चांदणे


तुला भेटून कळते काय असते चांदणे
कसे कायम कुण्या देहात वसते चांदणे

अवेळी उमलणे नाही बरे , हे जाणते
तरी नजरानजर होताच फसते चांदणे

कधी ओठांवरी रेंगाळते, छळते मला
कधी गालातल्या गालात हसते चांदणे

पुरेसा चिंब भिजुनी टाकतो निःश्वास मी
पुन्हा स्पर्शातुनी रिमझिम बरसते चांदणे

मळभ दाटून येते विरहसमयी एवढे
स्वतःला पूर्णतः हरवून बसते चांदणे

तसे रात्री नभी टिमटिम दिवे मी पाहतो
तुझ्याइतके परंतू लख्ख नसते चांदणे