किस्से निरक्षर ग्राहकांचे

      सकाळचे साडेआठ वाजले होते. बँकेचे कामकाज नुकतेच सुरू झाले होते. ग्राहकांची फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे सारे कसे शांत शांत होते. इतक्यात कॅश केबिनजवळ गलबला ऐकू आला. पाहिले तर आमची एक निरक्षर ग्राहक , मेरी फर्नांडिस हातवारे करून काहीतरी सांगत होती आणि कॅशिअर तिच्याशी तावातावाने बोलत होता. नक्की काय झालंय ते पाहायला मी कॅश केबिन जवळ गेले आणि कॅशिअरला म्हणाले,"काय रे, काय झालं? असा ओरडतोस काय तिच्यावर?"
      तो म्हणाला," ओरडू नको तर काय करू? ही काल पैसे काढून गेली. आज येऊन सांगते की पैसे कमी मिळाले. आणि सरळ सरळ मला चारसोबीस म्हणतेय."
      तेवढ्यात मेरीने मध्ये तोंड घातले पण तिच्या दंतविहिन तोंडामुळे उच्चार अस्पष्ट होते. त्यात ती गोव्याची कोंकणी बोलत होती आणि जोडीला मुसमुसतही होती. त्यामुळे काही कळणे कठीणच होते. कॅश केबिनजवळ गोंधळ नको म्हणून मी कॅशिअरला म्हटले,"मी बघते काय झालंय ते. तू शांत डोक्याने काम कर. कॅशमध्ये बसला आहेस ते विसरू नकोस."
      मेरीला घेऊन मी माझ्या टेबलापाशी आले आणि समोरच्या खुर्चीत तिला बसवत म्हणाले,"हं आता सांगा काल काय झालं ते."
      पासबुकातून विसाच्या चार नोटा काढून त्या माझ्यापुढे नाचवत ती म्हणाली,"काल मला एवढेच पैसे मिळाले. ते पासबुकात ठेवून मी सरळ घरी गेले. रात्री मुलाला दिले तर तो म्हणतो की तुला पैसे कमी मिळाले. हा बाबा म्हणतो की पैसे बरोबर दिले. माझे कष्टाचे पैसे गेले." आणि तिने नव्या जोमाने रडायला सुरवात केली.
      तिच्या हातातले पासबुक घेऊन मी बघितले तर खात्याला ऐंशी रुपयेच डेबिट झाले होते. मी तिला विचारले,"तुम्हाला किती पैसे काढायचे होते?"
      तिने उत्तर दिले," पांयशे रुपये."
      तिच्या उत्तराने माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आमच्याकडे  'मे आय हेल्प यू' काउंटर होता. तिथे निरक्षर लोकांना पैसे भरायची आणि पैसे काढायची
स्लिप भरून मिळत असे.तिथल्या माणसाला मेरीचे 'पांयशे" हे ऐंशी वाटले होते.
त्यामुळे त्याने ऐंशी रुपयाची स्लिप बनवली आणि ऐंशी रुपयांचे पेमेंट झाले. मेरीच्या हिशोबाने तिला चारशे वीस रुपये कमी मिळाले होते.तिने कॅशिअरला चारसोबीस म्हटले नव्हते. चारशे वीस रुपयांची दुसरी स्लिप बनवून तिला पैसे दिले.ती खूश होऊन गेली. खरा प्रकार कळल्यावर कॅशिअरला हायसे वाटले.
      नसीम बानू ही आमची दुसरी निरक्षर ग्राहक. तिचा मुलगा दुबईहून तिच्या खात्यात जमा करण्यासाठी दरमहा काही रक्कम परस्पर बँकेकडे पाठवीत असे. एका महिन्यात टपालखात्याच्या दिरंगाईमुळे ड्राफ्ट यायला १०-१२ दिवस उशीर झाला. दरम्यान नसीम बानू रोज बँकेत ड्राफ्टची चौकशी करायला येत होती. ड्राफ्ट आल्याच्या दुसऱ्या दिवशी नसीमबानूला बँकेच्या दारात बघूनच लेजरकीपर तालात ओरडला,"आया, आया, तुम्हारा डर्राफ आया." त्याच्या बाजूला बसलेल्या त्याच्या सहकाऱ्याने जोरात हसून 'प्रतिसाद' दिला. नसीम बानूने 'मे आय हेल्प यू' काउंटरवरून पैसे काढण्याची स्लिप भरून घेतली. दुसऱ्या कोपऱ्यात बसणाऱ्या माणसाकडून पैसे भरण्याची स्लिप भरून घेतली.
पेमेंट कॅशिअरकडून पैसे घेतले आणि बाजूच्याच रिसीट कॅशिअरकडे ते भरायला गेली. रिसीट कॅशिअरने तिला पैसे घेताना बघितले होते म्हणून त्याने विचारले की भरायचेच होते तर पैसे काढलेच कशाला. यावर तिने उत्तर दिले,"उस लडकेने चोपडी खोलेबिनाही बोला कि पैसा आया है. उसका बाजूवालाभी हसा तो मेरेकू देखनेका था कि सच्चीका पैसा आया है कि नहीं"
      डोकॅलिटी म्हणतात ते हिलाच का हो?
                                                         वैशाली सामंत.