संजीवकुमार - आठवला तसा

हिंदी चित्रपट शौकीनांना तुमचा आवडता अभिनेता कुठला असा प्रश्न विचारल्यास बरीच मनोरंजक उत्तरे मिळतील. दिनो मोरियापासून अमिताभ बच्चनपर्यंत आणि गोविंदापासून बलराज सहानीपर्यंत कुणीही लोकांचा आवडता अभिनेता होऊ शकतो. या यादीत हरीभाई जरीवाला उर्फ संजीवकुमार हे उत्तर असेल, नाही असं नाही, पण काही विशिष्ट लोकांनी दिलेलंच. जनसामान्यांचा लोकप्रिय अभिनेता / नायक होण्याचं भाग्य संजीवकुमारला फारसं लाभलं नाही. त्याचे चित्रपट चालले, समीक्षकांनी त्याची वाहवा केली पण हिंदी चित्रपटसृष्टीवर एक न पुसला जाणारा ठसा उमटवणारा हा गुणी अभिनेता तसा उपेक्षितच राहिला.

आणि ही उपेक्षा संजीवकुमारला काही नवीन नव्हती. 'हीरो' होण्यासाठीचं लौकिकार्थानं आवश्यक 'मटेरिअल' त्याचाकडं फारसं नव्हतं. सर्वसाधारण उंची, तरूण वयातच बेडौल होऊ लागलेलं शरीर, काहीसा बसकट  आणि वरच्या टीपेला पोचल्यावर पिचणारा आवाज - नाही म्हणायला तरुण वयात त्याचा चेहरा निरागस आणि गोड होता. पण या सगळ्याचा विसर पडावा अशी दिपवून टाकणारी अभिनयक्षमता त्याच्याकडे होती. ही क्षमताच कधीकधी त्याला घातक ठरली. अमिताभ बच्चन या एकछत्री साम्राज्यात, जिथं शशी कपूर, धर्मेंद्र, विनोद खन्ना यांनी मांडलिक होऊन रहाण्यात धन्यता मानली, तिथं संजीवकुमार अमिताभच्या पुढं समर्थपणे उभा राहिला. तसा पूर्वी तो दिलीपकुमारच्याही पुढे तितक्याच ताकदीने उभा राहिला होता. मग कुणीतरी मध्येच त्याच्या केसांना पांढरा रंग लावला. या पांढऱ्या कलपाने बाकी मग त्याची पाठ सोडली नाही. स्वतःच्या वयाच्या नायकनायिकांचे बाप संजीवकुमारने रंगवले उत्तम, पण मग त्याच्याकडे तशाच एकसुरी भूमिका येत राहिल्या. नाईलाजाने तो त्या करतही राहिला.

संजीवकुमारचं नाव निघालं की नेहमी 'कोशिश' आणि 'नया दिन नयी रात' या चित्रपटांचा उल्लेख आवर्जून केला जातो.मला स्वतःला बाकी या भूमिका जराशा 'लाऊड' वाटतात. 'शतरंज के खिलाडी' मध्ये बेनेगलनी संजीवकुमारला काय वापरलाय बघा. पण संजीवकुमारचा सगळ्यात  प्रभावी वापर करून घेतला तो बाकी गुलजारने. 'परिचय' मधल्या कडक शिस्तीच्या प्राणचा कलासक्त मुलगा या भूमिकेचं संजीवकुमारनं सोनं केलं आहे. बंगल्याच्या गच्चीवर रियाज करत असताना नोकराच्या हातून बापानं वेळेवर पाठवलेल्या लिंबूपाण्याचा पेला घेताना "हँ... नींबू पानी..." म्हणून त्यानं जो उद्वेग व्यक्त केलाय त्याला तोड नाही. त्याचे आणि जया भादुरीचे प्रसंगही अत्यंत तरल आणि हृदयस्पर्शी आहेत. 'अंगूर' म्हणजे तर काय  निव्वळ धमाल. त्यातला संजीवकुमार आणि मौसमी चटर्जीचा पकोडे खातानाचा प्रसंग आठवला तरी हसू फुटतं "क्या बात कर रही हैं आप... आपने नंगा देखा है मुझे?" म्हणताना संजीवकुमारने 'नंगा' हा शब्द असा म्हटलाय की ज्याचं नाव ते! त्याचं "लेकिन बहादुर मैं ये क्या सुन रहा हूं... तू बाप बननेवाला है...." हे पालुपदही गमतीदार.

'आंधी' 'मौसम' आणि 'नमकीन' या चित्रपटातल्या गंभीर भूमिकांविषयी काय लिहावं?  संजीवकुमारने त्यातल्या बारीकसारीक छटा काय बहारीने खुलवल्या आहेत! बोलताबोलता भरून येणं, आवाज दाटून येणं, डोळ्यांच्या कडा पाणावणं यात तर संजीवकुमार 'मास्टर' च होता. 'विश्वासघात' या तशा फारशा प्रकाशात न आलेल्या चित्रपटात दुरावलेल्या मुलाशी फोनवर बोलताना संजीवकुमारने भावनाविवश होऊन आवाजात जो कापरेपणा आणला आहे, तो आठवून आजही अंगावर काटा येतो.संताप दाखवतानाही  त्याची देहबोली खुलून यायची. 'आप की कसम' चित्रपटात गैरसमजातून राजेश खन्ना त्याच्या थोबाडीत मारतो, क्षणभर संजीवकुमारचा संताप अनावर होतो, त्याचा हातही प्रतिवारासाठी वर जातो, पण तो स्वतःला सावरतो आणि संतापाने शरीर थरथर कापत असतानाही म्हणतो "खुश रहो दोस्त..." या प्रसंगात संजीवकुमारच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्याची कल्पनाही करवत नाही!  चष्मा काढून तो पुसून परत घालणं  या साध्या कृतीचा पण संजीवकुमारने काय सुंदर वापर केला आहे! ( आठवा, 'त्रिशूल' मधले अमिताभबरोबरचे, 'काला पत्थर' मधले राखीबरोबरचे प्रसंग)

संजीवकुमारचा 'बीवी ओ बीवी' हा मला अत्यंत आवडलेला चित्रपट. 'बर्मा फ्रंट' च्या आठवणीत अडकून पडलेला विक्षिप्त कर्नल आणि भुरटा चोर शंकर या दोन्ही भूमिकांत संजीवकुमारने जान ओतली आहे! आपल्या मुलीसाठी वरसंशोधन करायला गेलेल्या कर्नलच्या प्रेमात पडलेली शशीकला, कर्नलचा तितकाच विक्षिप्त ऑर्डर्ली (राजेंद्रनाथची कारकीर्दीतली बहुदा सर्वोत्तम भूमिका!), कर्नलची घाबरगुंडी उडवणारी त्याची आई आणि या सगळ्यांनी मिळून घातलेला, वुडहाऊसच्या कादंबरीत शोभावा असा गोंधळ! क्या बात है!

आणि ज्या चित्रपटाच्या उल्लेखाशिवाय संजीवकुमारवरचा हा लेख पूर्णच होऊ शकत नाही तो म्हणजे अर्थातच 'शोले'. मला स्वतःला त्यातला संजीवकुमारचा जयराजबरोबरचा प्रसंग फार आवडतो. अर्थात 'शोले' ही एकंदरीतच जमून गेलेली भट्टी होती. संवादलेखक सलीम-जावेदनी एका धुंदीतच त्याचे संवाद लिहिले असावेत. आणि पडद्यावर आपल्या चिरक्या आवाजातून लाव्हा ओतत संजीवकुमार गरजला "ठाकूर न झुक सकता है, न टूट सकता है.... ठाकूर सिर्फ मर सकता है...."

वयाची पन्नाशीही न पाहता हिंदी चित्रपटातले काही सर्वोत्तम म्हातारे रंगवणाऱ्या  संजीवकुमारच्या वैयक्तिक आयुष्यातही काहीसे असेच झाले असावे, असे मला वाटते.