समस्त मराठी भाषिकांस आवाहन

नमस्कार,
आज या संदेशातून आपणा सर्वांपर्यंत मराठीसाठी काम करत असलेला प्रकल्प पोहचवावा ही इच्छा आहे.
एक मराठी संकेतस्थळ नुकतेच सुरू झालेले आहे. आंतरजालावरील मुक्त उपलब्ध असलेल्या आज्ञावाल्यांचं मराठी भाषांतर करणे आणि मराठी भाषिकांसाठी मुक्तपणे उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

मराठीप्रेमी तंत्रज्ञांसाठी एक सामाईक व्यासपीठ तयार करण्याच्या भूमिकेतून हे संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे काही फायदे खाली देता येतात.

१) समस्त मराठी भाषिकांसाठी काम करणारे मुक्त संकेतस्थळ जे एका सामाईक मंचाची उणीव भरून काढेल.

२) नवनवीन सॉफ्टवेअर्सना मराठीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.

३) सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषांतर माणके ठरवण्यावर भर दिल्या जाईल. नव्हे एव्हाना ते काम सुरू सुद्धा झालेलं आहे.

४) भाषांतरासाठी शब्दकोश बनवणे.

५) वेगवेगळ्या गटांचे पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्रसिद्धी देणे तसेच चालू असलेल्या प्रकल्पाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे.

६)नवीन लोकांसाठी याक्षेत्रात योगदान कसे द्यावे या बद्दल माहितीपूर्ण लेखमाला देणे.

७)नवनवीन भाषिक तंत्रज्ञान मराठीसाठी मराठीतून उपलब्ध करणे.

या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा आहे तो तुमचा सहभाग ! तुम्ही स्वतः: सुद्धा आपल्या मराठीसाठी भरीव योगदान देऊ शकता. खाली दिलेल्या कुठल्याही मार्गाने या प्रकल्पाला मदत करा.

१) सदस्य व्हा

२)कुठल्याही भाषांतर प्रकल्पाचे सदस्य व्हा.

३)नवीन सॉफ्टवेअरचे भाषांतर करा आणि ते मुक्त उपलब्ध करा, या संकेतस्थळाहून ते लोकांपर्यंत पोहचवा.

४) तंत्रज्ञ असाल आणि लिहू शकत असाल तर नव्या लोकांसाठी मार्गदर्शक लेख लिहा.

५) या क्षेत्रात नवखे असाल तर येथे या येथील जाणकार लोकांशी चर्चा करा आणि सहभागी व्हा.

६) तुम्ही हे किमान हे संकेतस्थळ तुमच्या ओळखीच्या सगळ्या मराठी भाषिकांपर्यंत पोहचवून सुद्धा आपले अमूल्य योगदान देऊ शकता.

आपली मराठी ही आपली मायबोली आहे. येणाऱ्या काळात तिची कालसुसंगत जोपासना केल्यास तिला बहर येईल आणि तिचं महत्त्व कालसापेक्ष राहील. पण आपण जर का आजही निष्क्रिय राहीलो तर मग मात्र मराठीची आपल्या हाताने हानी केल्यासारखं होईल.

या संकेतस्थळाचा पत्ता असा आहे.
http://marathi.uni.cc

तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आदींची वाट आम्ही पाहतो आहोत.


******************************************


हा संदेश चर्चा विभागात टाकायचे कारण हे की मनोगत हे या नव्या प्रकल्पाचे प्रेरणास्त्रोत आहे. येथे अनेक मराठी आणि संगणक जाणकार आहेत. या योगे येथे  भाषांतर (स्वभाषीकरण) करतांना किंवा भाषांतर मानके ठरवतांना काय करायला हवे या बाबत  चर्चा होईल.


एक प्रश्न विचारायचा आहे. मला मनोगता वरील काही मार्गदर्शक लेख या संकेतस्थळावर द्यायचे आहेत. मी लेखकाचा आणि मनोगताचा उल्लेख अवश्य करेल. लेखकाच्याच नावाने लेख प्रकाशीत होतील. असं करण्यात कुणाची काही हरकत तर नाही ना?


एक शंका असू शकते की हेच लेख तिथे देण्यात काय फायदा?


तर एका ठराविक विषयाला वाहलेले ते संकेतस्थळ आहे. तेथे या साहित्य सागरातील समविषयी मोती निवडून त्यांची सुंदरशी माळ करावी अशी ईच्छा आहे.


तुमचं मत कळवा.


नीलकांत