चित्रगुप्त नावाचा संगीतकार

पुण्याचे डॉ. प्रकाश कामत हा एक वेडा माणूस आहे. त्यांचे हे वेड आहे जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे. त्यांच्या 'सूरविहार' या स‌ंस्थेतर्फे संगीतकार चित्रगुप्त यांच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गेल्या महिन्यात सादर झाला. विभावरी आपटे-जोशी, योगिता गोडबोले-पाठक, अपूर्वा गज्जाला या गायिका आणि प्रशांत नासेरी व सलील भादेकर हे गायक ही नावे वाचूनच आठवड्याचा मधला दिवस असूनही कार्यक्रमाला जायचं मी नक्की केलं.
शहनाईनवाज उस्ताद बिसमिल्ला खांसाहेबांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रशांतचा स्वच्छ, मनमोकळा रफीस्वर सभागृहात घुमू लागला.
'चल उड जा रे पंछी
के अब ये देस हुवा बेगाना'
या गाण्याची तलतनं म्हटलेली आवृत्तीही निघाली होती ही माहिती मला नवीन होती. नंतर लगेचच सादर झालेलं तलतचंच 'दो दिल धडक रहे हैं और आवाज एक हैं' हे द्वंद्वगीत सलील आणि योगिताने छान खुलवलं. सलील भादेकर हा मुळात गुलाम अलींच्या गजला सादर करणारा गायक. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो गायकांची शैली हुबेहूब उचलतो खरी, पण त्यांची नक्कल करत नाही. तलतचं गाणं सादर करताना काय किंवा पुढचं 'ऑपेरा हाऊस' मधलं मुकेशचं 'देखो मौसम क्या बहार है' हे द्वंद्वगीत विभावरीबरोबर सादर करताना काय, त्यानं आवाजात खोटा कंप किंवा सानुनासिकपणा आणण्याचा कृत्रिम प्रयत्न केला नाही. त्याचा स्वर म्हणूनच सच्चा वाटला.
ठेक्याची गाणी हे संगीतकार चित्रगुप्त यांच्या संगीताचं एक प्रमुख वैशिष्ट्य. अपूर्वा गज्जला या दहावीत शिकत असणाऱ्या किशोरीनं म्हटलेलं 'दिवाने हम दिवाने तुम, किसे है गम, क्या कहे ये जमाना' हे गाणं आणि विभावरीनं म्हटलेलं चंद्रकंस रागावर आधारित 'बलमा माने ना' हे गाणं याचीच साक्ष देणारी. 'बलमा...' ला तबल्याची आणि ढोलकची साथ तर अफलातूनच.
'दिल को लाख संभाला जी' हेही असंच एक नटखट गाणं. पण कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं मानकरी ठरलं ते बाकी सलीलनं झकास रंगवलेलं किशोरकुमारचं 'अगर सुन ले, तो एक नगमा, हुजूर-ए- यार लाया हूं'! पण या मानाला स्पर्धाही तशी जोरकस होती बरं का! 'मै चुप रहूंगी ' मधलं 'कोई बता दे दिल है जहाँ', 'काली टोपी लाल रुमाल' मधलं 'दगा दगा वई वई वई', प्रशांतच्या घुमत्या आवाजातलं 'जाग दिले दिवाना', 'बरखा' मधलं सदाबहार 'इक रात में दो दो चांद खिले', खटकेबाज 'तडपाओगे, तडपालो', लता-उषाचं लाजवाब 'दगाबाज हो, बांके पिया...' आणि चित्रगुप्त यांच्या ऑल टाईम हिटस मधलं 'तेरी दुनियासे दूर...'!
चित्रगुप्त श्रीवास्तव या बिहारमधील करमैनी गावात १६ नोव्हेंबर १९१७ रोजी जन्मलेल्या इंग्रजी साहित्यात एम.ए. झालेल्या संगीतकारानं आपली सांगितिक वाटचाल ब्रम्हचारी या नावानं सुरु केली होती. अस्सल हिंदुस्थानी संगीताची बैठक असलेलं चित्रगुप्त यांचं संगीत लोकप्रिय झालं खरं, पण ते 'ए' ग्रेडचे संगीतकार बाकी कधीच होऊ शकले नाहीत. पण भारतीय वाद्यांचा प्रभावी वापर ही त्या काळातल्या सगळ्याच संगीतकारांची खासियत चित्रगुप्त यांच्या रचनांमध्येही दिसून येते. मध्यांतरानंतर सादर झालेल्या 'वासना' चित्रपटातील 'मैं सदके जांऊ' या गाण्यातले बासरीचे मधुर स्वर अमर ओकने हुबेहूब उचलले. 'आ जा रे मेरे प्यार के राही' हे त्यानंतर सादर झालेलं गाणंही असंच अत्यंत श्रवणीय या वर्गात मोडणारं.
निवेदिका त्यानंतर म्हणाली की लताबाईंनी चित्रगुप्त यांच्याकडे अनेक गाणी म्हटली, पण हे एकच गाणं जरी त्या गायल्या असत्या, तरी त्यांच्या गायकीचं आणि चित्रगुप्तांच्या चालीचं सार्थक झालं असतं. विभावरीनं लताबाईंचा हाँटिंग आवाज लावला...
'दिल का दिया
जला के गया
ये कौन मेरी
तनहाईमें...'
मालकंस रागातल्या 'अखियन संग अखियां लागे आज' या रचनेत प्रशांतनं जान ओतली. तशीच मझा आणली 'मै चुप रहूंगी' मधल्या 'चांद जाने कहां खो गया' ने आणि 'सजना, काहे भूल गये दिन प्यार के' या आर्त रचनेनं. 'आधी रात के बाद' मधलं 'ओ गोरी तेरी बांकी' हे हिंदुस्थानी स्वर आणि पाश्चात्य वाद्यरचना यांचं मनाडेंचं फ्यूजनगीत सलीलनं मजेत म्हटलं आणि मग एक अजरामर गाणं सुरु झालं...

'ये परबतोंके दायरे
ये शाम का धुंवा
ऐसे में क्यों न छेड दे
दिलों की दासताँ...' 

मंडळी, हे लिहितानाही अंगावर काटा आला बघा! शायरीप्रधान गीताला तितक्याच ताकदीचा स्वरसाज मिळाला की मधात केशर खलावं तशा रचना तयार होतात.


जरा सी जुल्फ खोल दो
हवा में इत्र घोल दो...


व्वा साहिरसाहेब, व्वा!


'पतंग' मधलं 'रंग दिल की धडकन भी लाती तो होगी' असंच मजा आणून गेलं आणि माझं खास आवडतं 'मुझे दर्द-ए-दिल का पता न था' हे तर काळजाला हातच घालून गेलं. पुढचं नटखट 'छेडो ना मेरी जुल्फें' आणि 'शादी' मधलं सोज्वळ 'आज की रात नया चांद लेके आयी है' हीसुद्धा गुणगुणत रहावी अशी गाणी.
किशोरकुमारनं शास्त्रीय संगीतावर आधारित फार कमी गाणी म्हटली आहेत. 'एक रात' मधलं मारुबिहाग रागावर आधारित 'पायलवाली देखना' सलीलनं ज्या तयारीनं म्हटलं त्याचा जवाब नाही!


चित्रगुप्त यांच्या अशा एकापेक्षा एक रचनांचा कार्यक्रम कोणत्या गाण्यानं संपवावा हा तसा अवघडच प्रश्न. 'सूरविहार'नं तो सोडवला तो 'लागी छूटे ना अब तो सनम' या अवीट गाण्यानं!


'सोच ले फिर से, एक गरीब, दिवाना है तेरा
सोच लिया जी, सोच लिया, तेरी कसम'


कार्यक्रम संपला.



'जीवन की आपाधापी में, कब वक्त मिला, कहीं पर बैठ, कभी ये सोच सकूं, जो किया, कहा, माना, उसमें क्या बुरा, भला' अशी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता आहे. माझ्या आयुष्यातल्या काही संध्याकाळी तरी संगीताच्या अशा सोनस्पर्शाने पावन झाल्या आहेत.पण मानवी मनाचा हव्यास काही सुटतो का हो? मन हे लोभीच असतं. चित्रगुप्तांचे सूर कान तृप्त करत होते, आणि घरी परत येताना लालची मन विचारत होतं, 'आता हे तलतच्या आवाजातलं 'चल उड जारे पंछी' कुठून बरं मिळवावं?'