मुलीचे वय

नमस्कार,


लग्न ही गोष्ट सर्वांच्याच जीवनातील महत्त्वाची घटना असते. एकदाचे लग्नाचे वय झाले की मुली बघायला जाणे, भावी जोडीदाराविषयी च्या अपेक्षा रेखाटत बसणे ह्या गोष्टींनी आयुष्यातील नवीन पर्वाला सुरुवात होते. तर यासंबंधीचा एक विषय मला मनोगतींपुढे चर्चेसाठी, मतांसाठी आणि त्यांचे अनुभव इथील तरुण मनोगतींसाठी उपयोगी पडतील या दृष्टीने ठेवायचा आहे. तो म्हणजे -


लग्न करताना मुलीचे वय मुलाच्या वयापेक्षा जास्त असावे की कमी ? आणि किती जास्त/कमी असावे ?  किंवा याला काही बंधन नाही ?


यासंबंधी मी ऐकलेले अनुभव असे की -


१. शारीरिक दृष्ट्या मुलींची वाढ त्याच वयाच्या मुलापेक्षा लवकर होते (हार्मोन्स मुळे). त्यामुळे पुढील 'वैवाहिक जीवन' सुखी जाण्यासाठी मुलींचे वय कमी असणे गरजेचे आहे.  


२. पहिल्या बाळंतपणा नंतर मुली अचानक थोराड वाटू लागतात. म्हणून त्यांचे वय लग्नाच्या वेळेस मुलापेक्षा २-३ वर्षे कमी असावे.


३. घरच्यांची आणि नातेवाईकांची सुप्त इच्छा असते की आपल्या मुलाने कमी वयाच्या मुली बरोबरच लग्न करावे किंवा प्रेमात पडावे. याउलट जास्त वयाच्या मुली बरोबर प्रेम झाले तर मुलीनेच याला गळाला लावला अशी चर्चा सुरू होते किंवा घरच्यांकडून विरोध होतो.


४. मुलगी १-२ वर्षे मोठी असेल तर ठीक आहे. पण ५-६ वर्षे मोठी म्हणजे आंधळे प्रेम होय. मग घरातून विरोध झालाच समजा. याबाबतीत एक अनुभव असा की नेमके हेच केलेल्या मुलाशी त्याच्या घरच्यांनी संबंध तोडून टाकले.   


५. जर मुलगी मुलापेक्षा मोठी असेल तर, ती मुलापेक्षा विचारांनी जास्त प्रगल्भ असतात. याउलट कमी वयाच्या मुलींमध्ये अल्लडपणा जास्त असतो. त्यामुळे जास्त वयाची मुलगी असणे हे फायदेशीर आहे.


६. मुलगी वयाने ५-६ वर्षे मोठी पण विधुर/घटस्फोटित असेल तर तिच्याशी लग्न करायला काही हरकत नाही. पण तिला जर मुले असतील तर हा एक मूर्खपणा आहे.


७. जर तुम्हाला एखादी मुलगी आवडली असली आणि वयाने मोठी असली तर तुम्ही घरच्यांचा विरोध जुमानून लग्न केले पाहिजे.


८. मुलगी जर हसत-खेळत राहणारी असेल तर तिच्या वयाने काहीही फरक पडत नाही. ती कायम मानसिक दृष्ट्या लहानच असेल.


आपल्याला वरील पैकी कोणते मुद्दे पटतात किंवा नाही ? आणि का ?


- मोरू