श्रीमत् आद्य शंकराचार्यांच्या जीवनांतील एक प्रसंग

भारताच्या इतिहासांत अनेक अनेक महान व परम थोर व्यक्ती होऊन गेल्या त्यांपैकी आद्य शंकराचार्य हे एक अद्‌भुत  व्यक्तिमत्त्व. वैदिक धर्माला अगदी अवकळा आलेली असताना, वैदिक धर्म भारतातून अगदी नाहीसा होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना शंकराचार्य परमेश्वराच्या ' यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ..' उक्तीप्रमाणे भारत भूमीवर अवतरले, आणि वेदांचे प्रामाण्य व ईश्वराचे असित्व सिद्ध करून वैदिक धर्माची बिघडलेली घडी नीट केली. आपल्या आचरणाने ज्ञानमार्ग, भक्तिमार्गाची उज्ज्वल परंपरा परत स्थापन केली.
        जन्म इ.स. 509 - (जन्म काळ निश्चित कोणता ह्यावर बरेच वाद आहेत). केरळातील कालटी नांवाचे  गाव. वडील शिवगुरु व आई अर्यांबा. भगवान शंकराच्या दीर्घ उपासनेनंतर त्यांना वर म्हणून प्राप्त झालेले हे पुत्ररत्न. तल्लख बुद्धी व स्मरणशक्ती मुळे पाचव्या वर्षीच लिहिण्या वाचनाचे ज्ञान झाल्यामुळे शिवगुरुंनी लगेच मुंज  करून टाकली आणि थोड्याच दिवसात शिवगुरु आजारी पडून परलोकवासी झाले. आठव्या वर्षी चारही वेद झाले, बाराव्या वर्षी सर्व शास्त्राभ्यास संपला आणि सोळाव्या वर्षी गीता, उपनिषदे व ब्रह्मसूत्र यांवर भाष्ये लिहून झाली. पुढे सोळा वर्षे धर्मजागृतीचे कार्य करून दिव्यलोकी प्रयाण , असे हे अवघ्या 32 वर्षाचे कार्य.
        आचार्यांनी अनेक वेळा देशाटन केले. सोबत नेहमी मोठा शिष्य समुदाय असायचा. एकदा प्रयागमध्ये प्रचार करीत असताना एक कुष्ठ रोगी एका झाडाला दोर लावून गळफास लावण्याच्या तयारीत दिसला. लांबूनच आचार्य कणखर आवाजात ओरडले " अरे थांब " आणि त्याच्या जवळ गेले. रोगाने जर्जर झालेला, चेहरा विद्रूप झाल्याने भूतासारखा दिसत असलेला, सूर्य प्रकाशामुळे त्याला धड पाहणेही त्रासदायक वाटत होते अशा त्या तरुणाने  आचार्यांच्या पायावर लोळण घातली. आचार्यांनी मोठ्या प्रेमाने त्याला उठवले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला, आणि अहो आश्चर्य , त्या तरुणाचा कुष्ठ रोग एकदम नाहीसा होऊन त्याला तेजस्वी कांति प्राप्त झाली. अतिशय आनंदाने त्याने परत आचार्यांच्या पायाला मिठी मारली. इतर शिष्य मंडळी भेदरलेल्या अवस्थेत हे सर्व दूरून पहात होती. त्यांनी आचार्यांच्या नावे मोठा जयघोष करून आसमंत दुमदुमून टाकले. तो तरुण म्हणाला, मोक्षप्राप्तीसाठी गुरुच्या शोधांत फिरत असताना या व्याधीने त्याला ग्रासले व जीवन असह्य होत असल्यामुळे त्याने आपला अंत करायचे ठरवले होते. पुढे म्हणाला, माझा भाव जाणून माझ्यावर कृपा करा, मला दीक्षा द्या. त्याचा शिष्यत्वाचा भाव जागृत झालेला पाहून आचार्यांनी विचारले -
आचार्य - 'किं ज्योतिस्तव ?' कोणत्या प्रकाशानें हे जग बघतोस.
तरुण  - 'भानुमान अह्‌नि मे, रात्रौ प्रदीपादिकम ' दिवसा सूर्यप्रकाश व रात्री दीपादिच्या साह्याने.
आचार्य - पण सूर्य व दीप हे कशाच्या साह्याने पाहतोस ?
तरुण  - ' चक्षुः ' , डोळ्यानें.
आचार्य - आणि डोळे मिटल्यावर.
आता तरुण अंतर्मुख झाला. क्षणांत विचारांची आवर्तने झाली. विचार पक्का झाला आणि म्हणाला -
तरुण  - ' धीः ' बुद्धीच्या योगाने.
आचार्य - पण बुद्धिचे दर्शन कशामुळे होते ?
तरुण  - ज्याने दर्शन होते तो म्हणजे ' मी ' , आणि आपल्याच शरीराकडे त्रयस्थपणे बघून त्याच्या मनांत विचार आला ' अहं ब्रह्मास्मि '
आचार्य - ' म्हणजे परमज्योति म्हणून जे म्हणतात ते तूंच की ? '
तरुण  - ' तदस्मि प्रभो ' होय गुरुमहाराज ती परमज्योती म्हणजे मीच.
    इंस्टंट मुक्ती. हर्षभरित झालेला तो तरुण रोमांचित झाला, गद्गद झाला आणि आचार्यांच्या पायाला परत मिठी मारली. आनंदाने डोळ्यातून घळघळा अश्रू वाहात जणूं आचार्यांचे चरण धुऊ लागला. आचार्यांनी भाववेग ओसरण्यासाठी काही वेळ जाऊ दिला आणि त्याच्या खांद्याला धरून त्याला उठवीत म्हणाले " उदंका ऊठ. " उदंक म्हणजे कलंक नष्ट झालेला. त्या तरुणाला नवे नाव , नवे आयुष्य मिळाले आणि प्रत्येक जीव जी अनुभुति मिळवण्याकरिता आयुष्यभर धडपडत असतो ती अनुभूति मिळाली. हे सर्व होईपर्यंत बालपणापासून सतत आचार्यांसोबत असणारे चित्सुखाचार्य मनोमन ह्या संभाषणाची जुळवाजुळव करीत होते  -
  किं ज्योतिस्तव भानुमानह्‌नि मे , रात्रौ प्रदीपादिकं |
      स्यादेवं रविदीपदर्शनविधौ , किं ज्योतिराख्याहि मे |
  चक्षुस्तस्य निमीलनादिसमये , किं धीर्धियो दर्शने |
      किं तत्राहमतो भवान्परमकं , ज्योतिस्तदस्मि प्रभो ||
[ शेवटच्या चरणांतील पहिले अक्षर अर्थबोधासाठी खरे तर तिसऱ्या चरणाच्या शेवटी लागते, पण चालीसाठी मी ते चवथ्या चरणांत जोडले आहे - चाल ? रामरक्षेतील - रामो राजमणि सदा विजयते , रामं रमेशं भजे - प्रमाणे ]
आचार्यांप्रमाणेंच चित्सुखाचार्यांनाही कोटि कोटि प्रणाम. नुसतेच शंकराचार्यांशी सावलीप्रमाणे सतत राहिले नाहीत - आचार्यांची प्रत्येक कृती आपल्यापर्यंत पोचवली म्हणून.