आपण समाजासाठी काय करता? (समाजकार्य)

मित्रहो,


मी मनोगतवरच्या आलिकडच्या चर्चा आणि वादविवाद पाहिले. बऱ्याच शाब्दिक चकमकी पाहिल्या. मग असे मनात आले की नुसते शाब्दिक वाद (अर्थात सर्वच नाही हं !) घालून आपण स्वतःची बौद्धिक प्रगती करतो. पण यातून आपण आपल्या समाजासाठी काय करतो ?


माझे आतापर्यंतचे सर्व शिक्षण Free-seat  मधून झाले. पण तो खर्च विशेषतः अभियांत्रिकीचा, सरकार आणि मुळात समाजाकडून केला गेला. बऱ्याच शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यामुळे शिक्षण घेताना मला सतत वाटले की आपण समाजाचे कितीतरी देणे लागतो. याची परत फेड आपण केली पाहिजे. अर्थात नोकरी लागल्यावर मिळकत-कराच्या (पैशाच्या) रूपाने मी ती करत होतो. पण ती पुरेशी नाही असे मला जाणवले.


इथे मला आणखीन एक उदा. देता येईल. माझा एक जवळचा मित्र प्रेमभंगाच्या आघाताने आत्महत्या करायला निघाला होता. मग त्याला खूप सुनावले आणि समजावले की तू स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी तरी जग! त्याला मी समाजकार्याचा मार्ग सुचवला. तो आता मागचे सगळे विसरून, नोकरी करत करत CRY Foundation  साठी उत्साहाने काम करतोय. त्याचे मानसिक समाधान पाहून मलाही खूप आनंद होतो.  


तर मला इथे खालील मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे -


१. तुम्हाला माझ्याप्रमाणे वाटते का ? की समाजकार्य ही फक्त खूप श्रीमंताची कामे आहेत असे वाटते ?


२. पैशाव्यतिरिक्त कशा प्रकारच्या समाजसेवा करता येतात?


३. नोकरी सांभाळून काय करता येईल ?


४. तरुणांना याबाबत काय मार्गदर्शन करता येईल ?


५. परदेशी स्थायिक लोकांनी कशा प्रकारे समाजकार्य करावे ?


अर्थात कोणी मनोगती असेही विचारेल की आम्हाला विचारणारा हा स्वतः काय करतो ? तर मी माझ्या घराजवळच्या एका अपंग शाळेत संगणक-प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे (अर्थात बिनपगारी !).


पण तुमच्याकडून आणखीन मार्गदर्शन मिळाले तर मी त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करेन आणि इतर मनोगतींनाही याचा लाभ होईल अशी आशा करतो.


कदाचित या चर्चेद्वारे आपल्या मधील सामाजिक कार्यकर्त्यांची ओळखही बाकीच्यांना होईल जी खूपच अभिमानाची गोष्ट असेल किंवा इतरांना समाजकार्य करण्याची सुबुद्धी मिळेल.


कृपया या गंभीर चर्चेचे विषयांतर शक्यतो टाळावे ही नम्र विनंती! धन्यवाद ! 


- मोरू