हसण्यासाठी जन्म आपुला

      संता रस्त्याने चालला होता. समोरून घोड्याला खेचत खेचत नेणारा बंता त्याला दिसला.बंताबरोबर जाण्यास घोड्याचा प्रखर विरोध होता.त्यामुळे बंताची फार तारांबळ उडाली होती. संता त्याच्या मदतीला धावला. दोघांनी मिळून घोड्याला बंताच्या अकराव्या मजल्यावरच्या घरात नेला.  बंता त्याला बाथरुममध्ये घेऊन गेला.मग खिशातून पिस्तूल काढून बंताने दोन गोळ्या घोड्यावर झाडल्या. घोडा तिथेच कोसळला. इतका वेळ संताच्या मनात अनेक प्रश्न आले होते. पण तो गप्प राहिला होता. आता मात्र त्याला राहवले नाही. तो म्हणाला,"अरे, घोड्याला मारायचंच होतं तर एवढी झटापट करून त्याला इथे आणलंसच कशाला?"
      बंता म्हणाला,"अरे तुझं अजून लग्न झालं नाही म्हणून बायकोचा भाऊ ही काय चीज असते हे तुला माहीत नाही. माझ्या बायकोचा भाऊ अतिशहाणा आहे. मी त्याला काहीही नवीन सांगितलं ,मग ते राजकारणाबद्दल असो,कलेबद्दल साहित्याबद्दल,  कशाहीबद्दल असो तो म्हणतो यात काय नवीन सांगितलं? मला हे आधीच माहीत होतं. आज तो माझ्या घरी जेवायला येणार आहे. तो हात धुवायला  बाथरुममध्ये जाईल तेंव्हा मला सांगत येईल,"जिजाजी, तुमच्या बाथरुममध्ये एक घोडा मरून पडला आहे." तेंव्हामी त्याला सांगेन यात काय नवीन सांगितलंस? मला हे आधीच माहीत होतं." 
 
      एक्सप्रेस हायवे वरून एक गाडी भरधाव वेगात चालली होती. इन्स्पेक्टरांनी तिचा पाठलाग करून तिला थांबवली तेंव्हा ती गाडी चालवणाऱ्या टपोरीने विचारले,"काय साहेब, काय मिष्टिक झाली का?" 
      इन्स्पेक्टर म्हणाले,"नाही. नाही. त्याचं काय आहे, आम्ही सुरक्षा सप्ताह पाळत आहोत आणि काळजीपूर्वक गाडी चालवणाऱ्यांना बक्षीस देत आहोत. तुम्हाला पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. पण मला सांगा इतक्या पैशाचं तुम्ही करणार तरी काय?"
      टपोरी म्हणाला,"पयल्यांदा एक लर्निंग लायसन घेईन म्हणतोय."
      त्याच्या बाजूला  एक बारबालाटाईप मुलगी बसली होती. ती म्हणाली,
"ओ इनिसपेक्टर, याच्याकडे लक्ष देऊ नका. तो पिऊन टाईट झाला ना मग काय पण अनापशनाप बडबडतो." 
      या बोलण्याने मागच्या सीटवर झोपलेल्या एकाची झोपमोड झाली. पोलिसांना बघून तो ओरडला,"बोंबला. पोलिसांनी पकडलं. तरी मी सांगत होतो चोरीची गाडी एसप्रेस वेवरून नका काढू."
      त्याच्या शेजारी बसलेला अर्धवट झोपेत म्हणाला,"काय कटकट आहे. झोपायला पण देत नाय. पोलिस आले तर काय झालं? त्यांनी अजून डिकी खोलायला सांगितली आहे का?डेड बॉडी बघत नाय तोपर्यंत काय वांधा आहे? झोप तू."  


      शराबी पिक्चरमधल्या अमिताभ बच्चनच्या अभिनयाने एक तरुण इतका झपाटला गेला की तो थिएटरामधून बाहेर पडला तोच साभिनय गात 'दे ,दे,प्यार दे ,प्यार दे, प्यार दे, दे'. असा गात चालला असताना त्याला एक दरवाजा उघडा दिसला. त्या घरात घुसून तो घराच्या तरुण मालकिणीसमोर अमिताभच्या स्टाइलमध्ये गाऊ लागला. ती भडकून म्हणाली,"आरं ए काळतोंड्या , तुला काय लाज शरम हाय का न्हाई? आमचं पैलवान घरात आसतं तर तुजा पार खुर्दा बनिवला आसता."
      तेवढ्यात पैलवान घरात शिरले. पण मजनू एवढा झपाटलेला होता की तो उड्या मारत मारत गातच राहिला. पैलवानांनी बायकोला विचारले,"ह्यो काय तमाशा हाय?"
     कारभारीण उत्तरली,"बगा ना. वळक न्हाय. देक न्हाय. घरात घुसून कसा माकडावाणी नाचत्योय बगा."
      पैलवानांना राग आला. त्यांनी मजनूची कॉलर पकडून त्याला जमीनीवर आडवा घातला आणि त्याच्या छाताडावर बसून त्याला बुकलायला सुरवात केली. कारभारीण प्रोत्साहन देऊ लागली,"मारा.मारा. अजून मारा. बायकांसंगट कसं वागावं त्ये बी कळंना मेल्याला. अजून मारा."
      अचानक बाजी उलटली.आता पैलवान जमीनीवर आणि मजनू त्यांच्या छाताडावर बसून त्यांना बुकलू लागला. पैलवानाची कारभारीण प्रोत्साहन देऊ लागली," मारा. मारा. अजून मारा. सवताबी पिरेम करीत न्हाईत आन् दुसऱ्यालाबी करून द्येत न्हाईत. अजून मारा."
                                                             वैशाली सामंत.


'