नवरात्र

नमस्कार,


आता नवरात्र सुरु होईल.दुर्गेची,अंबेची प्रतिष्ठापना होईल. नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा हा सण!


पावसाळा संपत आलेला असतो,पीके तयार होत आलेली असतात.काही तयार झालेली असतात.बळीराजा खुशीत असतो.


घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात.फेर धरुन पारंपारिक भोंडल्याची गाणी म्हणतात.


         ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे


         करीन तुझी सेवा...


अशी गाणी गात शेवटी ...आडात पडला शिंपला,आमचा भोंडला संपला!


याने सांगता व्हायची,आणि .सर्प म्हणे मी ....खिरापतीला काय ग? अशी विचारणा.मग एकेक पदार्थाची नावे घेत खिरापत ओळखण्याची चढाओढ.


शेवटी गोड कि तिखट ? अशा तहाच्या वाटाघाटी सुरु झाल्या कि जिचा भोंडला असयचा तिला अगदी धन्य वाटायचे.


याच भोंडल्याचे हादगा,भुलाबाई असे प्रदेशानुसार स्वरुप बदलायचे.


परंतु आज पाहिले तर भोंडला नामशेषच व्हायला लागला आहे असे वाटते.


एका नामवंत वृत्तपत्रात " नवरात्रोत्सव जवळ आला की सगळ्यांच प्लॅनिंग सुरु होते ते गर्ब्याचे..." अशी सुरुवात वाचली तर दुसऱ्या ठिकाणी " नाचातला जोडीदार मिळवायच्या टिप्स.."


पूर्वीचा गर्बा सुध्दा स्वरुप बदलतोय.घरगुतीपणा जाऊन बाजारीकरण झाले आहे ," इव्हेंट" हे गोंडस नाव घेऊन!(असो,तो एक स्वतंत्र विषय आहे)


५,६ वर्षापूर्वीची गोष्ट आहे.एका शाळेत आम्ही ५वी,६वी च्या मुलींचा भोंडला करायचे ठरवले.मुलींना सूचना दिली.दुसऱ्या दिवशी कितीतरी मुली चनियाचोली घालून,टिपऱ्या घेऊन हजर! "अग,टिपऱ्या कशाला आणल्या?"असे विचारले आणि टिपरी म्हणजे दांडिया हे आधी सांगावे लागले.भोंडल्याची गाणी तर दूरची बात!


आणि आता तर वर्तमानपत्रातूनही नवरात्र= गरबा/दांडिया हेच समीकरण रुजू होते आहे याचा खेद वाटतो.


आपले या वरचे विचार,भोंडल्याच्या आठवणी,गमती वाचायला मिळाल्यास आनंद होईल.


आपली नवी मनोगती,


स्वाती