बेल्जियम कहाणी १

          माझा हा अनुभव मला अतिशय वेगळा वाटला.म्हणूनच मी तो लिहायचा असे ठरवले.


              रोटरीच्या youth exchange कार्यक्रमात भाग घेतल्यावर मी बेल्जियम या देशाची निवड केली. निवड केल्यानंतर जायचा दिवस कधी येऊन ठेपला ते कळलेच नाही.मनात प्रचंड धाकधुक होती की मी विमानातून एकटी प्रवास करणार. सगळे सांगत होते की फ़ार काळजी करू नकोस,सगळे मदत करतात. पण मला तर भिती वाटत होती.


                अशा परिस्थित माझा प्रवास मस्त झाला.काहीच त्रास झाला नाही. फ़क्त त्या विमानातल्या बेचव जेवणाने तोंडाची चव घालवली. माझी पुढची चिंता म्हणजे माझे बेल्जियम मधील कुटूंब मला घ्यायला येईल ना! त्यांच्याशी बोलणे झाले होते, पण मनात भिती होती की ते नाही आले तर....


                 ठरल्याप्रमणे ते आले होते.मला माझ्या बहिणीने हाक मारून जवळ बोलावले.मी जवळ जाताच तिने गालाला गाल भिडवुन हवेत चुंबन घेतले अगदी नट-नटी करतात तसे! त्यानंतर नविन आई आणि बाबाही! मी तर पुरती गोंधळले होते. अशी सुरूवात झाल्यावर पुढे कशा-कशाला सामोरे जायला लागेल आणि एका वर्षात काय काय करायला लागेल असे मला वाटू लागले.