बेल्जियम कहाणी-३

                बेल्जियम मधे आल्यावर जी गोष्ट सर्वात जास्त जाणवते, ती म्हणजे इथले खाद्यपदार्थ! मी इथे येण्यापूर्वी असा कधीच विचार केला नव्हता की नुसता उकडलेला बटाटा हा जेवण म्हणून असू शकतो. इथे सगळे लोक उकडलेले दोन-तीन बटाटे घेतात आणि त्यावर अगदी नावापुरते मिठ, मिरपूड घालून मिटक्या मारत खातात. मला तर आश्चर्यच वाटते की असे नुसते बटाटे कसे जाऊ शकतात.


                  इथल्या लोकांचे आवडते खाणे म्हणजे चॉकलेट आणि बटाट्याचे finger chips! इथल्या खाण्याच्या वेळाही जरा वेगळ्या आहेत. सकाळी साधारणपणे ७ ते ८ मध्ये नाश्ता, दुपारी १२-१ च्या सुमारास जेवण आणि संध्याकाळी ७ ते ८ दरम्यान रात्रीचे जेवण घेतले जाते. प्रत्येक खाण्याआधी, खाताना आणि नंतर वेगवेगळी पेये घेतली जातात. अगदी बियर,वाईन पासुन कोकपर्यंत सगळी! इथे पाणी पिणारे लोक कमीच आणि जे पितात ते त्यात सोडा तरी घालतात नाहितर लिंबाचा रस!


                   इथल्या वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींपैकी काही- जर जेवताना कुणी ढेकर दिली [ढेकर दिली की दिला या वादात आपण पडायला नको. कारण विषय बाजूला राहील.] असो. तर कुणाला ढेकर आली तर त्याने पट्कन स्वतःच्या कपळावर शेंडी लावायची.[ अगदी टिळा लावताना बोट जसे ठेवतात तसे......] मग जेवणाऱ्या सगळ्यांनी तशीच शेंडी लावायची. जो लावणार नाही किंवा शेवटी लावेल; त्याच्या कपाळावर शेजारच्या व्यक्तीने चापटी मारायची. याचप्रमाणे जर कुणाला उचकी लागली असेल तर बरोबर असलेल्यांनी त्या व्यक्तीला काहितरी करून दचकवायचे; त्यामुळे म्हणे उचकी जाते.


                    अशा सगळ्या गोष्टी पाहून मनात विचार येतो की खरच दोन संस्कृतींमध्ये एवढा फ़रक असू शकतो?