट विधी केला जातो.
मी आणि माझ्या नव-याने वर सांगितलेली पुस्तिका वाचून देहदानाचा फॉर्म भरलेला आहे. लवकरच त्यांच्याकडून त्याबद्दलचे आमचे रजिस्टर नंबर्स येतीलच. त्यानंतर आणखीन काही माहिती मिळाल्यास मी ती अवश्य इथे मांडीन.